यवतमाळकरांचा आक्रोश

yavtmal
सध्या विदर्भातील यवतमाळ शहर मोठे चर्चेत आलेले आहे. कारण तिथल्या प्रतिष्ठित दर्डा कुटुंबाच्या मालकीच्या पब्लिक स्कूलमध्ये चिमुरड्या मुलींवर शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केलेले आहेत. या शिक्षकांवर लागलेले आरोप सिध्द झाल्यास त्यांना खरोखर फाशीची शिक्षा दिली पाहिजे. इतका हा गुन्हा जघन्य आहे. विद्यार्थी शिक्षकांकडे आपल्या जीवनाचा शिल्पकार म्हणून पहात असतात. शिक्षकांनी शिक्षा केली आणि प्रसंगी मारहाण केली तरी विद्यार्थी ते सहन करतात एवढेच नव्हे तर तो आपल्या गुरुंचा प्रसाद मानतात. परंतु आजकाल शिक्षण क्षेत्रामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या शिक्षकांचा मोठा भरणा झाला आहे. विद्यार्थ्यांचा शिक्षक असण्याची वैचारिक आणि तात्विक बाजू तसेच नैतिक बाजू यांची कसलीही जाणीव नसलेले निव्वळ धंदेवाईक शिक्षक शिक्षण क्षेत्रात घुसलेले आहेत. विद्यार्थी शिक्षकांकडे आपला शिल्पकार म्हणून बघतात आणि असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे शिक्षक विद्यार्थ्यांकडे तसेच विद्यार्थिनींकडे कामवासनेने पाहत असतात. ही शिक्षण क्षेत्राची किती मोठी शोकांतिका आहे.

जी गोष्ट शिक्षकांची तीच संस्थाचालकांची. पूर्वीच्या काळी अनेक तळमळीच्या कार्यकर्त्यांनी समाजात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून पदराला खार लावून शिक्षणसंस्था काढल्या चालवल्या परंतु सध्याच्या पब्लिक स्कूल नावाच्या एका वावटळीत शिक्षणामागचा हा उदात्त हेतू पार लोपून गेला आहे. यवतमाळच्या धंदेवाईक राजकारण्यांनी समाजातली आपली प्रतिष्ठा वाढावी आणि त्या प्रतिष्ठेच्या जोरावर सत्ता आणि पैसा कमावता यावा यासाठी शाळा काढल्या. पदराला खार लावणे तर सोडाच पण स्वतःला किती कमाई करता येईल याचाच केवळ हिशोब करून शाळा चालवल्या. म्हणून अशा शाळांमध्ये शिक्षक कसे वागत आहेत, शाळेमध्ये काय चाललेले आहे आणि शिक्षक विद्यार्थ्यांवर योग्य ते संस्कार करत आहेत की नाही याचे भान त्यांना राहिलेले नाही. तसे राहणे शक्य नाही कारण शिक्षण संस्था काढण्याचा त्यांचा हेतूच धंदेवाईक आहे. त्यामुळे इमारत चांगली बांधणे, भपका करणे, जाहिरात खूप करणे याच गोष्टीवर त्यांचे लक्ष केंद्रित झालेले असते. शिक्षक काय करत आहेत यांच्याशी त्यांना काही देणेघेणे नाही. परिणामी आपल्या शाळेमध्ये चिमुरड्या बालिकांवर आपल्या शाळेचे शिक्षक अत्याचार करत आहेत याचे भान त्यांना नाही. त्यांचे हे दुर्लक्ष कितीतरी बालिकांच्या जिवनांना उद्ध्वस्त करण्यास कारणीभूत ठरले आहे. किंबहुना असा काही प्रकार घडतो याचे गांभीर्य त्यांना नसल्यामुळे आपल्या शाळेतले अत्याचाराचे प्रकार उघड झाल्यानंतरही त्यांच्यावर पांघरूण घालण्याचीच त्यांची प्रवृत्ती झाली आहे.

यवतमाळच्या खा. विजय दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली चालणार्‍या शाळेत तब्बल चौदा ते पंधरा लहान मुलींवर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार उघड झाल्यानंतरही दर्डा कुटुंबातल्या कोणाही जबाबदार व्यक्तीने झाल्या प्रकाराबद्दल साधी दिलगिरीसुध्दा व्यक्त केली नाही. प्रकार उघड झाल्यानंतर ५ दिवसांनी संबंधित शिक्षकांवर आणि मुख्याध्यापकावर कारवाई झाली. याचा अर्थ दर्डा कुटुंबाने आपल्या राजकीय वजनाचा लाभ घेऊन प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न केला आहे असाच होतो. त्यांची ही प्रवृत्ती पालकांशी झालेल्या चर्चेतूनही प्रकट झालेली दिसते. एका संतप्त पालकाने किशोर दर्डा या संचालकाला, या ठिकाणी तुमची मुलगी असती तर तुम्हाला काय वाटले असते असा प्रश्‍न विचारला असता या गृहस्थाने मोठ्या निर्लज्जपणे असे उत्तर दिले की, तुमच्या आणि माझ्या मुलीत फरक आहे. या उत्तराने पालक संतप्त झाले नसतील तरच नवल.

याचा उघड अर्थ असा आहे. माझ्या मुलीवर अत्याचार झालेले चालणार नाहीत. तुमच्या मुलीवर झाल्यास मात्र चालतात आणि तुमच्या मुलीवर अत्याचार झाला असल्यास त्याकडे डोळेझाक करणे योग्यच आहे. काही लोक स्वतःला समाजातल्या सामान्य लोकांपेक्षा खास वेगळे समजत असतात. त्यांची ही प्रवृत्तीच या प्रकाराला कारणीभूत ठरलेली आहे. शाळेतल्या मुलींवर काही वाईट प्रसंग गुदरू नये याबाबत आपण जागरूक राहिले पाहिजे अशी त्यांची भावना न होण्यामागे हीच प्रवृत्ती कारणीभूत आहे. त्यामुळे शिक्षक आणि मुख्याध्यापकांबरोबरच अशा संचालकांनाही अटक झाली पाहिजे. परंतु ती होत नाही त्यामुळे जनतेचा प्रक्षोभ झालेला आहे. यवतमाळचे हे प्रकरण या प्रक्षोभामुळे फार मोठे होणार आहे आणि हा प्रक्षोभ वाढू नये यासाठी विजय दर्डा यांच्यासह या संस्थेच्या संचालकांना आधी अटक झाली पाहिजे. परंतु सध्या आपल्या पोलीस यंत्रणेमध्ये कोणती कारवाई करताना गुन्हा काय घडला आहे बघण्यापेक्षा गुन्हा कोणी केला हे बघण्यावर भर दिला जातो. दर्डा कुटुंबातील विजय दर्डा हे माजी खासदार आहेत आणि राजेंद्र दर्डा हे माजी शिक्षणमंत्री आहेत. त्याचा दबाव पोलिसांवर आला असण्याची शक्यता आहे. परंतु गृहखाते आपल्या हातात असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही दर्डा कुटुंबाची प्रतिष्ठा आडवी येऊ न देता त्यांच्यावर योग्य ती कारवाई करतील अशी अपेक्षा आहे.

Leave a Comment