शिवसेनेचे तर्कट

shivsena2
शिवसेनेचे गेल्या दोन-तीन वर्षातले राजकारण ज्या दिशेने चाललेले आहे ती दिशा योग्य आहे का यावर संशोधन होण्याची गरज आहे. कारण सर्वसामान्य कुवतीच्या आणि राजकारणात बर्‍यापैकी रस आणि गती असलेल्या सामान्य माणसाला तरी शिवसेनेचे सध्या सुरू असलेले राजकारण म्हणजे एक पोरखेळ वाटायला लागला आहे. कदाचित या राजकारणाला पोरखेळ म्हणणार्‍यांची राजकीय कुवत कमी असेल आणि उध्दव ठाकरे, संजय राऊत असे सध्याच्या राजकारणाचे शिल्पकार फारच दूरदृष्टीचे आणि राजकीय डावपेचात मोठे परिपक्व असतील. मात्र सध्या त्यांचा जो खेळ चाललेला आहे त्या खेळात एका बाजूला ते भाजपाशी युती करून सरकारमध्ये सहभागी होत आहेत. पण दुसर्‍या बाजूला सरकारवर अतीशय कठोर शब्दामध्ये टीकाही करत आहेत. ही टीका एवढी जहरी, एवढी बोचरी आणि कधी कधी शिवराळपणा धारण करणारी आहे की अशी टीका करणारा शिवसेना हा पक्ष याच सरकारमध्ये आहे यावर कुणाचा विश्‍वाससुध्दा बसणार नाही. मात्र आपण ज्या सरकारवर एवढी कडवट टीका करत आहोत त्याच सरकारचे आपण एक भाग आहोत हे त्यांच्या लक्षात का येत नाही, असा प्रश्‍न कोणालाही पडतो.

तसा विचार केला तर शिवसेनेचे आजचे नेते उध्दव ठाकरे आणि भाजपावर टीका करण्यास सतत तोंड वाजवणारे संजय राऊत यांच्यासारखे नेते हे काही फार मोठे राजनीतीज्ञ आहेत असे कधी दिसले नाही. उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांची तर गोष्टच सोडा पण खुद्दा बाळासाहेब ठाकरे यांनीसुध्दा कधी फार चाणाक्षपणे, चतुराईने राजकारण केले आहे असे कधी आढळलेले नाही. म्हणूनच महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा आणि संस्कृतीचा एवढा टोकाचा अभिमान बाळगूनसुध्दा शिवसेनेला स्वतःच्या बळावर कधीच सत्तेवर येता आलेले नाही. १९९५ साली शिवसेनेला सत्ता मिळाली होती परंतु तीसुध्दा भाजपाशी युती करून मिळाली होती. युतीलासुध्दा स्पष्ट बहुमत नव्हते. ते स्पष्ट बहुमत दाखवण्यासाठी १२ अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवावा लागला होता. म्हणजे शिवसेनेच्या आजवरच्या इतिहासातील सर्वोच्च यश हे असे लंगडे होते. यावरून शिवसेनेच्या नेत्यांची डावपेचातली परिपक्वता किती मर्यादित आहे हे लक्षात येते. आता त्यांनी सरकारमध्ये राहून भाजपावर टीकेचे प्रहार करण्याचा जो डाव लढवायला सुरूवात केली आहे त्यामागे कोणते तर्कशास्त्र असेल याचा अजून तरी कोणाला लाग लागलेला नाही. कदाचित ही दुहेरी नीती असेल.

भाजपाने चांगले सरकार दिले तर त्याचे श्रेय आपल्याला मिळून पुढच्या निवडणुकीत आपल्याला चांगल्या जागाही मिळतील पण तसे भाजपाला शक्य झाले नाही तर भाजपावर एवढी टीका करायची की पुढच्या निवडणुकीत लोकांनी आपल्याकडे सत्ताधारी म्हणून न पाहता विरोधक म्हणून पाहावे. म्हणजे २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजपाच्या बाजूने वारे वाहिले तरी आपलाच विजय व्हावा आणि न वाहिले तरी आपलाच विजय व्हावा असे काहीसे डावपेच असावेत असे वाटायला लागते. उध्दव ठाकरे यांनी समजून उमजून आणि राजकारणातली चाल म्हणून हे धोरण स्वीकारले आहे की भाजपाचे नेते फार किंमत देत नाहीत म्हणून चिडून अशा दुगाण्या झाडायला सुरूवात केली आहे हे काही कळत नाही. परंतु त्यांनी डावपेचाचा भाग म्हणून ही नीती अवलंबिली असेल तर त्यांनी अशी नीती अवलंबिलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काय झालेले आहे हे पाहिले पाहिजे. शरद पवार यांनीही महाराष्ट्रात १५ वर्षे हा प्रयोग केला होता. म्हटले तर सत्तेत राहायचे आणि जाहीर सभेत मात्र विरोधी पक्षात असल्यासारखे बोलायचे असा फंडा पवारांनी राबवला होता. परंतु जनतेने २०१४ साली कॉंग्रेसलाही झिडकारले आणि राष्ट्रवादीलाही बेदखल करून टाकले.

शिवसेनेची नीती ही जाणून बुजून आखलेली नसावी असेच वाटते. कारण शिवसेनेतच असा एक गट आहे की जो भाजपा सरकारच्या कामावर खुष आहे. काल संजय राऊत यांनी भाजपाच्या सरकारला निजामाच्या बापाचे सरकार म्हटले. खरे म्हणजे अशा प्रकारचे उद्गार काढणे हे बेजबाबदारपणाचे तर आहेच पण त्या म्हणण्यामागे कसलेही तर्कशास्त्र नाही. निजामाचा बाप कोण आणि त्याने नेमके काय केले होते. याचा कसलाही दाखला राऊतांनी दिला नाही निजामाचा बाप दुष्काळ पडला असताना परदेश दौरे काढत होता का किंवा दुष्काळ पडला तरी दुष्काळी भागाला भेट देत नव्हता का? या संबंधात इतिहासाची कितीही पुस्तके चाळली तरी काही माहिती मिळत नाही. तेव्हा निजामाचा बाप हे विशेषण राऊतांच्या सडक्या डोक्यातून कसे काय निघाले हे काही समजत नाही. उलट आजच शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी आपले सरकार म्हणजे फडणवीस यांचे सरकार चांगले काम करत असल्याचे म्हटले आहे. केंद्रात मंत्री असलेल्या शिवसेनेचे नेते अनंत गिते यांनीही शिवसेनेच्या नेत्यांना मोदी सरकारवर टीका न करण्याचा सल्ला दिला आहे. कारण सरकारचा कारभार उत्तम चालला आहे अशी त्यांची खात्री आहे. मग उध्दव ठाकरे आणि संजय राऊत हे नेमके का दुखावले आहेत आणि त्यांची नेमकी व्यथा काय आहे हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले पाहिजे. उगाच तर्काला सोडून काहीतरी आरोप करत बसले तर त्यांचेच नुकसान होणार आहे.

Leave a Comment