भारत किती श्रीमंत आहे?

currancy
भारत देश किती गरीब आणि किती श्रीमंत या विषयी अनेक प्रकारची आकडेवारी प्रसिध्द होत असते. मात्र या आकडेवारीचे प्रत्येकवेळचे निकष वेगळे असल्यामुळे आपला देश खरोखर श्रीमंत आहे की गरीब आहे याचा निश्‍चित बोध आपल्याला कधीच होत नाही. आता जगातली सातव्या क्रमांकाची आणि आशिया खंडातली चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असे भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन केले जाते. परंतु जगात असा अव्वल क्रमांक मिळवण्याचा मान भारताला मिळण्यामागचे कारण म्हणजे भारत देश मोठा आहे. देश गरीब असला तरी एकंदर लोकसंख्या जास्त असल्यामुळे एकूण उत्पन्नात आपला आकडा मोठा दिसतो आणि मग आपण जगातली सातव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असा मान मिरवायला लागतो.

अशा गरिबी आणि श्रीमंतीमध्ये युरोप खंडातले अनेक देश भारताच्या मागे आहेत. परंतु भारत देश श्रीमंत असला तरी भारतातले लोक मात्र गरीब आहेत. कारण सरासरी उत्पन्नाच्या आकड्याकडे बघायला लागलो की भारताच्या या श्रीमंतीचे रहस्य उघडे होते. एकूण उत्पन्न जास्त असले तरी भारताचे दरडोई उत्पन्न फारच कमी येते. एकूण उत्पन्नाला १३० कोटीने भागले तर दरडोई उत्पन्नाचा आकडा कळतो आणि तो कमी येतो. असा सरासरी दरडोई उत्पन्नाचा आकडा काढण्याचा प्रयत्न केला तर भारताचा जगात १५० वा क्रमांक येतो. अर्थात अर्थव्यवस्थेतले विविध प्रवाह ज्यांना कळतात. त्यालाच हा सातवा क्रमांक म्हणजे काय आणि १५० क्रमांक म्हणजे काय याची कल्पना येऊ शकते.

भारताचे सरासरी दरडोई उत्पन्न १५८६ डॉलर्स दरवर्षी एवढे आहे. याचा अर्थ भारताचा प्रत्येक नागरीक दर महिन्याला सरासरी ८ हजार ८०० रुपयांचे उत्पादन करतो. म्हणजे उलाढाल करतो. ही उलाढाल वस्तूच्या उत्पन्नात जशी असते तशी ती विविध सेवांमध्ये असते. पाकिस्तान आपल्यापेक्षा गरीब आहे असे मानले जाते. परंतु पाकिस्तानचे दरडोई दरसाल उत्पन्न भारताच्या फार कमी नाही. ते १३५८ डॉलर्स एवढे आहे. याबाबतीत युरोप खंडातील मोनॅको हा देश आघाडीवर आहे आणि त्याचे दरडोई दरसाल उत्पन्न १ लक्ष ८७ हजार ६५० डॉलर्स एवढे आहे. म्हणजे ते भारताच्या १२० पटींहूनही जास्त आहे.

Leave a Comment