राहुल गांधींना चपराक

rahul-gandhi
पुन्हा एकदा राहुल गांधी यांची पात्रता सिद्ध करणारी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. महात्मा गांधी यांची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली असल्याचा आरोप करणारे राहुल गांधी यांचे वक्तव्य त्यांना अंगलट येण्याचे संकेत न्यायालयाच्या या टिप्पणीने दिले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्रात भिवंडी येथे हे वक्तव्य केले होते. त्यावर संघाने राहुल यांच्यावर खटला भरला आणि त्यांना संघाची बदनामी केल्याबद्दल सजा करावी अशी मागणी केली. या खटल्यात आणि त्याच्या विषयात कितीतरी विषय गुंतले आहेत. पण त्या सर्वांचा विचार न करता राहुला गांधी हे किती बेजबाबदारपणे बोलतात हे त्यांनी आपल्या भाषणाने दाखवून दिले. खरे तर महात्मा गांधी यांची हत्या हिंदुत्ववाद्यांनीच केली असा आरोप गेल्या ७० वर्षांपासून करण्यात येत आहे. असा आरोप करून महात्मा गांधी यांच्याविषयी आदर असणारांची मते आपल्याला मिळावीत आणि ती भारतीय जनता पार्टीला मिळू नयेत असाच भाजपेतर पक्षांचा डाव असतो. मात्र असा आरोप करताना फार जपून बोलण्याची कसरत करावी लागते कारण संघाने गांधीजींची हत्या केली असा बेधडक आरोप करावा असा काही पुरावा नाही.

महात्मा गांधी यांची हत्या झाली तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक म्हणून मा. स. गोळवलकर गुरूजी हे कार्यरत होते. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी या हत्येच्या कटात गुरूजींनाही गोवले होते. त्यांच्या सोबत स्वा. वि. दा. सावरकर यांनाही गोवण्यात आले होते पण न्यायालयाने या दोघांनाही निर्दोष सोडले. एकदा सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष सोडवल्यानंतर त्यांच्यावर पुन्हा आरोप करीत राहणे हे न्यायालयाचा अवमान करण्यासारखे होते. पण नेहरूंचा या दोघांना गोवण्यामागे त्यांची बदनामी करण्याचा डाव होता. खटल्यात गोवले की बदनामी होते. खटला चालून ते निर्दोष ठरले तरी लोक त्यांना आरोपीच मानतात. समाजात न्यायालयीन निकालांच्या बाबतीत अनेक प्रकारचे गैरसमज असतात त्यातून अशी बदनामी करण्याची संधी मिळत असते आणि नेहरूंनी ती वापरली. त्यामुळे गांधींजींविषयी आत्मीयता बाळगणारांनी संघाला आणि एकूणच हिंदुत्ववादी संघटनांना कायमच गांधींचे हत्यारे मानले. त्याचे राजकीय लाभ कॉंग्रेसला मिळाले. हा झाला या हत्येेचा आणि खटल्याचा राजकीय परिणाम. पण न्यायालयाच्या भाषेत बोलायचे झाले तर संघाला गांधींचे मारेकरी म्हणता येत नाही. तसे म्हणायचे झालेच तर आडून आडून बोलावे लागते आणि संदिग्ध शब्दात आरोप करून न्यायालयीन कारवाईत न अडकण्याची काळजी घ्यावी लागते.

कॉंग्रेसचे नेते तशी काळजी घेत आले आहेत आणि तशी ती घेऊन राजकीय फायदा घेत आले आहेत. राहुल गांधी हे गेल्या लोकसभा निवडणुकीत हरणारी लढाई लढत होते. आणि त्यांची तसेच त्यांच्या पक्षाची सार्‍या बाजूंनी कोेंडी झाली होती. तिच्यातून सुटका करून घेण्यासाठी समाजात भेद निर्माण केला पाहिजे हे त्यांना समजायला लागले होते. तसा तो करूनच निवडणुका जिंकल्या पाहिजेत असे त्यांना जाणवायला लागले होते. त्यांनी मुस्लिम बहुल भिवडीतच संघावर हा आरोप केला. त्यांना भाषणे लिहून देणारांनी हा डाव टाकला. मुस्लिम बहुल भिवंंडीत हा बॉंब टाकला की तिथली मुस्लीम मते आपोआपच आपल्या पदरात पडतील असा त्यांचा होरा होता. अर्थात ही कॉंग्रेसची शिकवण आणि परंपराच आहे. त्यांनी नेहमीच इंग्रजांची फोडा आणि राज्य करा ही नीती आपलीशी केलेली आहे. तिच्यानुसार हिंदू आणि मुस्लिमांत भेद निर्माण करण्यासाठी त्यांनी संघाला लक्ष्य केले पण त्यासाठी महात्मा गांधी यांचा वापर करताना त्यांना शब्द कसे वापरावेत याचे भान राहिले नाही. संघाने त्यांच्यावर अब्रु नुकसानीचा दावा ठेकला.

या खटल्यात नेमके काय होणार हे सामान्य जनतेला समजणे कठिण आहे कारण ते तर वर्षानुवर्षे संघावरचा हा आरोप ऐकत आले आहेत पण जाणकारांना हे समजत होते की या प्रकरणात राहुल गांधी अडचणीत येणार. कारण आजवर संघानेही कोणाला आपल्यावर आरोप केला म्हणून न्यायालयात खेचले नव्हेत. हा मान आधी राहुल गांधी यांनाच मिळाला. त्यांनीही अडचणीत यावे अशा प्रकारे आरोप केला होता. हे जाणून की काय हे माहीत नाही पण राहुल गांधी यांनी न्यायालयात एक याचिका दाखल करून वेगळीच मागणी केली होती. कोणी कोणावर काही आरोप केला म्हणून आरोप करणारांना न्यायालयात खेचता येता कामा नये अशी कायद्यात दुरुस्ती करावी आणि त्या संबंधातला कायद्यातले कलमच काढून टाकावे. अर्थात ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावलीच पण संघावरच्या आरोपाच्या बाबतीत संघाची माफी मागावी असा आदेेश दिला. आता न्यायालयाचा हा आदेश मानला तर राहुल गांधी आणि कॉंग्रेस पक्ष यांचे सारे पितळच उघड पडेल हे त्यांच्या लक्षात आले आहेच म्हणून त्यांनी माफी मागण्यास नकार दिला. आता त्यांच्याविरोधातला खटला चालणे हाच पर्याय आहे. न्यायालयाचा निकाल काय लागणार हे स्पष्टच झाले आहे.. राहुल गांंधी यांनी आता या खटल्यातून सुटका करून घेतली आहे. आजचे मरण उद्यावर ढकलले आहे. खटला चालला तर त्यांना शिक्षा होणे अपरिहार्य आहे..

Leave a Comment