नाटोचे शक्तिप्रदर्शन

nato
शीतयुद्ध संपून आज दोन दशकापेक्षा जास्त काळ लोटला आहे. शीतयुद्ध ही संकल्पना मुळात बलाढ्य अमेरिका आणि शक्तिशाली सोविएत महासंघ यांच्या संदर्भात १९४५ ते १९९० पर्यंत चाललेल्या छुप्या लढायांबद्दल वापरली जाते. यात गंमत म्हणजे अमेरिका आणि सोविएत महासंघ (आताचा रशिया) हे फार क्वचितच समोर समोर उभे ठाकले, पण एकूणच एकमेकांनी त्यांच्या दोस्त राष्ट्रांना प्यादी बनवून छुप्या अगर प्रत्यक्ष लढायांचे बेत आखले. शीतयुद्ध सोविएत रशियाच्या विघटनानंतर संपुष्टात आले ते साधारण १९९० च्या दशकामध्ये!

मात्र सध्या तेच शीतयुद्ध परत चालू होते आहे का अशी धारणा जगातील आंतरराष्ट्रीय अभ्यासक आणि तज्ज्ञांमध्ये निर्माण होत आहे. याला कारण म्हणजे नाटो या आंतरराष्ट्रीय लष्करी संघटनेचा पोलंडमध्ये चालू झालेला शीतयुद्धानंतरचा पूर्व युरोपमधला सगळ्यात मोठा लष्करी सराव. नाटो या लष्करी संघटनेमध्ये सध्या उत्तर अमेरिका आणि युरोप मधील देश मिळून २८ सदस्य देश आहेत. दि. ४ एप्रिल १९४९ रोजी उत्तर अटलांटिक करार होऊन आजची नाटो संघटना अस्तित्वात आली. मुळात नाटोचा पूर्वीपासूनचा आणि आताचा उद्देश सुद्धा महाकाय रशियाच्या विरोधात युती करून युरोपला एक अभेद्य कवच निर्माण करण्याचा आहे. युरोपला जवळ घेऊन रशियाचा बंदोबस्त करण्यामागे चतुर अमेरिका आहे; हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. जसा अमेरिकेचा वरचष्मा जगातल्या सगळ्या जागतिक संघटनांमध्ये आहे तसाच तो नाटोमध्येही आहे.

लष्करी सरावाबद्दल बोलायचे झाल्यास हा सराव वॉर्सा या पोलंडच्या राजधानी जवळच सुरु झाला आहे. या लष्करी सरावाचे नाव “अॅनाकोंडा-२०१६” असून २४ देशांचे ३१ हजार सैनिक आणि हजारो विविध प्रकारची सैनिकी वाहने या सरावात भाग घेत आहेत. हा सराव १० दिवस चालणार आहे. या सरावाचे वैशिष्ट्य म्हणजे १९४१ साली नाझी जर्मनीने तेंव्हाच्या सोविएत रशियावर केलेल्या आक्रमणानंतर प्रथमच जर्मन रणगाडे पश्चिम ते पूर्व असा प्रवास करणार आहेत.

शीतयुद्धजन्य परिस्थिती उद्भवण्याला सुरवातीला रशियाने सुरवात केली. यातला पहिला मोहरा म्हणजे युक्रेन. युक्रेन मध्ये सध्या राजकीय अस्थिरता आहे आणि युक्रेनला राजकीयदृष्ट्या अस्थिर बनविण्यामागे रशियाचे सर्वेसर्वा पुतीन यांचा हात असल्याची चर्चा आहे. कारण क्रायमिया या युक्रेनच्या भूभागावर पूर्वी पुतीन यांनी रशियन फौजा पाठवून वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता. हे झाले युक्रेनचे! मात्र एकूणच असे चित्र आहे की अमेरिकेला पूर्व युरोपला वाचवायचे असल्याने बाल्टिक देशांना एक प्रकारचे संरक्षण देण्याचा अमेरिकेचा उद्देश दिसतो. सध्या परत शीतयुद्ध चालू होणे परवडणारे नाही याची अमेरिकेला आणि रशियाला संपूर्ण जाणीव आहे, तरीही अमेरिकेने धाडस करून नाटोचा लष्करी सराव विशेष करून पोलंडमध्ये घेतल्याने सध्या तरी एका नवीन वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसत आहेत.

Leave a Comment