ग्रामसभेनेच केले हुंडा प्रथेचे उच्चाटन

gram-sabha
आपल्या समाजाला हुंडा हा एक कलंक लागलेला आहे. त्यामुळे एखाद्या कुटुंबात एखाद्या मुलीचे लग्न होते तेव्हा तिचा नवा संसार सुरू होतो मात्र तिच्या आईवडिलांचा संसार मात्र उद्ध्वस्त झालेला असतो. एवढी मोठी हानी सहन करून लग्न थाटामाटात साजरे होते. पण त्या थाटामाटाचा दोन्हीपैकी कोणत्याही कुटुंबाला कसलाच उपयोग होत नाही. उलट एक दिवसाच्या भपक्यासाठी पूर्ण आयुष्य वैराण झालेले असते. गेल्या काही वर्षांमध्ये असे आढळून आलेले आहे की समाजातली जी कुटुंबे दारिद्य्र रेषेच्या वर होती ती कुटुंबे घरातल्या लग्नानंतर दारिद्य्र रेषेच्या खाली आलेली आहेत. आर्थिक परिस्थितीची ही उलटी वाटचाल केवळ एक दिवसाच्या खोट्या प्रतिष्ठेपायी झालेली असते आणि या प्रतिष्ठेच्या कल्पना काही सुटत नाहीत. उलट ऐपत नसताना भपका करण्याची स्पर्धा मात्र वाढत चालली आहे. गेल्या काही दिवसात तर असे आढळले आहे की एक दिवसाच्या भपकेबाज विवाह सोहळ्यापायी केवळ वधूपित्याचेच नव्हे तर वरपित्याचेही दिवाळे निघायला लागले आहे. त्यामुळे वधूपित्याबरोबर वरपितेसुध्दा लग्नातल्या भपक्याचा पुनर्विचार करायला लागले आहेत.

असा पुनर्विचार करणार्‍यांची संख्या कमी आहे परंतु अशी उदाहरणे घालून देणार्‍या लोकांचे असे प्रयत्न जनतेसमोर आले पाहिजेत आणि त्यापासून इतरांनी धडा घेतला पाहिजे. तसे झाले तर हळूहळू लग्नातले खर्च टाळून साध्या पध्दतीने लग्न करण्याची रीत समाजमान्य होईल आणि लग्नाच्या पध्दतीला विधायक वळण लागेल. नुकतीच वृत्तपत्रामध्ये म्हैसूरच्या राजघराण्यातील विवाहाची बातमी छापून आली आहे. किती झाले तरी तो राजघराण्यातला विवाह सोहळा असल्यामुळे त्याची वर्णने छापून आली आहेत आणि ती डोळे विस्फारायला लावणारी आहेत. मात्र याच भपकेबाज विवाहाच्या शेजारी केरळातल्या विवाहाची हकीकत प्रसिध्द झाली आहे. एका विवाह सोहळ्यामध्ये वराकडच्या मंडळींनी विवाह सोहळ्याचे चित्रिकरण केले नाही, मोठा हॉल घेतला नाही, भारी बँड लावला नाही म्हणून वधूने आणि तिच्या नातेवाईकांनी सप्तपदी होऊनसुध्दा हे लग्न म्हणजे हा नातेसंबंध रद्द झाला असल्याचे जाहीर केले आहे. दोन्ही ठिकाणी भपक्याचा सोस दिसून येतो मात्र राजघराण्यातील भपका हा त्यांच्या श्रीमंतीला शोभेसा आणि प्रतिष्ठेला साजेसा असतो. असे असले तरी त्यांचे अनुकरण करण्याच्या भावनेतून बाकीचे लोक ऐपत नसूनसुध्दा भपका करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपण अशा भपक्यापायी जन्मभराचे सौख्य आणि समाधान गमावून बसत आहोत. याची जाणीव सामान्य कुटुंबातल्या लोकांना नसते.

ही जाणीव केवळ त्यांनाच असून चालत नाही. लग्न थाटात झाले नाही तर लोक काय म्हणत असतील अशी भीती त्यांना वाटत असते आणि लोकांना दाखवण्यासाठी ही मंडळी स्वतःला कर्जाच्या खाईत लोटत असतात. खरे म्हणजे लग्न कितीही थाटात केले तरी काही छिद्रान्नवेशी लोक नाके मुरडतच असतात. त्यांच्या आहारी जाऊन आपण किती कर्जात बुडायचे याचे भान वर आणि वधूपित्यांना असले पाहिजे आणि लोकांच्याही मनामध्ये साध्या पध्दतीच्या लग्नाचे महत्त्व पटवले गेले पाहिजे. उत्तर प्रदेशात लखनौपासून जवळच असलेल्या ललितपूर या गावातील एका सुशिक्षित सरपंच महिलेने या बाबत आदर्श घालून दिला आहे. खरे म्हणजे तिने केलेला उपक्रम फार अद्वितीय आहे असे नाही. तिने सामूहिक विवाहाचा आग्रह धरला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये आता सामूहिक विवाह मोठ्या संख्येने व्हायला लागले आहेत. त्यात काही नवल राहिलेले नाही. परंतु ललितपूरच्या या सरपंच महिलेने गावच्या ग्रामसभेमध्ये हुंडा विरहित विवाह करण्याचा ठराव मंजूर केला आणि हा ठराव सर्वानुमते मान्य झाला.

आता त्या गावामध्ये सरसकट हुंड्याशिवाय आणि भपक्याशिवाय विवाह होत आहेत. खर्च न करता विवाह करण्याचे महत्त्व वधूपित्याला पटू शकते कारण शेवटी त्या खर्चाचा भार वधूपित्यावर पडत असतो. पण ललितपूरमध्ये वरपित्यांनीसुध्दा ही कल्पना उचलून धरली आहे. कारण त्या गावामध्ये गेल्या दोन वर्षात साडेचारशे कुटुंबांमध्ये विवाह झालेले आहेत. विवाहानंतर या साडेचारशे कुटुंबांची पाहणी केली असता त्यातील चारशे कुटुंबांनी जमिनी विकून विवाह केल्याचे लक्षात आले. तेव्हा या सरपंच महिलेने सर्वांना एक सवाल केला की सध्याची विवाह पध्दती आपल्याला जमीन विकायला लावत असेल तर ती बदलली पाहिजे की नाही? ग्रामसभेत हा ठराव ठेवल्यानंतर त्याला सर्वांनी एकमुखाने मान्यता दिली आणि आता सामूहिक विवाहामध्ये गावातील मुलामुलींचे विवाह एकत्रित साजरे होऊन खर्चात बचत होत आहे. या गावाने अशा सामूहिक विवाह सोहळ्यासाठी दोन लाख रुपयांचा कायमचा निधी उभारला आहे. त्या निधीत गावातल्या सगळ्या कुटुंबांचे योगदान आहे. अशारितीने कोणत्याही कारणाने कर्जबाजारी होणार्‍या कुटुंबाला या दोन लाखातून लहान मोठी बिनव्याजी मदत दिली जाते तेव्हा केवळ लग्नामुळे होणारा नव्हे तर कोणत्याही कारणाने होणारा कर्जबाजारीपणा टाळला जातो. ग्रामीण भागातल्या लोकांचे दोन शत्रू त्यांना उद्ध्वस्त करत असतात. एक म्हणजे कर्ज आणि दुसरे म्हणजे दारू. त्यातल्या कर्जाला तरी या गावाने चाप लावला आहे. देशातल्या अन्यही गावातल्या ग्रामपंचायती त्यांचे अनुकरण करतील का?

Leave a Comment