युनिकोड सदस्यांच्या रांगेत महाराष्ट्राने मिळवले स्थान

maharashtra
मुंबई – महाराष्ट्र सरकारने ‘युनिकोड कन्सॉर्शियम’ या या लिपिचिन्हांचे प्रमाणीकरण करणा-या आंतरराष्ट्रीय संस्थेचे सदस्यत्व मिळवले असून यामुळे महाराष्ट्राने गुगल, फेसबुक, आयबीएम, अॅपल, मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, सॅप अशा युनिकोड सदस्यांच्या रांगेत स्थान मिळवले आहे.

हे सदस्यत्व मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत असणा-या राज्य मराठी विकास संस्थेला मिळाले आहे. अशा प्रकारचे सदस्यत्व मिळविणारे महाराष्ट्र हे भारतातील दुसरे राज्य बनले आहे. मराठीच्या संगणकीय प्रमाणीकरणासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

या सदस्यत्वामुळे जागतिक स्तरावर राज्य सरकारला मताधिकारही मिळाला आहे. मराठी भाषा व संस्कृतीशी जोडलेल्या लिपीचिन्हांना आणि भावचिन्हांना (इमोजी) आता आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमाणित स्थान मिळणार आहे. सध्या युनिकोडमध्ये नसलेली पण मराठीसाठी आवश्यक असलेली लिपीचिन्हे (अपूर्णांक, संगीतविषयक चिन्हे) तसेच भावचिन्हे (वडापाव, शिवाजी महाराज यांची राजमुद्रा) यांना प्रमाणित संकेतांक मिळविणे राज्य शासनाला सोपे जाणार आहे.

मराठी भाषा व संस्कृतीशी जोडलेल्या चिन्हांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमाणित मान्यता मिळविण्यासाठी मराठी नागरिकांनीही या प्रक्रियेत सहभाग नोंदवावा आणि निवडक लिपीचिन्हे व भावचिन्हे [email protected] या ई-मेलवर पाठवावीत, असे आवाहन मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांनी केले आहे.

Leave a Comment