करबुडव्यांवर बडगा

tax
केंद्र सरकारने अखेर एका मोठ्या विषयाला हात घातला आहे. आयकर देण्यास पात्र असताना आणि कायद्यानुसार आयकर विवरण भरणे बंधनकारक असतानाही ते भरण्यास आणि आयकर देण्यास टाळाटाळ करणार्‍या लोकांवर सक्तीने कारवाई करावी आणि वेळ पडल्यास त्यांच्यावर खटले भरून त्यांना शिक्षा द्याव्यात अशा सक्त सूचना केंद्र सरकारच्या अर्थ खात्याने आयकर खात्याच्या अधिकार्‍यांना दिल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून आयकर विवरणपत्र भरण्याबाबत टाळाटाळ करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. २०१३ मध्ये ही संख्या १३ लाख होती. ती २०१५ मध्ये ५९ लाखांवर गेली आहे. याचा अर्थ प्राप्तीकर बुडवण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे असा होतो. आपल्या देशामध्ये आर्थिक व्यवहारात काळ्या पैशाचे प्रमाण मोठे असल्यामुळे प्राप्तीकर बुडवून आर्थिक व्यवहार करणे सोपे जाते. कारण पैशाची देवाणघेवाण तसेच कोणतेही व्यवहार नगदीने करायचे झाल्यास काळ्या पैशात पावती देण्याघेण्याचे बंधन नसते आणि अशा व्यवहारातून निर्माण होणारी संपत्ती किंवा प्राप्ती ही सरकारपासून लपून राहते आणि परिणामी सरकारला त्यापासून मिळणार्‍या प्राप्तीकराला वंचित रहावे लागते.

भारतामध्ये समृध्दी वाढत चालली आहे. लोकांकडे पैसा आला आहे. तरीही आयकराचे उत्पन्न म्हणावे तसे वाढत नाही. याचे कारण म्हणजे हे काळे व्यवहार. आपल्या देशामध्ये कर देणार्‍यांवर नेहमीच अन्याय होतो कारण ते लोक एक नंबरचा व्यवहार करतात. सही करून पगार घेतात. त्यांच्या आर्थिक व्यवहारांची कागदोपत्री नोंद असते. त्यांचे पैशाचे व्यवहार चेकद्वारे होतात. त्यांना प्राप्तीकर चुकवण्याची संधीच नसते. त्यामुळे त्यांना लागू होणारा प्राप्तीकर प्रामाणिकपणे भरत असतात. मात्र काळ्या पैशात व्यवहार करणार्‍या लोकांनी कितीही कमाई केली तरी त्यांना प्राप्तीकर भरण्याची पाळी येत नाही आणि ते लोक त्याची चिंताही करत नाहीत. खरे म्हणजे हा देशद्रोह आहे आणि प्राप्तीकर खात्याची वक्र नजर अशा लोकांकडे वळली तर त्यांच्यावर फार कठोर कारवाई होऊ शकते. परंतु आपल्या देशातली प्राप्तीकर यंत्रणा म्हणावी तेवढी सक्रीयही नाही आणि ती पुरेशीसुध्दा नाही. विवरणपत्र भरण्यात टाळाटाळ करणार्‍या ६० लाख लोकांवर प्रत्यक्ष धाड घालून त्यांचे हिशोब तपासून त्यांच्यावर कारवाई करायची झाली तरी आयकर खात्यामध्ये प्रचंड कर्मचारी आणि अधिकारी लागतील. ते या खात्यात नाहीत आणि अप्रामाणिक लोकांना आपले हिशोब लपवण्याची संधी आहे. त्यामुळे आयकर चुकवला तरी कोणी काही करत नाही हे लोकांन समजून चुकले आहे.

केवळ आयकरच नाही तर कोणताही कायदा पाळण्याच्या बाबतीत लोकांची हीच बेफिकीरीची वृत्ती आहे. कर चुकवला तरी कोणी काही करत नाही, काही होत नाही, शिक्षा होत नाही, कारवाई होत नाही त्यामुळे पैशाचे हिशोब ठेवण्याची गरज नाही आणि आयकर भरण्याचीही गरज नाही. अशी सार्वत्रिक भावना लोकांच्या मनात भरून राहिली आहे. पण गेल्या पाच-सात वर्षात माहिती तंत्रज्ञानात झालेल्या बदलामुळे काही लोकांना तरी आयकराच्या कक्षेत आणण्यात सरकारला बर्‍यापैकी यश येत आहे. ५० हजारांपेक्षा अधिक रुपयांचा भरणा करताना आपला पॅनकार्ड क्रमांक लिहिण्याची सक्ती करण्यात आली आहे. असा व्यवहार आयकर खात्यात नोंदला जातो आणि अधिक पैशाचे व्यवहार करणारे लोक कोण आहेत याचा अंदाज आयकर खात्याला येतो. अर्थात असे असले तरी याही नियमात पळवाटा काढणारे लोक आहेत. असे लोक कितीही मोठा व्यवहार करायचा झाला तरी तो ४९ हजार रुपयात करतात आणि पॅनकार्डची नोंद करणे टाळतात. अशा लोकांवर कारवाई करण्याची काहीतरी तरतूद असली पाहिजे.

आयकराच्या बाबतीत गेल्या पाच वर्षांपासून सरकार एक वेगळी धडपड करत आहे. ज्यांचे उत्पन्न आयकर पात्र आहे परंतु ज्यांचे व्यवहार लेखी नसतात त्यांना आयकराच्या कक्षेत आणण्यासाठी सरकार काही युक्त्या करत आहे. अशा माणसाने व्यवहार लेखी केले नसले तरी मिळालेल्या पैशातून तो काहीतरी खरेदी करतो. असा व्यवहार ५० लाखांच्या पुढचा असल्यास त्याच्याकडे आयकर खात्याने लक्ष द्यावे अशी एक तरतूद सरकारने केली होती. मात्र ती तरतूद फारशी उपयोगी पडलेली दिसत नाही. कारण असे लोक ५० लाखांचा व्यवहार केला तरी तो व्यवहार काळ्या पैशात करतात म्हणजे नोंद करत नाहीत. त्यामुळे ते आयकराच्या कक्षेत येत नाहीत. अनेक स्वयंरोजगारी मोठ्या प्रमाणावर पैसा कमवतात. परंतु त्यांच्या उत्पन्नाची नोंद करण्याची यंत्रणा सरकारकडे नाही. आपण बाजारावर सहज नजर टाकली तरी कितीतरी व्यावसायिक असे आढळतील की ज्यांची उलाढाल लाखोच नव्हे तर करोडोत असते. पण सारा व्यवहार तोंडी. त्यामुळे आयकर खाते त्यांच्या वाटेला कधी जात नाही आणि असे लोक लाखो रुपये कमवूनसुध्दा आयकराचा एक रुपयासुध्दा भरत नाहीत. कुठलेही आर्थिक व्यवहार करताना पॅन क्रमांक लिहिणे किंवा आयकर विवरणपत्र दाखल करणे सक्तीचे केले तर असे स्वयंरोजगारी आयकराच्या कक्षेत येऊ शकतील. तेव्हा पात्र लोकांना कर भरण्याची सक्ती करणे आणि आयकराच्या कक्षेत अधिकाधिक लोकांना आणणे आवश्यक आहे.

Leave a Comment