महाराष्ट्र आघाडीवर

maharashtra
भारतातले सर्वात श्रीमंत आणि प्रगत राज्य कोणते यावर सातत्याने चर्चा होत असते. त्यात कधी पंजाब आघाडीवर असतो तर कधी महाराष्ट्राचा क्रमांक वर असतो. मात्र गेल्या २५ वर्षातील आकडेवारीवर नजर टाकली तर पंजाब हे देशातले सर्वात श्रीमंत राज्य असल्याचे दिसून येईल. एक इंग्रजी साप्ताहिक दर सहा महिन्यांनी राज्यांच्या प्रगतीचा असा आढावा घेत असते. तो आढावा दोन प्रकारात घेतला जातो. मोठ्या राज्यातील सर्वात प्रगत राज्य कोणते असा एक वर्ग केला जातो तर लहान राज्यांमध्येही असा आढावा वेगळा घेतला जातो. लहान राज्यांमध्ये सातत्याने उत्तरांचल आणि हिमाचल प्रदेश यांच्यात स्पर्धा होताना दिसते. तर मोठ्या राज्यांमध्ये पंजाब नंतर तामिळनाडू, महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक या राज्यांमध्ये स्पर्धा असल्याचे जाणवते. राज्यांच्या आर्थिक कामगिरीचा आढावा घेताना तो निरनिराळ्या निकषांखाली घेतला जातो आणि बदलत्या निकषांनुसार राज्यांची क्रमवारीही बदलते. कधी दरडोई उत्पन्नाच्या आधारावर प्रगती मोजली जाते तर कधी औद्योगिक विकासाच्या मुद्यावर ती मोजली जाते.

आता सध्या राज्य सरकारांच्या वित्तीय तुटीच्या आधारावर आणि राज्यातील कारखान्यांच्या संख्येच्या आधारावर देशातल्या विविध राज्यांची प्रगती जोखण्यात आली असून तिच्यात महाराष्ट्र पहिला क्रमांक असल्याचे आढळले आहे. रिझर्व्ह बँकेने केलेल्या या पाहणीमध्ये पंजाबचा क्रमांक महाराष्ट्राच्या खाली आहे. २०११ सालपासून पंजाब आपला अव्वल स्थान गमावत असल्याचे दिसून आले आहे. तर महाराष्ट्र हळूहळू अव्वल स्थानाकडे सरकत असल्याचे अनुभवास आले आहे. २०१० सालपासून पंजाबमधल्या कारखान्यांची संख्या घटत चालली आहे. त्यामुळे पंजाबची अधोगती आणि महाराष्ट्राची प्रगती असे चित्र दिसत आहे. तसेच तामिळनाडू, आंध्रप्रदेश, गुजरात ही राज्ये कुठेतरी जवळपास रेंगाळत आहेत. एका बाजूला पंजाबच्या निर्विवाद वर्चस्वाला धक्का लागलेला दिसत आहे तर महाराष्ट्र पुढे येत आहे. महाराष्ट्राचे वट्ट उत्पन्न ९.५ लाख कोटी रुपये असल्याचे आढळले आहे. याबाबतीत तामिळनाडू दुसर्‍या क्रमांकावर आणि उत्तर प्रदेश तिसर्‍या क्रमांकावर आहे. मुळात उत्तर प्रदेशचे राज्यच मोठे असल्यामुळे आणि त्याची लोकसंख्या १९ कोटींच्या जवळपास असल्यामुळे वट्ट उत्पन्नात उत्तर प्रदेशाचा क्रमांक लागणे साहजिक आहे परंतु महाराष्ट्राच्या तुलनेत त्याच्या वट्ट उत्पन्नाचा आकडा निम्म्याच्या जवळपास म्हणजे ५ लाख कोटी रुपये एवढा आहे. १३ कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्राचे वट्ट उत्पन्न ९.५ लाख कोटी रुपये आणि १९ कोटी लोकसंख्येच्या उत्तर प्रदेशाचे वट्ट उत्पन्न ५ लाख कोटी रुपये.

या वट्ट उत्पन्नाच्या आधारावर दरडोई उत्पन्नाचा हिशोब केला तर उत्तर प्रदेशाचे दरडोई उत्पन्न महाराष्ट्राच्या निम्मेसुध्दा होणार नाही. यावरून उत्तर प्रदेशाचा चौथा क्रमांक असला तरी दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत ते राज्य किती दरिद्री आहे याचा अंदाज येतो. कोणत्याही राज्याची आर्थिक परिस्थिती ही त्या राज्यातल्या कारखान्यांवर अवलंबून असते. या बाबतीत पंजाबचे अधःपतन जारी आहे. पंजाबमधल्या विविध कारखान्यांची संख्या गेल्या चार वर्षात १२ हजार ७७० वरून १२ हजार २०० पर्यंत खाली आली आहे. परिणामी राज्याच्या उत्पन्नावर परिणाम झालेला आहे. पंजाबमध्ये भरपूर पैसा असला तरी तो पैसा परदेशातून आलेला आहे आणि तिथे कामे करणार्‍या पंजाबी लोकांनी तो आपल्या गावाकडे पाठवलेला आहे. महाराष्ट्रात मात्र कारखान्यांची संख्या वाढलेली दिसते. महाराष्ट्रात विजेची टंचाई आहे असे वातावरण तयार करण्यात आले असले तरी महाराष्ट्रात सर्वाधिक वीज निर्मिती होते. या बाबतीत महाराष्ट्राच्या खालोखाल गुजरातचा नंबर लागतो हे विशेष आहे.

देशभरात तयार होणार्‍या एकूण १० लाख ९० हजार युनिट विजेपैकी १ लाख ४१ हजार युनिट वीज एकट्या महाराष्ट्रात तयार होते. बँकांची उपलब्धता आणि त्यांच्याकडून दिल्या जाणार्‍या कर्जाच्या बाबतीत मात्र महाराष्ट्र मागे आहे. बँकांकडून दिल्या जाणार्‍या कर्जाच्या संदर्भात दक्षिण भारताने मोठी मजल मारली आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ या राज्यात बँकांनी या राज्यात सर्वाधिक कर्जे दिलेली आहेत. मात्र बँकांत ठेवण्यात आलेल्या ठेवींच्या बाबतीत तामिळनाडू अव्वल आणि महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर आहे. इतर अनेक घटकांचा विचार केला असता महाराष्ट्र अनेक बाबतीत पहिल्या क्रमांकावर आणि काही बाबतीत पहिल्या पाच क्रमांकात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हे देशातले सर्वाधिक श्रीमंत राज्य ठरले आहे. अर्थात महाराष्ट्राच्या या श्रीमंतीमध्ये मुंबईचा हिस्सा किती मोठा आणि उर्वरित महाराष्ट्राचा किती मोठा याबद्दल चर्चा होऊ शकते. किंबहुना महाराष्ट्राच्या या श्रीमंतीमध्ये मुंबई शहरामुळेच भर पडली आहे हे नाकारता येत नाही. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, कोल्हापूर या शहरांमध्येच उद्योगांचे केंद्रीकरण झाले असल्यामुळे महाराष्ट्राची श्रीमंती ही याच भागामध्ये केंद्रीत झाली अाहे. उर्वरित ग्रामीण महाराष्ट्रात म्हणावा तसा विकास झालेला नाही. हे दुखणे तसे जुनेच आहे आणि केवळ महाराष्ट्रापुरतेच आहे असेही नाही. अन्यही राज्यांमध्ये शहरांचा विकास आणि खेडी भकास असेच चित्र आहे.

Leave a Comment