कॉंग्रेसची घसरण

congress
कॉंग्रेस पक्षाची अवस्था मोठी दयनीय होत आहे. पक्षाला दिशा देणारे नेतृत्व नसल्याने भवितव्य काय असा प्रश्‍न विचारला जात आहे. अशा बिकट अवस्थेतच काही कॉंग्रेस नेते पक्षापासून दूर जात असून पक्षावरचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. कालच त्रिपुरात कॉंग्रेसच्या सहा आमदारांनी पक्षाचा त्याग करून तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्रिपुरात गेल्या २० वर्षांपासून डाव्या आघाडीचे सरकार असून माणिक सरकार हे सलग तीन वेळा मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांचा पराभव करून कॉंग्रेसच्या हाती सत्ता यावी यासाठी तिथे कॉंग्रेसचा आटापिटा चालला असतानाच तिथे कॉंग्रेसला भगदाड पडले आहे. त्रिपुरा हे ईशान्य भारतातले छोटे राज्य असून तिथल्या विधानसभेत ६० सदस्य आहेत. त्यातले १० सदस्य कॉंग्रेसचे होते. त्यापैकी सहा जणांनी तृणमूल कॉंग्रेसची साथ करण्याचे ठरवले असून आता या विधानसभेत कॉंग्रेसचे केवळ तीन आमदार शिल्लक राहिले आहेत. केवळ साठ आमदार असलेल्या या छोटेखानी राज्यात कॉंग्रेसला असा धक्का बसावा याला किती महत्त्व देणार आणि अशा लहान राज्यात असा धक्का बसला म्हणून कॉंग्रेसचे असे किती नुकसान होणार आहे असा प्रश्‍न कोणीही विचारू शकतो.

कॉंग्रेसची ही पिछेहाट म्हणावी तशी किंवा समजली जात आहे तेवढी सामान्य नाही. आसामच्या पाठोपाठ ईशान्येतल्या राज्यात हा धक्का बसला आहे म्हणून तो निश्‍चितच सूचक आहे. आसामात कॉंग्रेसच्या हातून सत्ता गेली आणि भारतीय जनता पार्टीने आसामसह ईशान्येतल्या सातही राज्यातून कॉंग्रेसची हकालपट्टी करण्याच्या हेतूने ईशान्य भारतातल्या सगळ्या कॉंग्रेसेतर पक्षांची आघाडी तयार केली आणि पूर्ण ईशान्य भारत कॉंग्रेसमुक्त करण्याचा चंग बांधला. या भागातल्या जनतेला कॉंग्रेसशिवाय अन्य पक्षच माहीत नव्हता. त्यामुळे ते एकतर कॉंग्रेसला साथ देत किंवा त्या त्या राज्यातल्या प्रादेशिक पक्षाला तरी साथ देत असत. कॉंग्रेस पक्षाचे नेते आपल्या दिल्लीतल्या सत्तेच्या जोरावर या राज्यांतल्या जनतेला कच्छपी लावत होते. पण आता कॉंग्रेसला सार्‍या देशातच हादरे बसत आहेत. तसे हादरे ईशान्य भारतात बसले तर निदान हा भाग आणि त्यातली सात आठ राज्ये तरी कॉंग्रेसमुक्त होतील असे वाटून भाजपाने त्या दिशेने पावले टाकायला सुरूवात केली. आसाम तर कॉंग्रेसच्या हातातून निसटलेच पण त्याच्या आधी अरुणाचल प्रदेशात कॉंग्रेसमध्ये बंडाळी माजून तिथले सरकार जाण्याच्या बेतात होते. कायदेश्ीर कटकटीमुळे तिथल्या सरकारला संजीवनी मिळाली खरी पण ईशान्य भारतात आता कॉंग्रेसची सद्दी संपली असल्याचे संकेत मिळाले.

आसामात पक्षाची पडझड सुरू असतानाच मेघालयात कॉंग्रेसच्या सरकारला धक्के बसत होते. तिथे सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस सरकारात दुफळी माजली. ते राज्य कॉंगे्रसच्या हातातून कधी निसटतेय याचा काही नेम नाही. आता त्रिपुरात गडबड सुरू झाली. तिथे काही कॉंगे्रसच्या हातात सत्ता नव्हती पण तिथला विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेसला मान्यता होती. सत्ता नाही तरी नाही निदान प्रमुख विरोधी पक्ष असे स्थान तरी होते. राज्यातल्या राजकारणाच्या ध्रुवीकरणात पर्यायी पक्ष म्हणून तरी कॉंग्र्रेसचे स्थान होते पण आता विधानसभेतले पक्षीय बलाबल बदलले आहे. दहा कॉंग्रेस आमदारांपैकी सहा आमदार तृणमूलमध्ये गेल्याने आता केवळ चारच आमदार राहिले. म्हणजे कॉंग्रेसपेक्षा तृणमूल कॉंग्रेसचे आमदार जास्त झाले. आता पर्यायी पक्ष म्हणून तृणमूल कॉंग्रेसकडेच पाहिलेे जाणार. म्हणजे तिथूनकॉंग्रेसचे उच्चाटन होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भाजपाने तिथे कॉंग्रेस मुक्तीचा नारा दिला आणि या घटना घडल्या त्यामुळे भाजपाच्या नेत्यांना आनंद होईल हे नक्की पण कॉंग्रेस जाऊन तृणमूलची मुळे घट्ट होत आहेत ही गोष्ट भाजपाच्या आनंदावर विरजण टाकणारी आहे.

त्रिपुरात कॉंग्रेसला गळती लागण्यास कॉंग्रेसची दुहेरी नीती कारणीभूत ठरली. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने डाव्या आघाडीशी मैत्री करण्याबाबत ही नीती अवलंबिली होती. कॉंग्रेस पक्ष केरळात डाव्या आघाडीच्या विरोधात उभा होता आणि कॉंग्रेसचे नेते तिथे डावी आघाडी कशी कालबाह्य तत्त्वज्ञान सांगत असते याची माहिती देत असत पण हेच कॉंग्रेसचे नेते प. बंगालात मात्र डाव्या आघाडीशी मैत्री करीत होते तसेच तिथे त्यांना साम्यवाद्यांचे कालबाह्य तत्त्वज्ञान खटकत नव्हते. या नीतीने त्रिपुरातले कॉंग्रेस नेते नाराज होते. कारण त्यांना आपल्या राज्यात डाव्या आघाडीशीच लढावे लागते. केरळ आणि प. बंगालात दुहेरी नीती एकवेळ फार खटकली नसेल पण बंगाल आणि त्रिपुरात तसे करून चालले नाही कारण त्रिपुरा आणि बंगाल ही दोन राज्य अगदी जवळ जवळ आहेत. तिथल्या आमदारांनी कॉंग्रेसला रामराम ठोकताना नेमका याच मुद्याचा उल्लेख केला. अशा रितीने कॉंग्रेसने गेल्या विधानसभा निवडणुकीत डाव्या आघाडीशी बंगालात दोस्ती आणि केरळात कुस्ती अशी संधीसाधू निती अंमलात आणून आपलेच नुकसान करून घेतले. या नीतीचा पक्षाला बंगालात काहीही फायदा झाला नाही. पण बदनामी मात्र झाली. आता शेजारच्या सगळ्याच राज्यात कॉंग्रेस पक्षाची प्रतिमा वाट्टेल ते करणारा पक्ष अशी झाली आहे. जी प्रतिमा फार घातक ठरणार आहे.

Leave a Comment