जवळपास दोन वर्षाच्या खंडानंतर काश्मीरमध्ये पुन्हा एकदा जनतेचा हिंसाचार उफाळून आला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या संबंधात जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री महिबुबा मुफ्ती यांच्याशी चर्चा केली आहे आणि राज्यातला हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी केंद्रातकडून अधिक पोलिसांची कुमक पाठवण्याची तयारी दाखवली आहे. या हिंसाचारात २१ जण मारले गेले आहेत. परंतु लोकांचा हिंसाचार ज्या कारणावरून उफाळून आला आहे त्यात सरकारचा काही दोष नाही. कारण काश्मीरमध्ये सध्या धुमाकूळ घालणार्या बुर्हाण वाणी या अतिरेक्याला ठार मारल्यामुळे हा हिंसाचार सुरू झालेला आहे. तो काही दिवसांची थांबेल परंतु हिंसाचार उसळू नये म्हणून बुर्हाण वाणीला सूट देणे किंवा त्याच्याबाबतीत सौम्य धोरण स्वीकारणे योग्य नव्हतेच.
धुमसते नंदनवन
केंद्र सरकारचे या बाबतीतले धोरण स्पष्ट आहे. काश्मीरचा प्रश्न शांततेने सोडवला पाहिजे हे केंद्र सरकारच काय पण भारतातल्या सर्वांनाच मान्य आहे. काश्मीरमधले जे लोक दहशतवाद्याच्या चिथावणीला बळी पडून हिंसाचार घडवतील त्यांना अद्दल घडवलीच पाहिजे या बाबतीततही सरकार ठाम आहे. बुर्हाण वाणी हा हिजबुल मुजाहिदीनचा सदस्य असून तो काश्मीरमधल्या युवकांना हिंसाचाराची उघड चिथावणी देत होता. त्याला ठार केल्यामुळे काश्मीरमधले काही युवक चिडले आहेत आणि त्यांनी हा हिंसाचार घडवायला सुरूवात केली आहे. गतवर्षी आसामधल्या काही दहशतवाद्यांनी नागालँडमध्ये येऊन दहशतवादी हल्ला केला होता आणि ब्रह्मदेशात पलायन केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानंतर एक विशेष बैठक घेतली आणि ब्रह्मदेशात शिरून त्या अतिरेक्यांचा असा काही समाचार घेतला की लोकांनी सरकारची कारवाई योग्य असल्याचे म्हटले आणि उघडउघडपणे दहशतवादी कारवाया करणार्यांच्या बाबतीत सरकार फार सौम्यपणे वागणार नाही असा संकेतही लोकांना मिळाला. काश्मीरमध्ये हेच चालले होते आणि पाकिस्तानची फूस असलेले दहशतवादी जणू काही काश्मीरमध्ये मोकळीक आहे अशा आविर्भावात युवकांना चिथावत फिरत होते. त्याचा सुरक्षा जवानांनी चांगलाच समाचार घेतला.