परीक्षा आणि निकाल खास बिहारष्टाईल

bihar
शिक्षणाच्या क्षेत्रातला अनाचार ही काही नवी गोष्ट नाही. परंतु बिहारमध्ये हा अनाचार खास बिहार स्टाईलने प्रकट होत असतो. तिथल्या बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील एका महाविद्यालयात १ हजार ७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ते सर्व विद्यार्थी बारावीला पास तर झालेच परंतु ते सगळे पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. त्यातल्या २२२ जणांना एकसारखे मार्क होते. कला शाखेच्या गुणवत्ता यादीत तिसर्‍या क्रमांकावर आलेल्या मुलीच्या वडीलांना आपल्या मुलीची ही गुणवत्ता कळल्यानंतर धक्काच बसला. आपली मुलगी दहावीला दुसर्‍या श्रेणीत उत्तीर्ण झाली होती मग बारावीत ती मेरिटमध्ये कशी आली याचे आश्‍चर्य त्यांना वाटले. अर्थात या आश्‍चर्याचा उलगडा व्हायला फार वेळ लागला नाही. गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या या मुलांच्या मुलाखती जेव्हा टी. व्ही. वर लागल्या तेव्हा त्या मुलांना सामान्य प्रश्‍नांची उत्तरेसुध्दा येत नाहीत हे हजारो लोकांच्या लक्षात आले आणि गुणवत्ता यादीत आलेल्या मुलांना मुक्तपणे कॉपी करण्याची परवानगी मिळाली होती आणि त्यांना उत्तर पत्रिका लिहिताना शिक्षकांनी मदत केलेली होती. हे सर्वांना समजून चुकले.

आता मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या सगळ्या प्रकाराची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे आणि काही काही महाविद्यालयांचे निकाल कसे संशयास्पद आहेत हे स्पष्ट व्हायला लागले आहेत. एका महाविद्यालयातील ४६३ विद्यार्थ्यांपैकी ४५९ मुले पहिल्या वर्गात आलेली आहेत. हे महाविद्यालय बेगुसराय जिल्ह्यातले आहे. तर समस्तपूर जिल्ह्यातल्या एका महिला महाविद्यालयात ६०१ विद्यार्थिनीपैकी ५८२ विद्यार्थिनी पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाल्या आहेत. अशा प्रकारची निकालाचे विक्रम करणारी महाविद्यालये बहुत करून खासगी अनुदानित महाविद्यालये आहेत आणि त्यातली बरीच महाविद्यालये पुढार्‍यांच्या मालकीची आहेत. वर उल्लेख केलेल्या मुलीचे महाविद्यालय बी.आर. कॉलेज म्हणून ओळखे जाते. त्या कॉलेजचा प्राचार्य बच्चा राय तसेच संचालक अमितकुमार हे सारे लोक लालूप्रसाद यांचे निकटवर्ती आहेत. संशयास्पद निकाल आणि मोठ्या प्रमाणावर कॉप्या करण्याबाबत प्रसिध्द असलेली बहुतेक महाविद्यालये लालूजींच्या कृपेने चाललेली असतात. यातूनच लालूप्रसाद यांनी आपला एक खास बिहार पॅटर्न निर्माण केलेला आहे. नितीशकुमार यांनी मात्र यावर्षी या पॅटर्नला धक्का लावायचे ठरवले आहे आणि नुकतीच पार पडलेली दहावी, बारावीची परीक्षा कॉपीमुक्त कशी होईल या दृष्टीने मोठी मोहीम सुरू केली आहे.

या वर्षी दहावीच्या वर्गाला १३०९ केंद्रांमधून १५ लाख ७० हजार मुले बसली होती. त्यातल्या २ हजार विद्यार्थ्यांना कॉपी करताना अटक करण्यात आली आणि कॉपी करण्यास मदत करणार्‍या हजारो लोकांना कोर्टात खेचण्यात आले. कॉप्या करण्याची कारणे अनेक असतात. अन्य राज्यात कॉपी होत नाही असे नाही. पण बिहारमधली कॉपी काही विशिष्ट कारणांमुळे होते. बिहार सरकारने शाळांना द्यावयाचे अनुदान शाळांच्या निकालाशी निगडित केले आहे. शाळेतले जेवढे विद्यार्थी पहिल्या श्रेणीत पास होतील तेवढ्या विद्यार्थ्यांमागे शाळेला दरडोई ४ हजार रुपये एवढे अनुदान दिले जाते. द्वितीय श्रेणीत येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी दरडोई साडेतीन हजार अनुदान असते आणि तृतीय श्रेणीसाठी तीन हजार रुपये म्हणजे शाळेतले जेवढे विद्यार्थी पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण होतील तेवढे जास्त अनुदान संस्थेला मिळते. म्हणून शाळा आपल्या अधिकाधिक विद्यार्थ्यांना पहिल्या श्रेणीत आणण्याचा प्रयत्न करतात आणि त्यापायी वाट्टेल ते करतात. आता ज्या महाविद्यालयाचे पितळ उघडे पडले आहे त्या महाविद्यालयातल्या सार्‍या प्रश्‍नपत्रिका परीक्षा मंडळाने केलेल्या तपासणीच्या विभागणीला शह देऊन एका विशिष्ट गावातच पाठवल्या गेल्या होत्या. त्यावरून अनुदानासाठी हा सारा खेळ कसा केला जातो हे लक्षात येते.

नितीशकुमार यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून कॉपीमुक्त परीक्षेचा अट्टाहास केला आहे. त्यामुळे कॉप्या करून पास होण्याची सवय असणार्‍यांना यावेळी चिंता लागून राहिली आहे. मात्र शेवटी हे विद्यार्थी बिहारमधले आहेत हे विसरता येत नाही. त्यांनी या चिंतेवर मात केली आहे. या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्तर पत्रिकांमध्ये चलनी नोटा टाचून उत्तर पत्रिका तपासणार्‍याला लाच देऊन मार्क वाढवायला सुरूवात केली आहे. यावर्षी अनेक उत्तरपत्रिका अशा नोटा लावलेल्या आढळल्या. या नोटा तिथे लावताना या विद्यार्थ्यांनी विनंतीवजा चार वाक्ये लिहिलेली आहेत. काही पेपर्समध्ये या परीक्षेवर आपले लग्न अवलंबून असल्याचे म्हटले आणि आपले लग्न व्हावे म्हणून त्याला पास करावे अशी विनंती केली आहे. ती विनंती करून तिथे हजार रुपयांची नोट लावलेली आहे. काही विद्यार्थ्यांनी हजाराची नोट लावून त्याच्याखाली ज्या ओळी लिहिल्या आहेत त्यामध्ये आपल्याला या विषयाची ट्यूशन लावता आली नाही म्हणून आपला पेपर चांगला नाही. तरी आपल्याला पास करावे अशी विनंती केली आहे. एखाद्या अशाच विनंतीमध्ये या विषयाला आपल्या शाळेत शिक्षकच नव्हता तेव्हा उत्तर पत्रिका तपासणार्‍या शिक्षकाने ही अडचण विचारात घेऊन आपल्याला पास करावे अशी विनंती केली आहे. एकंदरीत बिहारमध्ये चाललेल्या या प्रकारांनी बिहारच्या शिक्षण व्यवस्थेवर झगझगीत प्रकाश पडला आहे.

Leave a Comment