फोर्डच्या ‘इको स्पोर्ट’ची ‘गॅरेज वापसी’

ford
मुंबई : आपल्या ‘इको स्पोर्ट्स एसयुव्ही’ मॉडेलच्या ४८ हजार गाड्या फोर्ड इंडिया कंपनीने परत मागवल्या आहेत. हा निर्णय डिझेलवर चालणाऱ्या इको स्पोर्ट्स एसयुव्हीच्या सीट, ब्रेक आणि इंधन प्रणाली सदोष असल्याने घेण्यात आला.

ही मॉडेल्स एप्रिल २०१३ ते जून २०१४ या कालावधीत बनवण्यात आली होती. याशिवाय जानेवारी २०१६ ते फेब्रुवारी २०१६ या कालावधीत तयार केलेल्या मॉडेल्सच्या ७०० ग्राहकांशी कंपनी संपर्क साधत आहे.

पुढील सीटच्या बॅकरेस्टचे बोल्ट्स संबंधित वाहनांच्या हे कंपनीच्या स्पेसिफिकेशन्सनुसार नसल्याने कार परत मागवण्यात आल्या आहेत. दरम्यान, या तांत्रिक बिघाडामुळे अपघात किंवा दुखापत झाल्याची कोणतीही तक्रार ग्राहकांकडून आली नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनीने काही कारचालकांना संपर्क साधून जवळच्या डीलरकडून बिघाड दुरुस्त करुन घेण्याची विनंती केली आहे. याच वर्षात फोर्ड इंडियाकडून कार परत मागवण्याची ही दुसरी वेळ आहे. कंपनीने एप्रिल महिन्यात फिगो आणि अस्पायर मिनी सिडान एअरबॅग संबंधित दोषामुळे परत मागवल्या होत्या.

Leave a Comment