शुक्राणूंची टंचाई

sperm
अशा प्रकारचा मथळा कधी वाचावा लागेल अशी कल्पनासुध्दा ५० वर्षांपूर्वी कोणी केली नसेल पण चीनमध्ये तशी परिस्थिती उद्भवली आहे आणि चीनच्या सरकारने आपल्या देशातल्या प्रजननक्षम पुरूषांना देशाच्या हितासाठी शुक्राणूंचे दान करण्याकरिता पुढे येण्याचे आवाहन केले आहे. घटना तशी किरकोळ वाटते परंतु तिच्यातून कितीतरी गोष्टींवर प्रकाश पडतो आणि मानवी जात सध्या कोणकोणत्या संकटातून जात आहे याचेही प्रत्यंतर येते. चीनच्या सरकारवर देशातल्या तरुणांकडे शुक्राणूंचे दान करण्याचे आवाहन करण्याची आपत्ती का आली याचा मागोवा घेतला म्हणजे लोकसंख्येकडे बघण्याच्या चुकीच्या दृष्टिकोनामुळे कशा नवनव्या आपत्ती निर्माण होतात याचेही दर्शन घडते. चीनमध्ये १९७६ साली वाढती लोकसंख्या हा धोका आहे अशी सरकारची भावना झाली. समान्यतः लोकसंख्या आणि देशाचे नियोजन या गोष्टींचा वरवर विचार करणार्‍या लोकांच्या मनात वाढती लोकसंख्या म्हणजे देशापुढचे संकट असा अपरिपक्व समज विकसित झालेला असतो. देशाची लोकसंख्या जेवढी कमी होईल तेवढे लोक सुखी होतील अशा चुकीच्या कल्पनेने त्यांना झपाटलेले असते.

चीनमध्ये तर लोकशाही नसल्यामुळे कोणत्याही सरकारी निर्णयावर लोकांचे मत, निर्णयाचा फेरविचार या गोष्टी उद्भवत नाहीत. तेव्हा देशाचे नियोजन करण्याच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या मूठभर लोकांच्या मनामध्ये लोकसंख्येच्या धोक्याची भीती बसली आणि जनतेचा विचार न करता त्यांनी लोकसंख्या वाढीला प्रतिबंध करण्यासाठी मनमानी निर्बंध जारी केले. त्यामध्ये एका दाम्पत्याला एकच मूल असले पाहिजे असा कडक कायदा करण्यात आला. मुलगा असो की मुलगी असो एकाच अपत्यावर दाम्पत्याने संतती थांबवली पाहिजे असा कायदा तर केलाच पण दुसरे अपत्य असणे म्हणजे देशद्रोह असा समज पसरवून दोन अपत्यांना जन्म देणार्‍यांवर जबरदस्त दंड आकारला जायला लागला. अशा प्रकारे केली जाणारी ही सक्ती विचार स्वातंत्र्याचा संकोच करणारी आहे असे कोणताही लोकशाहीवादी माणूस म्हणू शकतो. परंतु चीनच्या हुकूमशाहीमध्ये देशाच्या हितासाठी अशाप्रकारे स्वातंत्र्याचा संकोच करणे उचितच मानले जाते. तसे मानलेही गेले एवढेच नव्हे तर भारतातसुध्दा वाढत्या लोकसंख्येने धास्तावलेल्या काही अर्धवट अर्थतज्ञांनी चीनच्या या कायद्याचे कौतुकही करायला सुरूवात केली. मात्र भारतात असे कौतुक भराला आलेले असतानाच चीनमध्ये मात्र या तथाकथित कौतुकास्पद निर्णयाचे अनेक दुष्परिणाम जाणवायला लागले.

त्यातूनच चीनमध्ये एक दाम्पत्य एक अपत्य हा कायदा बदलण्यात आला आहे. आता त्या देशात एका दाम्पत्याला दोन अपत्ये असण्यास काही हरकत नाही अशी सूट देण्यात आली आहे. त्यामुळे देशातले जन्मदराचे गणित बदलून गेले आहे. १९७६ पासूनची एका अपत्याची सवय आता बदलावी लागणार आहे. मात्र चीन हा प्रगतीशील देश असल्यामुळे देशातल्या जनतेची प्रजननक्षमता घटली आहे. कोणत्याही प्रगत देशामध्ये प्रजननक्षमता घटण्याचे प्रमाण वाढले आहे. म्हणून उत्तर युरोपातील प्रगत देश, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स या देशात लोकसंख्या घटायला लागली आहे. हाच परिणाम चीनमध्येही जाणवायला लागला असून लोकसंख्येतले विनापत्य दाम्पत्यांची संख्या वाढत आहे. एका बाजूला लोकसंख्या वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे तर दुसर्‍या बाजूला लोकसंख्या घटण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशा वेळी कृत्रिम गर्भधारणेचे प्रयोग करून लोकसंख्या वाढवावी लागणार आहे. परंतु या प्रयोगासाठी शुक्राणू बँकेत शुक्राणू डिपॉझिट होण्याचे प्रमाण वाढले पाहिजे. तसे ते वाढत नाही म्हणून चीनच्या सरकारवर आता तरुणांना शुक्राणू दान करण्याचे आवाहन करण्याची पाळी आली आहे.

चीनमध्ये सरकारने आपला निर्णय अचानकपणे बदलला आणि अनेक दाम्पत्यांमध्ये दुसर्‍या अपत्याला जन्म देण्याची खटपट सुरू झाली. मात्र पहिले अपत्य होऊन खूप दिवस झालेले, प्रजननक्षमता संपलेेली, वय वाढलेले आणि दुसर्‍या अपत्याला नैसर्गिकरित्या जन्म देण्याची क्षमता संपलेली अशा अवस्थेत दुसरे मूल हवे असेल तर त्यासाठी फर्टिलिटी सेंटरकडे धाव घेणे आणि जमेल त्या प्रकारांनी दुसरे अपत्य प्राप्त करणे हे चीनी दाम्पत्यांसाठी अपरिहार्य ठरले आहे. त्यातूनच शुक्राणू बँकांमध्ये प्रजननक्षम तरुणांचे शुक्राणू जमा करण्याचा प्रयास करणे अटळ ठरले आहे. ते अटळ ठरले असले तरी चीनी तरुण शुक्राणू दान करण्यास फार उत्सुक नाहीत. त्यातून ही टंचाई उद्भवली आहे आणि आपण कधी कल्पनाही करू शकलो नसतो असे आवाहन सरकारला करावे लागले आहे. आज चीनमध्ये जी आपत्ती कोसळली आहे ती इतर कोणत्याही देशात कधीही कोसळू शकते. कारण एकूणच जगातल्या सर्व प्रजननक्षम पुरुषांमध्ये शुक्राणूंचे प्रमाण घटत चालले आहे. प्रजननक्षमता शून्यावर आली आहे आणि ज्यांच्या शरीरात शुक्राणू तयार होतात त्यांच्यात शुक्राणूंचा जोम कमी झाला आहे. खाण्यापिण्याच्या सवयी, व्यसने आणि तणाव यातून हा अभाव निर्माण झालेला आहे. म्हणूनच जगातल्या कोणत्याही देशातून चीनसारखेच हे आवाहन करण्याची वेळ कधीही येऊ शकते.

Leave a Comment