मराठी पाऊल

parliament
दिल्लीत प्रभाव पाडायचा असेल तर माणसाला हिंदी तर चांगले आले पाहिजे किंवा इंग्रजीवर तरी प्रभुत्व पाहिजे. दक्षिणेतले लोक हिंदीच्या बाबतीत अनभिज्ञ असले तरी ते इंग्रजीच्या जोरावर दिल्ली जिंकतात आणि उत्तरेतले लोक तर हिंदीत पारंगत असतातच. मराठी माणसाची मात्र गोची होते कारण त्याला या दोन्ही भाषा चांगल्या येत नाहीत. म्हणून दिल्लीच्या राजकारणात मराठी माणूस फार चांगला प्रभाव पाडू शकत नाही. तो चांगली गुणवत्ता असतानाही उपेक्षित राहतो. यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण आणि अलीकडे प्रमोद महाजन यांनी या ज्ञानाच्या आधारावरच दिल्लीत महाराष्ट्राची छाप पाडली होती. त्याची आज आठवण होते कारण आता दिल्लीत कधी नाही ते मराठी माणसांनी आपला चांगला वट्ट निर्माण केला आहे. मोदी मंत्रिमंडळात आता मराठी मंत्री केवळ जाणवतच आहेत असे नव्हे तर सर्वाधिक प्रभावी मंत्र्यांमध्ये मराठी मंत्र्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेमध्ये प्रचंड बदल घडवून आणायला सुरूवात केली आहे.

भारतीय रेल्वेचा वेग फार कमी आहे. पण हा वेग वाढवण्यासाठी बुलेट ट्रेन हेच एक महत्त्वाचे साधन आहे असे मानले जात होते. परंतु सुरेश प्रभू यांनी त्याला पर्याय म्हणून अधिक वेगाने पण आता आहे त्याच रुळावरून धावणार्‍या गाड्या आणायला सुरूवात केली असून विविध भागातल्या महत्त्वाच्या शहरांना जोडणार्‍या गाड्यांची गती वाढवली आहे. नितीन गडकरी आणि सुरेश प्रभू यांनी केवळ आपल्या खात्यातच नव्हे तर अर्थव्यवस्थेतच प्रभाव टाकत अनेक बदल घडवले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध खात्याच्या मंत्र्यांची नुकतीच हजेरी घेतली. तिच्यात नितीन गडकरी आणि सुरेश प्रभू या दोघांची कामगिरी सर्वाधिक सरस ठरल्याचे दिसून आले. पियुष गोयल हेही खुद्द पंतप्रधानांच्या प्रमाणेच रात्रीचा दिवस करून देशाच्या ऊर्जा क्षेत्राचे चित्र बदलून टाकण्याच्या खटपटीत आहेत. स्वातंत्र्यानंतर ज्या गावांना वीजच मिळाली नव्हती त्या हजारो गावांपर्यंत गोयल यांनी अतीशय वेगाने वीज नेऊन पोहोचवली आहे आणि आता ते सौर उर्जेच्या मार्गातून वीजेचे प्रश्‍न कायमचे सोडवण्यास प्रयत्नशील आहेत. याच मंत्र्यांच्या मालिकेत आता प्रकाश जावडेकर यांच्याकडे अतीशय महत्त्वाचे समजले जाणारे मनुष्यबळ विकास खाते सोपवण्यात आले आहे. हे खाते यापूर्वी स्मृती इराणी यांच्याकडे होते. त्यांनीही या खात्यात बरेच बदल केले. परंतु शिक्षणाच्या क्षेत्रात डाव्या शक्ती आणि उजव्या शक्ती यांच्यामध्ये सातत्याने प्रभावाचा संघर्ष चालू असतो.

शिक्षण क्षेत्रामध्ये आपला विचार घेऊन कार्यरत राहणारे कार्यकर्ते घुसवले पाहिजेत या विचाराने या दोन्ही विचारसरणीच्या नेत्यांना नेहमीच पछाडलेले असते. त्यामुळे हिंदुत्ववादी आणि साम्यवादी यांच्यात विविध विद्यापीठांमध्ये जबरदस्त संघर्ष जारी असतो. त्यामुळे स्मृती इराणी या अपरिहार्यपणे वादग्रस्त ठरल्या. त्यांना या खात्यातून काढून वस्रोद्योग खात्याकडे पाठवण्यात आले आहे आणि त्यांच्या जागी प्रकाश जावडेकर यांना कॅबिनेट मंत्री करून नेमलेले आहे. या बदलाचा अर्थ काही लोकांनी वेगळाच काढला आहे. स्मृती इराणी या वादग्रस्त ठरल्यामुळे त्यांना या खात्यातून काढले असे विश्‍लेषण काही लोक करत आहेत. परंतु प्रकाश जावडेकर या खात्यात गेले तरी त्यांनाही हे वाद टाळता येणार नाहीत. अर्थात वादाची प्रकरणे कशी हाताळायची हा प्रत्येकासमोरचा प्रश्‍न असतो आणि तो प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वभावानुसार हाताळत असते. काही असले तरी महाराष्ट्राच्या मंत्र्यांना एवढे महत्त्वाचे खाते मिळाले आहे ही गोष्ट निश्‍चितपणे महाराष्ट्रासाठी अभिमानाची आहे. खरे म्हणजे मंत्रिमंडळातली कोणती खाती महत्त्वाची आणि कोणती बिनमहत्त्वाची असा वाद निरर्थक असतो.

साधारणपणे गृह, अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र ही खाती महत्त्वाची मानली जातात. परंतु अनेकदा काही मंत्री आपल्या कार्यकुशलेतेने आपल्या हाती आलेल्या कथित बिन महत्त्वाच्या खात्याचे महत्त्व वाढवून दाखवतात. नितीन गडकरी यांनी हाच प्रकार केलेला आहे. सुरेश प्रभू, मनोहर पर्रीकर यांनीही आपल्या खात्याचे महत्त्व आपल्या कार्यक्षमतेने वाढवले आहे. तशी संधी आता प्रकाश जावडेकर यांना उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्रातून या मंत्रिमंडळात गेलेल्या या दोन नव्या मंत्र्यांपैकी रामदास आठवले यांच्याकडे सामाजिक न्याय हे खाते आले आहे. तर डॉ. सुभाष भामरे यांना संरक्षण खात्याचे राज्यमंत्री करण्यात आले आहे. डॉ. भामरे यांचा हा तर मोठा सन्मानच म्हणावा लागेल. कारण गेल्या दोन दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराचे विश्‍लेषण करणार्‍या कथित राजकीय विश्‍लेषकांनी डॉ. भामरे यांना ते केवळ मराठा आहेत म्हणून मंत्रिमंडळात घेतले असल्याचा अन्वयार्थ काढला आहे. परंतु केवळ जातीय समीकरणासाठी आणि सोशल इंजिनिअरिंग म्हणून त्यांना मंत्रिमंडळात घेतले असते तर त्यांच्याकडे बिनमहत्त्वाचे, दुय्यम स्वरूपाचे खाते सोपवले गेले असते. मात्र उपलब्ध असलेल्या माहितीवरून डॉ. भामरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर आपल्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचा मोठा ठसा उमटवलेला आहे आणि म्हणूनच त्यांच्या अभ्यासूपणाला आव्हान ठरेल असे संरक्षण खाते त्यांच्याकडे सोपवलेले आहे. एकंदरीत केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारमध्ये महाराष्ट्राचे मंत्री आपल्या कार्यक्षमतेमुळे आणि कर्तबगारीमुळे चमकणार असून त्यांचा ठसा सरकारच्या कामगिरीवर उमटणार आहे.

Leave a Comment