कॉंग्रेसची अवस्था

congress
कॉंग्रसला नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत तामिळनाडूत २१७ पैकी आठ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे राजकीय विश्‍लेषकांना हा पक्ष तिथे संपत आला आहे असे वाटते. भाजपाने तर कॉंग्रेस मुक्त भारताची घोषणा केली आहे पण कॉंग्रेसने ती धुडकावली आहे. भाजपाचे हे स्वप्न कधी सत्यात येईल किंबहुना येईल की नाही हे काही सांगता येत नाही. सध्या कॉंग्रेस पक्ष एकेका राज्यातले आपले स्थान गमावत चालली आहे. ते पूर्णपणे संपले नसले तरी संपायला आले आहे आणि त्या त्या राज्यात कॉंग्रेस पक्ष नावापुरताच राहिला आहे. कॉंग्रेसचे नेते नेहमीच अशा अवस्थेबद्दल आत्मवंचना करीत असतात आणि आपली शक्ती क्षीण होत आहे हे नाकारत असतात. त्यांच्या मते अवस्था आज वाईट दिसत असली तरीही शेवटी कोणत्याही निवडणुकीतला पराभव हा कायमचा नसतो, त्यामुळे या पराभवाने खचून जाण्याचे काही कारण नाही. आपली देशभरात संघटना आहे. आज आपला पराभव होत असला तरीही काही काळाने आपोआप विजय होणार आहे असे विश्‍लेषण मांडून कॉंग्रेसचे नेते आपल्या कार्यकर्त्यांचे ढळत असलेले मनोधैर्य सांभाळण्याची प्रयत्न करीत असतात. पण हे विश्‍लेषण यथार्थ नाही. काही राज्यात तरी कॉंग्रेसला प्रदीर्घकाळ विजय मिळालेला नाही. तिथे या पक्षाचे कायमचे खच्चीकरण झाले आहे.

याची काही उदाहरणे देता येतील. मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, प. बंगाल अशा काही राज्यांत कॉंग्रेसला अनेक वर्षे पराभवच पत्करावा लागला आहे. प. बंगालात कॉंग्रेसच्या हातातली सत्ता जाऊन ४० वर्षे झाली आहेत. आजचा पराभव हा उद्याचा विजय असतो असे कॉंग्रेसच्या नेत्यांना वाटत असले तरी बंगालात कॉंग्रेसला नऊ निवडणुकांत अपयश आले आहे. बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांतही कॉंग्रेसच्या हातातून सत्ता जाऊन २५ वर्षे उलटली आहेत. गुजरातेत तर १९८७ नंतर कॉंग्रेसला कधीच सत्ता मिळवता आलेली नाही. ही अवस्था तशी फार जुनी म्हणजे १९७५ सालपासून आहे पण मध्येच १९८० साली या पक्षाला तिथे सत्ता मिळाली होती. नंतर मात्र कायम विरोधी पक्ष म्हणून काम करावे लागले आहे. अशी कितीतरी राज्ये आहेत की, जिथे कॉंग्रेसचे स्थान अगदी नगण्य एवढे आहे. असे असले तरीही छत्तीसगड, मध्य प्रदेश, अगदी गुजरात या राज्यांत कॉंग्रेस दुबळी असली तरीही हाच पक्ष तिथे विरोधी शक्ती म्हणून आपले अस्तित्व राखून आहे. म्हणजे तिथल्या राजकीय ध्रुवीकरणात कॉंग्रेस हा एक ध्रुव आहे. तिथल्या सरकारांच्या विरोधात खरेच मोठी लाट आली तर तिथले मतदार पर्याय म्हणून कॉंग्रेसचीच निवड करतील अशी अवस्था आहे.

तेव्हा तिथे कॉंग्रेसने सत्तेची स्वप्ने पाहिली तर ती अगदीच अतिशयोक्तीची आहेत असे म्हणता येत नाही. पण देशाच्या काही मोठया राज्यात कॉंग्रेसला पर्याय म्हणून स्थान राहिलेले नाही. उत्तर प्रदेश, बिहार अशा काही राज्यांत कॉंग्रेसचे स्थान दुबळी चौथ्या क्रमांकाची शक्ती असे आहे. देशाच्या राजकारणात कितीही लाटा आल्या आणि गेल्या पण त्यातल्या कोणत्याही लाटेवर स्वार होऊन सत्तेवर येणे तर दूरच पण दोन नंबरचा पक्ष असेही स्थान या पक्षाला प्राप्त करता आलेले नाही. म्हणजे तिथून कॉंग्रेस पक्ष संपला आहे. असे निदान निर्विवादपणे करता येईल असे राज्य म्हणजे तामिळनाडू. तामिळनाडूत १९६७ साली कामराज यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचे राज्य होते. त्या काळात कॉंग्रेसच्या विरोधात देशभरात लाट होती आणि उत्तरेतल्या आठ राज्यात कॉंग्रेसेतर पक्षांची सरकारे आली. त्यातच कामराज यांची सत्ता गेली आणि दक्षिणेतल्या या राज्यातले कॉंग्रेसचे सरकार गेले. त्याला आता ५० वर्षे होत आली आहेत पण या पाच दशकात या राज्यात कॉंग्रेसच्या हातात कधीच सत्ता आली नाही.

या पाच दशकात अनेक लाटा आल्या. त्यातल्या काही लाटा कॉंग्रेसला अनुकूल होत्या पण त्यातल्या कोणत्याही लाटेत कॉंग्रेसला तामिळनाडूत कधीच सत्ता मिळाली नाही. तिथे द्रमुकच्या हातात सत्ता गेली. नंतर आपणच तिथे पर्याय म्हणून पुढे येणार असा कॉंग्रेस नेत्यांचा कयास होता पण द्रमुक मध्ये फूट पडून अण्णा द्रमुक पक्ष स्थापन झाला. राज्यातल्या राजकारणाचे ध्रुवीकरण याच दोन प्रादेशिक पक्षात झाले. लोकांनी या दोन पक्षांना परस्परांचे पर्याय म्हणून स्वीकारले. कॉंग्रेसला या काळात झालेेल्या अनेक निवडणुकांत राज्यातला दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष म्हणून स्थान मिळवता आले नाही. कॉंग्रेसने तसा प्रयत्नही केला नाही. कधी द्रमुक तर कधी अद्रमुक अशी बदलून बदलून त्यांनी युती केली आणि एका प्रादेशिक पक्षाचा दुय्यम भागीदार होणे पसंत केले. आता आता पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत तर कॉंग्रेसला विधानसभेतल्या २१७ पैकी केवळ आठ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे विधानसभेतून राज्यसभेवर एकही खासदार पाठवता येणार नाही. एक अर्थाने तामिळनाडू हे राज्य कॉंग्रेस पासून मुक्त झाल्यात जमा आहे. तिथे आता या पक्षाला भवितव्य नाही.

Leave a Comment