राहुल गांधी पर्व

rahul-gandhi
कॉंग्रेस पक्षात आता राहुल गांधी यांचे पर्व सुरू होणार याचे निश्‍चित संकेत मिळाले आहेत. पक्षामध्ये घराणेशाही एवढी पक्की आहे की आताच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी निवृत्तीचे संकेत देताच ताबडतोब कसलाही विचार न करता त्यांच्यानंतर राहुल गांधीच पक्षाची धुरा सांभाळणार हे सर्वांनीच ताडले. पंडित नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि आता राहुल गांधी अशी ही पाच पिढ्यांची घराणेशाही आता पुढे जारी राहणार असल्याचे दिसत आहे. सोनिया गांधी यांच्यानंतर राहुल गांधीच पक्षाची धुरा सांभाळणार हे जवळजवळ पक्केच होते. परंतु ते कधी होईल याविषयी साशंकता होती आता सोनिया गांधी यांनीच नेतृत्व बदल सूचित केल्यामुळे हा नेतृत्व बदल लवकरात लवकर होईल असे दिसायला लागले आहे. सोनिया गांधी यांचा असा मनोदय व्यक्त करण्यामागे एक अडचण आहे. ती म्हणजे त्यांचे आरोग्य. त्या सध्या शारीरिकदृष्ट्या थकत चालल्या आहेत आणि वयाची सत्तरी गाठत आहेत. खरे म्हणजे राजकारणात सत्तरी हे काही निवृत्तीचे वय नव्हे. इतर काही कारणांनी सोनिया गांधी पक्षाची पूर्ण जबाबदारी फार दिवस सांभाळतील असे काही दिसत नाही. तशी शक्यताही नाही.

म्हणूनच त्यांनी नेतृत्व बदलाचे संकेत दिले आहेत. अर्थात राहुल गांधी यांची ताजपोशी ही केवळ त्यांच्या अध्यक्ष होण्याने साजरी होण्याचे संकेत दिसत नाहीत. तर त्यांच्या हाती अध्यक्षपदाची सूत्रे देताना पक्षाच्या संघटनेमध्ये मोठे बदल केले जाण्याची शक्यता आहे. हे बदल वरवरचे असतील की फार खोलवरचे असतील याबाबत नक्की काय सांगता येत नाही. परंतु ते कसे असले तरी राहुल गांधी फार मोठा बदल करून पक्षाची सूत्रे हाती घेत आहेत असे वातावरण नक्कीच तयार केले जाईल. गेल्या काही वर्षांपासून राहुल गांधी यांच्या बढतीची चर्चा आहे आणि ती करताना, त्यांच्याच वयाचे काही तरुण नेते सामूहिकपणे पक्षाला पुढे नेतील असे म्हटले जात आहे. ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट अशी काही ठराविक नावे या संबंधात वारंवार घेतली जातात. तेव्हा राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष होतील तेव्हा तरुण कार्यकर्ते आणि नेत्यांची मोठी फौज त्यांच्या दिमतीला असेल असे नेहमीच सांगितले जाते. सुरूवातीच्या काळात राहुल गांधींच्या या युवा ब्रिगेडविषयी फार आकर्षण निर्माण झाले होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे त्यातलेच एक असल्याचेही आवर्जुन म्हटले जात होते. परंतु देशाच्या राजकारणात जसे राहुल गांधी स्वतः आपला ठसा उमटवू शकले नाहीत तसाच त्यांच्या या युवा ब्रिगेडलासुध्दा आपला ठसा उमटवता आलेला नाही.

तेव्हा राहुल गांधी आए है, युवा नेतृत्व लाए है असा कितीही गाजावाजा केला तरी राहुल गांधी यांच्या या बढतीचे फार सखोल परिणाम होतील असे दिसत नाही. अर्थात राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्यच असते असे म्हणणे योग्य नाही. राहुल गांधींनी खरोखरच राजकीय परिपक्वपणा दाखवला. तर मात्र त्यांना राजकारणावर काहीना काही प्रभाव दाखवता येईल हे नाकारता येत नाही. एकंदरीत राहुल गांधी अध्यक्ष होतील तेव्हा त्यांच्यासमोर अनेक आव्हाने असतील आणि ती फार गंभीर स्वरूपाची असतील. त्यांना तोंड देण्यास सक्षम बनणे हे त्यांच्यासाठी म्हणावे तेवढे सोपे नाही. कॉंग्रेसच्या नेत्यांना परिश्रम करण्याची सवय राहिलेली नाही. गांधी घराण्याचा कथित करिश्मा हेच आपल्या पक्षाचे बळ आहे असे ते मानतात आणि गांधी घराण्याचा कोणीतरी वारस कसली तरी लाट निर्माण करील आणि त्यावर आपला पक्ष तगून जाईल असा नको एवढा विश्‍वास त्यांना वाटत असतो. गांधी घराण्याने काही तरी करावे आणि सत्ता मिळवावी. आपण मात्र त्यांची आरती गावी. असाच कॉंग्रेसचा कार्यक्रम आहे. यातून व्यक्त होणारी कॉंग्रेसजनांची प्रवृत्ती हेही राहुल गांधी यांच्या पुढचे आव्हान आहे.

राहुल गांधी पक्षाची सूत्रे हाती घेणार अशा बातम्या यायला लागताच भाजपाच्या नेत्या स्मृती इराणी यांनी मोठी खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली. राहुल गांधी कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले की भाजपाला आपोआपच अच्छे दिन येतील असे स्मृती इराणी म्हणाल्या. त्यात बरेच तथ्य आहे. स्मृती इराणी यांचे हे वाक्य ज्यांनी त्यांनी आपल्या प्रवृत्तीप्रमाणे विचारात घ्यायचे आहे. राहुल गांधींनीसुध्दा त्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. कारण राहुल गांधींचे खरे प्रतिस्पर्धी नरेंद्र मोदी हेच आहेत. मोदी यांनी पंतप्रधान झाल्यापासून ज्या परिश्रमाने, नियोजनबध्दतेने आणि चातुर्याने चांगला पंतप्रधान म्हणून आपली छबी निर्माण केली आहे ती तशी निर्माण करण्याची क्षमता राहुल गांधी यांच्या तुलनेने फारच कमी आहे. ती त्यांना वाढवावी लागणार आहे. ती कशी वाढेल, किती दिवसात वाढेल हे सांगता येत नाही. परंतु ती वाढवणे आवश्यक आहे हे नाकारता येत नाही. किंबहुना राहुल गांधी यांच्यामध्ये ती क्षमता मुळातच नाही असा भाजपा नेत्यांचा विश्‍वास आहे. त्यामुळे त्यांना अच्छे दिन येणार याची खात्री वाटत आहे. भाजपाच्या नेत्यांचा विश्‍वास आणि ही खात्री निरर्थक ठरवणे यातच राहुल गांधींचे मोठे होणे सामावलेले आहे.

Leave a Comment