भारतीय शास्त्रज्ञांचे यश

isro
गेल्या १०० वर्षांचा भारताचा इतिहास पाहिला तर त्यात आपल्याला अनेक चढउतार दिसतात. याच काळात देशात स्वातंत्र्याची चळवळ चालली, विकासाच्या मार्गावर आपण काही यशस्वी आणि काही अयशस्वी पावले टाकली. शेतीच्या क्षेत्रात काही प्रयत्न झाले. समाजवादाचा प्रयोग झाला आणि तो नंतर सोडून देण्यात आला. त्याजागी खुले धोरण राबवण्यास सुरूवात झाली. हे सगळे प्रयत्न सुरू असतानाच देशातले शास्त्रज्ञ मात्र एक चित्तपणे संशोधनामध्ये गुंतलेले दिसतात. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय शास्त्रज्ञांनी फारच स्पृहणीय कामगिरी बजावली आहे. आपल्या देशातल्या लोकांना नोबेल पुरस्काराचा मान फार अपवादात्मक प्रसंगीच मिळतो. मात्र ज्या सहा-सात मान्यवरांना नोबेल पुरस्कार मिळालेले आहेत त्यात तिघे शास्त्रज्ञ आहेत इकडे लोकांचे लक्षच नाही. आपल्या देशामध्ये रुपेरी दुनियेतील तारे आणि तारका सेलिब्रेटी म्हणून नावाजले जातात. पुढार्‍यांना तर नेहमीच नको एवढा मान मिळतो. परंतु आपल्या दुर्दैवाने यशस्वी उद्योजक आणि शास्त्रज्ञ हे कधी सेलिब्रिटी होऊ शकत नाहीत. आपल्या देशाची यूरोप खंडासारखी प्रगती न होण्यामागे हे एक महत्त्वाचे कारण आहे.

शास्त्रज्ञ हे कधीच सेलिब्रिटीज होऊ शकत नसल्याने त्यांच्याकडून देशाच्या विकासासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांची समाजात फार कमी दखल घेतली जात असते. बर्‍याच सामान्य लोकांना तर शास्त्रज्ञ नेमके काय करतात हेच माहीत नसते. परंतु भारताची हरित क्रांती, जलक्रांती, श्‍वेतक्रांती, माहिती तंत्रज्ञानातील प्रगती यांचा आपल्या जीवनावर चांगला परिणाम झालेला आहे असे असूनही या सगळ्या तंत्रज्ञानामागे कोणते शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ गुंतलेले आहेत हे समाजाला फारसे माहीत नसते. आता तर उर्जेचे सारे चित्र बदलून जाणारी सौर उर्जा अगदी सामान्य होत चालली आहे. परंतु सौर उर्जेच्या संशोधनात गुंतलेल्या भारतीय शास्त्रज्ञांची माहिती सामान्य माणसाला नाही. सौर उर्जेचा आपल्या जीवनावर थेट परिणाम तरी होताते परंतु अवकाश यानासारख्या संशोधनाचा थेट परिणाम होत नसल्याने त्या क्षेत्रातल्या घडामोडी अपरिचितच राहतात. सध्या अशाच प्रकारे अपरिचित राहिलेल्या मात्र परिचित होण्याची गरज असलेल्या एका भारतीय संशोधकाने सारे जग आचंबित झाले आहे. ते संशोधन म्हणजे अंतराळ संशोधनासाठी वापरल्या जाणार्‍या अवकाश यानांचा पुर्नवापर करण्याचे तंत्रज्ञान या तंत्रज्ञानाच्या यशस्वीतेच्या दृष्टीने काल भारतीय शास्त्रज्ञांनी एक पाऊल पुढे टाकले.

मुळात भारताचे अंतराळ संशोधन हा सार्‍या जगाच्या कुतुहलाचा विषय आहे. कारण भारत देश या संशोधनात फार पुढे जाऊ शकणार नाही असा प्रगत देशांचा दावा होता. मात्र त्यांचे हे दावे फोल ठरून भारतीय शास्त्रज्ञांनी अंतराळ क्षेत्रात दमदार वाटचाल सुरू केली आहे. अंतराळ संशोधनात जगाच्या पहिल्या पाच देशांमध्ये भारताची गणना होत आहे. अंतराळ संशोधनाच्या काही घटकांच्या बाबतीत तर भारत जगात एकमेव ठरला आहे. अंतराळ संशोधनातले सगळे घटक भारताने यशस्वी करून दाखवले आहेत. आर्यभट्ट या उपग्रहाच्या या प्रक्षेपणापासून सुरू झालेली भारताची ही वाटचाल आता जगाला आश्‍चर्य वाटावी अशा अवस्थेला येऊन पोहोचली आहे. अंतराळ संशोधनातील सर्वाधिक कठीण गोष्ट म्हणजे मंगळावर स्वारी. भारतीय शास्त्रज्ञांनी पहिल्याच प्रयत्नात मंगळावर अवकाश यान पाठवले आहे. भारतीय अंतराळ संशोधनाचे मोठेपण असे की या संशोधनातून प्राप्त होणारी माहिती अमेरिकासुध्दा भारताकडून घेत असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे अंतराळातल्या ज्या घडामोडी किंवा उपक्रम अमेरिकेत दहा लाख डॉलर्स खर्च करून होतात त्या घडामोडी, उपक्रम किंवा प्रयोग भारतीय शास्त्रज्ञ केवळ १ लाख डॉलर्समध्ये करून दाखवतात.

कमीत कमी खर्चात अधिकाधिक प्रयोग भारतात होत असल्यामुळे भारत हा अन्य देशांचे उपग्रह अवकाशात नेऊन सोडण्याचा व्यापार करणारा देश ठरत आहे. कारण भारताच्या अवकाश यानातून आपला उपग्रह प्रक्षेपित केला की तो कमीत कमी खर्चात प्रक्षेपित होतो हे सगळ्या देशांना माहीत झाले आहे. या खर्चात आणखी बचत करत भारताने एकाच अवकाश यानाच्या साह्याने एका वेळी ९ उपग्रह अवकाशात नेऊन सोडले आहेत. मात्र एका वापरलेले अवकाश यान अवकाशात गेले आणि त्याने आपले काम केले की ते अवकाश यान हवेतच विघटित होत होते आणि त्याचा पुन्हा वापर करता येत नव्हता. परंतु आता भारताने अवकाश यानाचा पुर्नवापर करण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. अवकाशात उपग्रहाला घेऊन जाणारे अवकाश यान उपग्रह प्रक्षेपित झाला की वर विघटित होत नाही. तर ते खाली येते आणि ठरलेल्या ठिकाणी येऊन पडते. त्याचा पुन्हा वापर करता येऊ शकतो. अशारितीने भारताने असा प्रयोग यशस्वी केल्यामुळे प्रक्षेपणाच्या दरात आणखी कपात होणार आहे. यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी आपल्या अव्वल बुध्दीमत्तेचा आणि संशोधक प्रवृत्तीचा समुचित वापर केला आहे आणि अवकाश यानात आपण जगातल्या कोणत्याही महाशक्तीपेक्षा कमी नाही हे दाखवून दिले आहे.

Leave a Comment