इराण : एका दगडात अनेक पक्षी

modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इराण दौरा पार पडला आहे. इराण हा पश्‍चिम आशियातला एक मोठा देश आहेच पण कच्च्या तेलाच्या उत्पन्नातही तो आघाडीवर आहे. भारताला कच्चे तेल पुरवणार्‍या देशात सर्वाधिक कच्चे तेल पुरवण्याच्या बाबतीत इराणचा दुसरा क्रमांक लागतो. तो गेल्या दहा वर्षांपासून अनेक प्रकारच्या वादात गुंतलेला आहे. इराणने अण्वस्त्रे तयार करू नयेत यासाठी अमेरिकेने इराणवर अनेक बंधने आणली होती. इराणच्या निमित्ताने अमेरिका आणि रशिया यांच्यातले १९९० च्या दशकात संपलेले शीतयुध्द पुन्हा सुरू होण्याची चिन्हे दिसत होती. इराणपासून भारतापर्यंत टाकल्या जाणार्‍या गॅस वाहिनीचा प्रकल्प अमेरिकेला मान्य नव्हता.

या निमित्ताने भारत आणि अमेरिका यांच्यात किंचित का होईना पण संघर्ष निर्माण झाला. त्याचबरोबर चीनने भारताच्या उत्तर भागातून एका प्रचंड मोठा महामार्ग टाकायला सुरूवात केली आहे. याबाबतीत चीनला पाकिस्तानची मदत होत आहे आणि हा महामार्ग चीनला पश्‍चिम आशियापर्यंत न्यायचा आहे कारण त्याच्या मार्फत त्याला पश्‍चिम आशियाच्या राजकारणात शिरकाव करून वर्चस्व प्रस्थापित करावयाचे आहे. अशा रितीने इराणच्या राजकारणात चीनचाही संदर्भ आहे. म्हणून नरेंद्र मोदी यांनी इराणचा दौरा करून चीन आणि अमेरिका या दोघांनाही आव्हान दिले आहे. नरेंद्र मोदी यांनी इराणशी केलेल्या बारा समझोत्याच्या करारामध्ये चबहार बंदराच्या विकासाचा समझोता आहे. भारत सरकार या करारानुसार या बंदराच्या विकासासाठी ५० कोटी डॉलर्स देणार आहे. त्यामुळे भारताचा हा करार म्हणजे एक प्रकारे चीनवर केलेली मात समजली जात आहे.

या चबहार बंदराच्या विकासामुळे भारताला अफगाणिस्तानशी व्यापार करणे सोपे जाणार आहे. अफगाणिस्तानमध्येही कच्च्या तेलाचे मोठे भांडार आहे. त्याच्यावर नजर ठेवून चीनने पाकिस्तानातील ग्वाडार बंदर विकसित केले आहे. त्याला भारताने आता चबहार बंदराच्या माध्यमातून शह दिला आहे. अफगाणिस्तान हे उद्याचे महत्त्वाचे राष्ट्र आहे. त्याच्यावर भारताचे वर्चस्व असावे म्हणून भारताने आतापासूनच चीनला शह देत अफगाणिस्तानशी मैत्री वाढवली आहे. पश्‍चिम आणि मध्य आशियात आपला वट्ट वाढावा म्हणून चीन पाकिस्तानच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. तर भारत सरकार इराणच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे.

Leave a Comment