आज जगात कदाचित असे एकही घर नसेल जेथे साखरेचा वापर केला जात नाही. मात्र भारत व अन्य कांही देशात सल्फरचा वापर करून बनविली जात असलेली साखर आरोग्यासाठी घातक आहे. यावर आरोग्यपूर्ण साखर बनविण्याची सोपी व जादा खर्च न येणारी पद्धत कानपूरच्या नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटने विकसित केली आहे. त्यात कार्बन डाय ऑक्साईडचा वापर करून स्वच्छ व शुद्ध साखर बनविली जाते.
कार्बन डाय ऑक्साईडच्या मदतीने बनणार आरोग्यपूर्ण साखर
संस्थेचे संचालक प्रो. नरेंद्र मोहन या संदर्भात माहिती देताना म्हणाले, कार्बन डाय ऑक्साईडचा वापर करून शुद्ध साखर बनविण्याच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत व त्याचे पेटंटही घेतले गेले आहे. आज ज्या पद्धतीने साखर बनविली जाते त्यात उसाचा रस चुना व सल्फर च्या मिश्रणाने साफ करून घेतला जातो. ही साखर कितीही स्वच्छ केली तरी त्यात सल्फर राहतोच. यामुळे ब्राँकायटीस, अस्थमा, छाती आखडणे, सतत शिका, घसा दुखी असे त्रास होतात. आपल्याकडे कधीकधी सल्फरचे हे प्रमाण किलोमागे ६० ते ७० मिलीग्रॅमपर्यंतही असते. अशी साखर आरोग्याला घातक असते.
अनेक कारखान्यात उसाच्या मळीपासून अल्कोहोल बनविले जाते. या प्रक्रियेत तयार होणारा कार्बन डाय ऑक्साईड हा वायू वापरून उसाचा रस साफ केला गेला तेव्हा निर्माण झालेली साखर अधिक उत्तम दर्जाची व आरोग्यदायी असल्याचे दिसून आले. हा वायू कारखान्यातूनच तयार होत असल्याने त्यासाठी वेगळा खर्च करावा लागला नाही. महाराष्ट व कर्नाटकातील कांही कारखान्यात हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. दर चार वर्षांनी भरणार्या इंटरनॅशनल शुगर व शुगरकेन टेक्नॉलॉजीच्या परिषदेत यावरचा पेपर सादर करण्यात आला आहे.