द्वेषमूलक विश्‍लेषण

samna
सामना या दैनिकात आता पाच राज्यातल्या निवडणूक निकालाचे विश्‍लेषण करण्यात आले आहे. ते बाळासाहेबांनी वाचले असते तर त्यांनी कपाळावर हात मारून घेतला असता. कारण या विश्‍लेषणाचा सूर पूर्णपणे भाजपा द्वेषावर आधारलेला, नकारात्मक आणि अतार्किक आहे. गेल्या दोन तीन दिवसांत इतरही अनेक माध्यमांत या निकालांचे विश्‍लेषण केले गेले आहे. पाच पैकी एका राज्यात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरीही पुड्डुचेरी वगळता इतर चार राज्यात कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला आहे याला सर्व माध्यमांनी प्राधान्य दिले आहे. माध्यमांत भाजपाचे शत्रू अनेक आहेत. पण तरीही भाजपाला केवळ एका राज्यात बहुमत मिळूनही त्यांनी भाजपाचे कौतुक केले आहे कारण इतर तीन राज्यांत म्हणजे केरळ, तामिळनाडू आणि प. बंगाल या तीन राज्यात भाजपाला कमी जागा मिळाल्या असल्या तरीही भाजपाचे या राज्यांतले मतदानाचे वाढते प्रमाण कौतुकास्पद आहे. या राज्यांत भाजपाला जागा मिळाल्या नाहीत म्हणून शिवसेनेला मात्र आनंद होत आहे. गंमतीचा भाग असा की, भाजपाने फार आनंद मानायचे कारण नाही असे खोचकपणे म्हणणार्‍या सेनेने कॉंग्रेसचे मात्र छान सांंत्वन केले आहे.

कॉंग्रेस पक्ष संपायला आला आहे असे अनेक कॉंग्रेस नेत्यांचे स्पष्ट मत आहे. दिग्विजयसिंग यांच्यासारख्या आपादमस्तक कॉंग्रेसमय असलेल्या नेत्याला कॉंग्रेस पक्षाची मोठी शस्त्रक्रिया करण्याची गरज वाटत आहे. पण शिवसेनेला मात्र कॉंग्रेस पक्ष नक्कीच नवी झेप घेईल असा विश्‍वास वाटत आहे. खरे तर शिवसेनेने कॉंग्रेस विषयी व्यक्त केलेला हा विश्‍वास अनाठायी तर आहेच तो भाजपाच्या द्वेषापायी व्यक्त केलेला आहे. कॉंग्रेेस पक्ष झेप घेईल की नाही याबाबत राहुल गांधी साशंक आहेत पण उद्धव ठाकरे मात्र आश्‍वस्त आहेत. ही खात्री त्यांना काही कॉंग्रेसकडे पाहून आलेली नाही. केवळ नरेन्द्र मोदी यांना डिवचण्यासाठी ते कॉंग्रेसला हरबर्‍याच्या झाडावर चढवायला लागले आहेत. उद्धव ठाकरे यांना ज्या नरेन्द्र मोदी यांच्यामुळे सत्ता प्राप्त झाली आहे त्या मोदींच्या आणि भाजपाच्या द्वेषाने एवढे घेरले आहे की आपण या द्वेषाच्या भरात कॉंग्रेसवर स्तुतीसुमने उधळायला लागलो आहोत याचेही भान राहिलेले नाही. भाजपाचा द्वेष करण्यात माहीर असलेले अनेक पत्रकार भाजपाने देशाला कॉंग्रेसपासून मुक्त करण्याकडे किती वेगाने वाटचाल सुरू केली आहे हे आवर्जुन सांगत आहेत पण राज्यात आणि केन्द्रात भाजपाच्या मांडीला मांडी लावून बसणारी शिवसेना मात्र भाजपाला विजय मिळूनही टोमणे मारण्याचा क्षुद्रपणा दाखवत आहे.

बंगाल, तामिळनाडू आणि केरळात कॉंग्रेसला संपवण्यात तृणमूल, जयललिता आणि डावी आघाडी यांनी मोठा वाटा उचलला आहे. तिथे कॉंग्रेसचे स्थान डळमळीत होत आहे याचे श्रेय या पक्षांना आहे पण भाजपावाले त्याचे श्रेय घेत आहेत यावर ठाकरे यांना राग येत आहे. उद्या चालून हे भाजपावाले अमेरिकेतल्या आणि पाकिस्तानातल्याही निवडणुकांच्या निकालांचे श्रेय घ्यायला मागेपुढे पाहणार नाहीत असे ठाकरे यांनी तिरकसपणे म्हटले आहे. या राज्यात भाजपाने कॉंग्रेसच्या खच्चीकरणाचे श्रेय घेतलेले नाही. राष्ट्रीय पातळीवरचा आपला सर्वात मोठा शत्रू कोणामुळे का होईना पण कमी होत आहे याचा भाजपाला आनंद मात्र झालेला आहेे. त्याचे श्रेय कोणी कोणाला देत नाही पण ज्यांनी या तीन राज्यात कॉंगे्रेसला मात दिली त्या तीन पक्षांचे नेते मात्र तिथल्या भाजपाच्या प्रगतीची स्तुती करीत आहेत. एवढेच नाही तर या तीन राज्यांत भाजपा ही दखलपात्र शक्ती बनली आहे हे त्यांनी मान्य केले आहे. अर्थात असे दखलपात्र होण्यासाठी भाजपाने काय कष्ट घेतले आहेत याची ठाकरे यांना जाणीवही नाही.

निवडणुकीच्या निकालात किती जागा जिंकल्या आणि किती गमावल्या याच केवळ गोष्टींना महत्त्व दिले जाते आणि कमी जागा मिळवणे हा पराभव तर जास्त जागा मिळवणे हा विजय असे प्राथमिक पातळीवर समर्थनीय वाटेल असे विश्‍लेषण मांडले जाते. पण निवडणुकांच्या शास्त्रांत यापेक्षा काही वेगळी गणिते मांडली जात असतात. एखाद्या पक्षाला एखाद्या राज्यात किती जागा मिळाल्या याच्या एवढेच किती टक्के मते मिळाली यालाही महत्त्व असते. कारण या टक्केवारीवरच पुढची राजनीती केली जाते. हळूच जागा वाढवण्याचे गणित मांडले जाते. म्हणूनच भाजपाला तामिळनाडूत १० टक्के आणि केरळात १२ टक्के मिळाली हे भाजपाचे यश आहे आणि त्याची दखल भाजपाच्या प्रतिस्पर्धी पक्षांनीही घेतली आहे. प. बंगालात भाजपाला १२ टक्क्यांपेक्षाही अधिक मते मिळाली आहेत. सहा आमदार निवडून आले आहेत. मात्र भाजपाचे उमेदवार ५२ मतदारसंघात दुसर्‍या क्रमांकावर आहेत. ज्यांना निवडणुकीचे शास्त्र समजते ते लोक भाजपाच्या दुसर्‍या क्रमांकावर असण्याला मोठे यश मानत आहेत. १९८० च्या दशकांत भाजपाच्या हातात चारच राज्ये होती. गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यांत भाजपाला सत्ता मिळेल असे कोणी म्हटले असते तर त्याला वेड्यात काढले गेले असते पण आता या राज्यात भाजपाची वाटचाल कशी आहे हे दिसतच आहे. ही प्रगती भाजपाने मतांच्या टक्केवारीचे गणित मांडतच केली आहे.

Leave a Comment