उडता भारत

aeroplane
भारतातला ३५ कोटी मध्यमवर्ग आणि या मध्यमवर्गाची वाढलेली क्रयशक्ती हा भारताच्या प्रगतीचा मोठा आधार आहे. या वर्गाच्या खिशातला पैसा जास्तीत जास्त प्रमाणात बाजारात आला तर रोजगार निर्मितीला गती मिळणार आहे. म्हणून हा पैसा व्यवहारात येण्याकरिता विविध उपाय योजावे लागतात. मात्र हा पैसा उगाच असा बाजारात येणार नाही. या मध्यमवर्गाला हव्या असलेल्या सेवा पुरवूनच त्यांच्याकडचा पैसा बाजारात आणावा लागणार आहे. पण तसा विचार करून सरकारने काल भारतातील हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढवण्यासाठी विविध उपायांची योजना जाहीर केली आहे. रेल्वेच्या प्रवासासाठी हा वर्ग वाट्टेल तेवढा पैसा खर्च करायला तयार असतो. वरिष्ठ वर्गाच्या तिकिटाचा दर वाढवला तरी या वर्गाने प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या कमी होत नाही. उलट वरिष्ठ वर्गाच्या तिकिटांची नोंदणी तीन-तीन महिने आधी केली जाते आणि अनेकदा मोठीच्या मोठी प्रतिक्षा यादी असते. या वर्गाला परवडेल असा विमान प्रवास उपलब्ध करून दिला तर या वर्गातले लोक विमानानेही प्रवास करायला तयार आहेत. मात्र त्यासाठी त्यांना डोळ्यासमोर ठेवून विमान वाहतुकीचे धोरण ठरवणे आवश्यक आहे.

असा विचार करून काल केंद्र सरकारने विमान वाहतुकीला चालना देणारे धोरण जाहीर केले. भारतामध्ये विमानातून प्रवास करणार्‍यांची ऐपत असणारा वर्ग ३० कोटी एवढा आहे. परंतु त्यातले ८० लाख लोकसुध्दा नित्य विमान प्रवास करत नाहीत. १३० कोटी लोकसंख्येच्या देशातील केवळ ८० लाख लोक विमान प्रवास करतात. ही गोष्ट काही अभिमानाची नाही. एवढे प्रमाण कमी असूनसुध्दा जगात हवाई प्रवासी वाहतुकीमध्ये भारताचा नववा क्रमांक आहे. लोकांची विमान प्रवास करण्याची फार इच्छा आहे आणि त्यामुळेच भारतातील विमान वाहतुकीचे क्षेत्र दरसाल २२ टक्क्यांनी वाढू शकते. या बाबतीत जगात आपण आघाडीवर आहोत. मात्र ही वाढ व्यवस्थित होईल अशी धोरणे जाहीर करण्याची गरज होती. सरकारने आता विमान वाहतूक सुरळीत व्हावी अशी धोरणे जाहीर करून इसवी सन २०२२ सालपर्यंत विमान प्रवास करणार्‍या ८० लाख लोकांची संख्या कमीत कमी ५ कोटी होईल असे उपाय जाहीर केले आहेत. या पुढे विमान प्रवासाचा दर तासाभराच्या प्रवासासाठी २५०० रुपये असा राहणार आहे. अर्धातास प्रवास असेल तर हा दर १५०० रुपये असा राहील. मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय लोकांना या दराने प्रवास करणे अशक्य नाही. म्हणूनच या दर िनश्‍चितीमुळे विमान प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्याची संभावना आहे.

असे असले तरी विमान प्रवास करणारे लोक काही मोठ्या महानगरातच राहतात असे नाही. असे लोक देशातल्या टायर टू आणि टायर थ्री शहरातूनसुध्दा वसलेले आहेत. त्यांचा विमान प्रवास सुलभ केला तरच हा वर्ग विमान प्रवासाच्या कक्षेत येणार आहे. भारतातल्या केवळ ९० शहरांना नित्य आणि नैमित्तिक विमान वाहतूक उपलब्ध आहे. बाकीच्या २१० शहरांमध्ये हवाई पट्टया आहेत. परंतु त्यांच्यावरून विमान वाहतूक होत नाही. सध्या प्रचलित असलेल्या ९० आणि वापरल्या न जाणार्‍या २१० अशा ३०० हवाई पट्ट्या आणि विमानतळे नित्य वापरली गेली तर २०२२ सालपर्यंत ५ कोटी विमान प्रवासी ही वाढ अगदी सहज शक्य आहे. याचा विचार करून सरकारने या २१० वापरल्या न जाणार्‍या हवाई पट्ट्यांना कार्यरत करण्याचीही योजना केली आहे. या हवाई पट्ट्या न वापरण्याचे कारण त्या फायदेशीर ठरत नाहीत हे आहे. मात्र काही दिवस तोट्यात वाहतूक करून लोकांना विमान प्रवासाची सवय लावली तर काही दिवसांनी या हवाई पट्ट्यासुध्दा नफ्यात येतील. म्हणून सरकारने सुरूवातीच्या काळातील तोट्यावर काही प्रमाणात भरपाई देण्याची घोषणा केली आहे.

हा तोटा सरकारने काही प्रमाणात सहन केला तर या सगळ्या हवाई पट्टया कार्यरत होतील आणि देशात ३०० विमानतळे नित्य वाहतूक करायला लागली तर विमान प्रवासाला चांगलीच गती मिळेल. केेंद्र सरकारने देशांतर्गत हवाई वाहतुकीला चालना देणारी ही योजना जाहीर करण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीलाही चालना दिली आहे. सध्या कोणत्याही विमान वाहतूक कंपनीला वाहतुकीचा पाच वर्षांचा अनुभव असल्याशिवाय परदेशी उड्डाण करता येत नाही. सरकारने आता ही अट रद्द केली आहे. त्यामुळे बर्‍याच कंपन्या परदेशी उड्डाणे करू लागतील आणि त्यांच्यावर एकूण व्यवसायाच्या २० टक्के व्यवहार देशांतर्गत करण्याची सक्ती असल्यामुळे देशांतर्गत उड्डाणांनाही गती मिळेल. सध्या भारतातून १०९ देशात विमान वाहतूक केली जाते. ही संख्या वाढवण्याचीही तरतूद सरकारने केली आहे. भारतातल्या कोणत्याही विमानतळापासून ५ हजार किलोमीटर अंतरापर्यंतची उड्डाणे आता करता येतील मात्र या अंतरावर ज्या देशात वाहतूक करायची आहे त्या देशानेही भारतात वाहतूक केली पाहिजे. या व्यतिरिक्त केंद्र सरकारने काल हेलिकॉप्टरच्या संदर्भातही काही नियम शिथिल केले असून त्यामुळे देशांतर्गत हेलिकॉप्टर वाहतुकीलाही गती येणार आहे आणि त्यांची वाहतूक सोपी होणार आहे. देशात मोठ्या प्रमाणावर हवाई वाहतूक होणे हे प्रगतीचे लक्षण असतेच पण विमान वाहतूक मोठ्या प्रमाणावर झाल्याशिवाय प्रगतीही होत नाही. म्हणजे विमान वाहतुकीचा आणि प्रगतीचा असा परस्परांशी संबंध आहे. या संबंधाला गती दिली की प्रगतीलाही गती मिळते.

Leave a Comment