तणावावर मात कशी करावी?

tension
सध्याच्या युगामध्ये माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू कोणता असा प्रश्‍न विचारला तर जगात कोठेही या प्रश्‍नाचे उत्तर माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू तणाव अशाच वाक्यात दिले जाईल. तणाव येतो आणि जातो. परंतु जाताना तो आपल्या शरीरामध्ये न भरून येणारी हानी करून जातो. तणाव निरनिराळ्या कारणांनी येत असतो आणि तो निरनिरळ्या स्वरूपांचा असतो. तो शारीरिकही असतो आणि मानसिकही असतो. तो वर्तनात्मकही असतो आणि भावनिकही असतो. शारीरिक तणावामध्ये थकवा, डोकेदुखी, निद्रानाश, स्नायूदुखी इत्यादींचा समावेश होतो. त्याचबरोबर हृदयाची धडधड, छातीत दुखणे, पोटात कळा येणे, अन्नावरची वासना उडणे, अधूनमधून सर्दी होणे, घाम येणे हे सगळे शारीरिक तणाव असतात.

मानसिक परिणामामध्ये स्मरणशक्ती कमी होणे, निर्णयात ठामपणा नसणे, विनोदबुध्दी कमी होणे, आकलन कमी होणे, खचल्यासारखे वाटणे, झोप कमी होणे, चिडचिड होणे, नैराश्य जाणवणे, भीती वाढणे, दुसर्‍यावर सतत दोषारोप करणे ही सगळी लक्षणे संभवतात. यातले कोणतेही लक्षण बाह्य घटकांव्यतिरिक्त कशानेही जाणवले आणि औषधाने दुरूस्त झाले नाही तरी असे खुशाल समजावे की हा तणावाचा परिणाम आहे. त्यावर काय उपाय करावा यावर शास्त्रज्ञांनी बरेच मार्गदर्शन केलेले आहे. त्यासाठी पहिली पायरी म्हणजे आपल्याला जाणवणारे हे सारे परिणाम मानसिक तणावाचे आहेत हे मान्य केले पाहिजे. ते मान्य केले नाही तर पुढील उपाय होणे शक्य नाही.

म्हणून उपाय करण्यासाठी आधी आपल्याला आलेला तणाव कशामुळे आलेला आहे याचे विश्‍लेषण करावे. आपल्या आयुष्यातल्या असाधारण घटना, आपल्या समोरच्या समस्या यांचे परीशीलन करावे. त्यामुळे आपला तणाव नेमका कोणत्या समस्येतून उद्भवला आहे याचा बोध होतो. हा तणाव कमी करण्यासाठी सुचवला जाणारा सगळ्यात पहिला इलाज म्हणजे डायरी लिहिणे. डायरी लिहिली म्हणजे आपल्या मनातली खदखद कागदावर उतरते. खरे म्हणजे आपल्या मनावरचा तणाव दुसर्‍याशी बोलल्याने कमी होत असतो. मात्र या जगात आपल्या तणावाचे ओझे घेणारे कोणी नसेल तर हा तणाव मोकळा करण्याचा डायरी हा सगळ्यात चांगला उपाय आहे.

तणाव हा मूलतः मानसिक असला तरी तो बर्‍याच अंशी आपल्या आहारावर अवलंबून असतो. म्हणून साधे अन्न खावे. फळे खावीत. भाजीपाला वापरावा. डाळींचा वापर करावा. त्याचाही एक वेगळा परिणाम आपल्या मनःस्थितीवर होत असतो. संगीत ऐकणे, वाचणे, नाचणे आणि शांत झोप घेणे हेही तणावमुक्तीचेच काही उपाय आहेत. त्यांचा अवलंब करावा. तणावमुक्तीच सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे छंद. साधारण तिशी-पस्तिशीमध्येच या दृष्टीने शोध घेतला पाहिजे आणि आपला छंद निवडला पाहिजे. तो नंतरच्या वयामध्ये आपल्याला विरंगुळा मिळवून देतो आणि तणाव कमी करतो. सगळ्यात सोपा उपाय म्हणजे आपले जुने फोटो काढून पहात बसणे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment