पाच वर्षांत तंत्रज्ञानामुळे सहा लाख रोजगार घटणार

bpo
मुंबई – अमेरिकन संशोधन संस्थेने आगामी पाच वर्षांमध्ये भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कमी कौशल्याच्या (लो स्कील्ड) ६.४ लाख नोक-यांवर यांत्रिकीकरणामुळे बेकारीची कु-हाड कोसळण्याची शक्यता वर्तविली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नोक-यांचे प्रमाण यांत्रिकीकरणामुळे कमी होण्याचे भाकित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र याकडे भारतीय उद्योग दुस-या बाजूने पाहत असून या कालावधीत मोठय़ा प्रमाणात रोजगारात वाढ होणार असल्याचे सांगत आहे.

आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नोक-यांमध्ये २०२१ पर्यंत साधारण १४ लाखापर्यंत घसरण होण्याची शक्यता एचएफएस रिसर्चने वर्तविली आहे. याचा परिणाम फिलीपाइन्स, ब्रिटन आणि अमेरिका यासारख्या देशांवरही परिणाम दिसून येईल. या अहवालाला भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नॅशनल असोशिएशन ऑफ सॉफ्टवेअर ऍन्ड सर्व्हिसेस कंपनीज (नेक्सॉम) ने फेटाळला असून अहवाल तयार करताना नव्या तंत्रज्ञानामुळे तयार होणा-या सर्व रोजगाराचा समावेश करण्यात आला नसल्याचे मत व्यक्त केले आहे.

सध्या ३७ लाख कर्मचारी भारतीय आयटी-बीपीओ क्षेत्रामध्ये आहे आणि यांत्रिकीकरणामुळे खासकरून बीपीओ आणि इन्फ्रा व्यवस्थापन क्षेत्रामध्ये काम करणा-या कर्मचा-यांवर याचा परिणाम होईल. या दोन्ही क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरणावर जोरदार भर दिला जात आहे. कमी कौशल्याच्या नोक-यांमध्ये ३० टक्के घसरण होईल, याचबरोबर मध्यम कौशल्याच्या नोक-यांमध्ये ८ आणि उच्च कौशल्याच्या नोक-यांमध्ये ५६ टक्के वाढ होईल असे एचएफएसच्या अहवालात नोंदविण्यात आले. कमी कौशल्याच्या नोकरीमध्ये निर्धारित प्रक्रिया पाळण्यात येते. यामध्ये उच्च शैक्षणिक पातळीची आवश्यकता नसते. मध्यम कौशल्याच्या नोक-यांमध्ये कर्मचा-यांना निर्णय घेण्याची जबाबदारी असते आणि या कामामध्ये जास्त आव्हाने असतात.

Leave a Comment