दारूगोळ्याची आग

fire
आपल्या सीमेवर लष्कर आहे म्हणून आपण आरामात जगू शकतो आणि या लष्कराच्या दिमतीला प्रचंड शस्त्रे, मारक अस्त्रे आणि दारूगोळा उपलब्ध आहे म्हणून हे लष्कर देशाचे संरक्षण करू शकते. मात्र लष्कराला उपलब्ध असलेला हा दारूगोळा लष्कराच्या कारवाईत वापरण्याच्या ऐवजी साठवलेल्या ठिकाणी निष्काळजीपणामुळे जळून जात असेल तर मग लष्कर हतबल होईल आणि देशाच्या सुरक्षिततेवर भले मोठे प्रश्‍नचिन्ह निर्माण होईल. म्हणूनच विदर्भातील वर्धा जिल्ह्यातल्या पुलगाव येथे लष्कराच्या दारूगोळ्याच्या आगारात लागलेली आग अधिक चिंतेचा विषय आहे. कोणतीही आग चिंतेचीच असते. पण लष्कराच्या दारूगोळ्याला लागलेली आग जास्त चिंतेची असते. कारण तशी ती लागू नये म्हणून अनेक उपाय योजिलेले असतात. असे असूनही जर आग लागत असेल तर या दारूगोळ्याच्या संरक्षणासाठी केलेले उपाय निरर्थक ठरले आहेत की काय असे भले मोठे प्रश्‍नचिन्ह निर्माण होईल.

पुलगाव येथील आगीत १६ जवान प्राणास मुकले. ही बाब अधिक गंभीर आहे. पुलगावच्या या साठ्यासाठी ७ हजार एकर जमीन संपादित करण्यात आलेली आहे. या दारूगोळ्याच्या आगाराच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत प्रवास करण्यासाठी २८ किलोमीटर अंतर कापावे लागते. हा आशिया खंडातला दुसर्‍या क्रमांकाचा मोठा डेपो आहे. त्यात एकंदर ३०० शेड्स असून त्यातल्या एका शेडला काल आग लागलेली आहे. म्हणजे तुलनेत विचार केला तर नुकसान छोटे आहे. गेल्या १५ वर्षात झालेल्या अशा ६ मोठ्या दुर्घटनांमध्ये एकंदर ३ हजार कोटी रुपयांचा दारूगोळा जळून भस्म झाला आहे. त्यामुळे दारूगोळा साठवण्याची पध्दती आणि त्यांची सुरक्षा व्यवस्था यांचा किती कसोशीने विचार करण्याची गरज आहे.

२००० साली राजस्थानातल्या भरतपूर येथील दारूगोळ्याच्या साठ्याला आग लागून तीन नागरीक मारले गेले होते. त्यानंतर पठाणकोट (पंजाब), खंडरू (जम्मू काश्मीर), भूज (गुजरात), पानागड (प.बंगाल), विशाखापट्टणम् (आंध्र प्रदेश) इत्यादी ठिकाणी अशा दुर्घटना घडल्या. यातल्या काही दुर्घटना नेहमीची तपासणी सुरू असताना तर कधी दारूगोळ्याच्या वापराची चाचणी सुरू असताना झालेल्या आहेत. या प्रत्येक घटनेची चौकशी झालीच असणार आणि या चौकशीचे अहवालही संरक्षण मंत्रालयाला प्राप्त झालेलेच असणार. परंतु आपल्या नेहमीच्या सवयीनुसार आपल्या सरकारने या चौकशीच्या अहवालांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे अहवाल संरक्षण मंत्रालयात धूळ खातच पडलेेले असणार. आता या घटनेनंतर थोडीशी हालचाल होईल आणि जुन्या अहवालांवरील धूळ झटकून नवा अहवाल तयार करण्याची तयारी सुरू होईल. परंतु आपल्या देशामध्ये नेहमीच असे घडते. एखादी दुर्घटना घडल्यानंतर आपण तिच्यापासून काही बोध घेत नाही. त्यामुळे असे प्रकार पूर्णपणे बंद झाले आहेत असे कधी घडत नाही.

Leave a Comment