अपघातांची मालिका थांबणार कधी?

express-highway
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दोनच दिवसांपूर्वी भीषण अपघात होऊन १७ जण ठार तर ४१ जण जखमी झाले. या भीषण अपघातांची चर्चा थांबतेय न थांबते तोच याच मार्गांवर तीन अपघात झाले आणि त्यात एकाचा मृत्यू होऊन ६ जण जखमी झाले. एक्स्प्रेस वे हा सहा पदरी मार्ग वाहनांचा वेग वाढण्यासाठी आणि प्रवासाचा वेळ कमी होण्यासाठी तर आहेच परंतु वाहनांची वाहतूक अधिक सुरळीत आणि सुरक्षित व्हावी हाही त्यामागचा हेतू आहे. या दोन हेतूपैकी अती वेगाचा हेतू तर साध्य झालाच परंतु सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीचा हेतू साध्य झालेला आहेच असे काही सांगता येत नाही. कारण या मार्गावर अजूनही अपघातांची मालिका जारी आहे. इसवी सन २००० मध्ये हा एक्स्प्रेस वे तयार झाला. तेव्हापासूनची सगळीच आकडेवारी काही उपलब्ध नाही. परंतु २००६ पासून उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार या १० वर्षात ४ हजार ४५९ अपघात झाले असून त्यात आतापर्यंत १२५४ जणांचे प्राण गेले आहेत. भारतात रस्ते अपघातांचे प्रमाण मोठे आहेच परंतु ६ पदरी आणि ४ पदरी अशा रुंद मार्गांवरही असे अपघात वारंवार व्हावेत हे मोठे दुर्दैवाचे आहे.

अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी सरकारची धडपड असतेच. म्हणूनच सरकारने अनेक पदरी रस्त्यांचा आग्रह धरलेला आहे. महाराष्ट्रात तर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी येत्या ५ वर्षात १ लाख किलोमीटर रस्त्यांचे रूंदीकरण करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. गडकरी यांच्या कामाचा वेग पाहिला तर एवढ्या रस्त्यांचे रूंदीकरण होऊनही जाईल परंतु अपघातांच्या मागे केवळ रस्ते हे एकमेव कारण नसते. मानवी चुकाही अपघातास कारणीभूत ठरत असतात. रस्ता कितीही सुरक्षित असला तरी तेवढे पुरेसे नाही. रस्त्यावरून जाणार्‍या वाहनांमध्ये किती प्रवासी कोंबावेत, वाहन चालवणार्‍या वाहकाने सलग किती तास ड्रायव्हिंग करावी आणि किती वेगाने वाहन चालवावे यावर सरकारचे सातत्याने लक्ष असणे शक्य नाही. त्यामुळे वाहनाच्या वेगाची मर्यादा न पाळणार्‍या लोकांमुळे होणारे अपघात टळू शकत नाहीत. म्हणजे अपघातांना मानवी चुका कारणीभूत होतात. या मानवी चुकांची साखळी वाहतुकीची परवाने देण्यापासून सुरू होते. तिथून ते अती वेगाने वाहने चालवण्याची प्रवृत्ती इथंपर्यंत लोक अपघातांना कारणीभूत ठरतात. परिवहन मंत्री नितीन गडकर यांनी काही दिवसांपूर्वी वाहतुकीचे परवाने म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स देण्यामध्ये किती प्रकारचा भ्रष्टाचार होतो हे स्वतःच जाहीर केले आहे.

शासनाच्या विविध खात्यांमध्ये कसा कसा आणि किती भ्रष्टाचार होतो याच्यावर वारंवार चर्चा होते आणि सर्वसाधारणतः भ्रष्टाचाराच्या बाबत पोलिसांना पहिला क्रमांक देऊन आपण मोकळे होतो परंतु या क्षेत्रातल्या काही तज्ञांच्या मते सार्वजनिक बांधकाम आणि परिवहन या खात्यात सर्वाधिक भ्रष्टाचार होत असतो. म्हणून गडकरी यांनी देशात दिल्या जाणार्‍या वाहतूक परवान्यांपैकी ३५ टक्के परवाने हे बनावट असतात असे म्हटले आहे. असे बनावट परवाने असणारे ड्रायव्हर्स ही व्यवस्थेला लागलेली कीड आहेच परंतु रस्त्यावरून वाहतूक करणार्‍या अन्य वाहनांच्या मालकांसाठीसुध्दा तो धोका आहे. व्यवस्थित परवाने न दिलेले हे वाहक वाहतुकीच्या नियमाबाबत कधीच दक्ष नसतात. उलट आपण वाहतुकीचे नियम डावलून हमखास वाहतूक केली पाहिजे याबाबत ते गरजेपेक्षा जास्त दक्ष असतात. त्यामुळे वेगाची मर्यादा न पाळणे, टोल नाक्यावर भरधाव गाडी लेन तोडून दुसर्‍या लेनमध्ये घेणे अशा प्रकारातून ते अपघातास कारणीभूत ठरतात. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर झालेल्या एकूण अपघातांपैकी ८४ टक्के अपघात हे अशा प्रकारच्या मानवी चुकांमुळे होतात असे पाहणीत आढळले आहे.

भारतात रस्ते अपघातात मरणार्‍यांची संख्या मोठी आहे आणि त्यावरून भारतीय किती बेशिस्त आहेत. यावर प्रकाश पडत असतो. या बेशिस्तीमध्ये बेफाम वेगाने गाड्या चालवणे, चुकीच्या पध्दतीने ओव्हर टेक करणे आणि लेन तोडणे या गोष्टी प्रामुख्याने आढळतात. काही वेळा वाहनातून प्रवास करणारे प्रवासीही वाहनाच्या वाहकाला गाडी वेगाने चालवण्याबाबत प्रोत्साहित करत असतात. अशा वेगवान प्रवासामुळे वेगाची झिंग पुरी होत असली तरी हा आपल्या आणि वाहकाच्या जीवाशी खेळ असतो. याची जाणीव त्यांना नसते. विशेषतः लग्न, साखरपुडा, वधू परीक्षा आणि देवदर्शन अशा कार्यक्रमाला जाणार्‍या लोकांमध्ये ही बेशिस्त जास्त दिसते. वाहनात मर्यादेपेक्षा अधिक माणसे भरणे. वाहन नादुरूस्त असतानाही तसेच वापरणे वाहकाला कित्येक तास आणि रात्रीही ड्रायव्हिंग करावयास भाग पाडणे असे प्रकार या समारंभाला जाणार्‍या लोकात आढळतात. भारतात वाहनांची संख्या वाढत आहे. वाहने वापरणार्‍यांची संख्या वाढत आहे. मात्र रस्ते आहेत तेवढे आहेत आणि वाहतुकीच्या नियमाबाबतची बेफिकीरी वाढत आहे. त्यामुळे स्वातंत्र्य मिळून एवढी वर्षे झाली तरी सुरक्षित वाहतूक हे आव्हानच राहिलेले आहे. या बेदरकारीमुळे दरमहा हजारो कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. परंतु बेदरकारी कमी होण्याची काही चिन्हे नाहीत.

Leave a Comment