शिवसेनेची पन्नास वर्षे

shivsena
शिवसेनेच्या स्थापनेला येत्या रविवारी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. तो राजकीय पक्ष आहे आणि राजकीय पक्षाचे अंतिम उद्दिष्ट सत्ता मिळवणे हेच असते. शिवसेनेला दोन अपवाद वगळता महाराष्ट्राची सत्ता मिळवण्यात यश आलेले नाही. परंतु तरीसुध्दा शिवसेना ही महाराष्ट्रातली दखलपात्र राजकीय शक्ती आहे हे नाकारता येत नाही. मराठी भाषा आणि संस्कृती यांचा अभिमान बाळगणारा मोठा वर्ग शिवसेनेकडे आकृष्ट झालेला असतो आणि शिवसेनेचा एक विशिष्ट मतदार वर्ग राज्यात तयार झालेला आहे. त्यामुळे शिवसेनेची शक्ती कमी की जास्त याचा फार विचार न करता शिवसेनेच्या मागे महाराष्ट्रातला एक मोठा मतदार वर्ग उभा आहे. याची दखल घ्यावीच लागते. १९५० च्या दशकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा उभारला गेला. भाषावार प्रांत रचनेच्या संदर्भात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरु यांनी महाराष्ट्रावर अन्याय केला होता. त्यामुळे उभ्या राहिलेल्या महाराष्ट्रातल्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याने मराठी अस्मितेचा झेंडा उंचावला. प्रत्यक्षात शिवसेना या लढ्यात नव्हती तरी या मराठी अस्मितेच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेची स्थापना झाली. त्यामुळे तो महाराष्ट्रातला प्रमुख प्रादेशिक पक्ष ठरलेला आहे.

शिवसेेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात होते. या लढ्याच्या काळात बाळासाहेब हे काही काळ फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी दैनिकात व्यंगचित्रकार म्हणून काम करीत होते आणि तिथे आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्रासाठी जागृती निर्माण करीत असत. नंतर त्यांनी मार्मिक हे स्वत:चे साप्ताहिक स्थापन केले आणि तेेच शिवसेनेचे मुखपत्र झाले. संयुक्त महाराष्ट्र साकार झाला पण महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी मुलांंंना नोकर्‍या मिळेनात. ज्या मुंबापुरीसाठी मराठी माणूस लढला त्या मुंबापुरीत तोच परागंदा होण्याची वेळ आली. ज्या राजकीय पक्षांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा उभारला होता ते पक्ष त्याची स्थापना होताच मुंबईतल्या मराठी माणसाला वार्‍यावर सोडून आपल्या राजकारणात गुंतले. शेवटी या मराठी माणसासाठी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. त्यांनी मराठी माणसासाठी आणि मराठी भाषेसाठी शिवसेनेच्या माध्यमातून जबरदस्त संघर्ष केला. परराज्यातून मुंबईत येऊन कारखाने काढणारे कारखानादार आपल्या कारखान्यात मराठी मुलांना नोकर्‍या देत नाहीत हे दाखवून देण्यासाठी बाळासाहेब स्वत: त्या कारखान्यांना भेटी देत असत. त्यासाठी मोटार सायकलीवरून फिरत असत.

शिवसेनेच्या सुरूवातीच्या काळात तरी बाळासाहेबांनी राजकारणाला रोग म्हटले होते. शिवसेना समाजकारण करील आणि नावापुरते राजकारण करील असे त्यांनी जाहीर केले होते. पण निव्वळ समाजकारण करणार्‍या अशा संघटना फार काळ राजकारणापासून दूर राहू शकत नाहीत. शिवसेना राजकारणात आली पण तीही आपल्या मराठी बाण्याला घेऊन आली. १९७० चे दशक भारतात प्रादेशिक पक्षांच्या वाढीचे दशक मानले जाते. याच काळाच्या आसपास महाराष्ट्रात शिवसेना राजकारणात आली. राजकारणात आल्यामुळे शिवसेनेची भाषाही बदलली. १९६० च्या दशकात मराठी माणसाची नोकरी हा विषय मोठा जिव्हाळ्याचा होता. पण आता मराठी माणसेच अन्य प्रांतात जाऊन नोकर्‍या मिळवत आहेत. त्यामुळे मराठी माणसाला मुंबईत नोकरी हा विषय किंवा मुद्दा फारसा कालोचित राहिलेला नाही. त्यामुळे शिवसेनेला आपला मुख्य मुद्दा किंवा विषय व्यापक करावा लागला आणि त्यातूनच शिवसेना हिंदुत्ववादी धोरणे घेऊन उभी राहिली.

राजकीय पक्ष म्हणून स्थापना झाल्यानंतरची काही वर्षे वगळली तर शिवसेना ही हिंदुत्ववादी राहिली आहे. शिवसेनेने हिंदुत्ववादाचा पुरस्कार केला असला तरीही बाळासाहेबांच्या राजकीय भूमिका नेहमीच वादग्रस्त राहिल्या आणि त्या नंतर बदलल्या गेल्या. बाळासाहेेबांनी १९७५ च्या आणीबाणीचे समर्थन केले होते. काही काळ ते देशात हुकूमशाही असली पाहिजे अशी मागणी करीत असत. मुस्लिमांच्या विरोधात जहाल भाषा वापरून त्यांनी आपला हिंदुत्ववाद प्रखर असल्याचा दावा केला होता पण नंतर ते सगळेच मुस्लिम देशद्रोही नसतात अशी मवाळ भाषा वापरायला लागले. ते हिंदुत्ववादी होते तरीही त्यांनी हिंदुत्वाचे असे काही तत्त्वज्ञान मांडलेले नाही. कडक भाषा वापरणे, इशारे देणे. टीकेचे प्रहार करणे असाच शिवसेनेचा स्वभाव राहिलेला आहे. १९८४ पासून शिवसेनेने महाराष्ट्रात भाजपाशी युती केली पण या युतीला १९९५ चा अपवाद वगळता कधीच सत्ता प्राप्त झाली नाही. आताही या पक्षांची युती आहे पण तिच्यात एवढी कटुता आहे की तिच्यामुळे दोन्ही पक्षांचे हसे होत आहे पण, त्यांना युतीचा धर्म पाळता येत नाही. आता शिवसेना पन्नास वर्षे पूर्ण करून शतकाकडे वाटचाल करीत आहे. ५० वर्षांच्या प्रवासात अनेक कटू प्रसंग आणि चढउतार सहन करीत शिवसेनेने आपला प्रभाव टिकवला आहे. या पुढच्या काळात तिला भाजपाच्या साथीशिवाय वाटचाल करायची आहे. हे शतकी वाटचालीतले आव्हान आहे.

Leave a Comment