राज्यात पेट्रोल-डिझेल विशेष अधिभार रद्द केल्याने स्वस्त

petrol
मुंबई – केंद्र सरकारने राज्यातील पेट्रोल व डिझेलवर असलेला राज्य विशेष अधिभार मंगळवारी मध्यरात्रीपासून रद्द केला आहे. पेट्रोलवरील १.१२ पैसे तर डिझेलवरील ९१ पैसे अधिभार रद्द केल्यामुळे इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील इंधन स्वस्त झाले आहे.

अतिरिक्त राज्य विशेष अधिभार केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मध्यरात्रीपासून रद्द केल्यामुळे संपूर्ण देशात सोमवारी झालेल्या पेट्रोलवरील दरवाढ ८३ पैसे प्रती लीटर ऐवजी महाराष्ट्रात ६० पैशाने पेट्रोल स्वस्त झाले आहे. तर डिझेलही देशात १ रुपया २६ पैशाने वाढले असता राज्यात दरवाढ फक्त २१ पैशाने झाली. मागील तीन महिन्यांत राज्य शासन आणि गिरीश बापट यांच्या प्रयत्नांमुळे केंद्र शासनाने राज्य विशेष अधिभारात केलेल्या कपातीमुळे महाराष्ट्रात डिझेल प्रती २ रुपये २० पैसे व पेट्रोल २ रुपये ५० पैसे स्वस्त झाले आहे.

अतिरिक्त अधिभारासंदर्भात तक्रार पेट्रोल डिझेल असोसिएशनने ग्राहक संरक्षण मंत्री बापट यांच्याकडे केली होती. या अधिभारामुळे देशातील इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेलच्या किमती जास्त होत्या. यामुळे राज्यातील डिझेलची विक्री इतर राज्यात स्थलांतरित होऊन राज्याचे मागील तीन वर्षात ९५०० कोटी रुपयांचे मूल्यवर्धित करातून मिळणाऱ्या महसुलाचे नुकसान झाल्याची तक्रार असोसिएशनने केली होती.

या तक्रारीची दखल घेत बापट यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालय, पेट्रोलियम मंत्रालय व केंद्रीय वित्त मंत्रालय यांच्याबरोबर चर्चा केली. यावेळी हा अतिरिक्त अधिभार रद्द करण्याची मागणी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री प्रधान यांच्याकडे केली. या मागणीची दखल घेत प्रधान यांनी राज्यावर असलेला अतिरिक्त अधिभार रद्द करण्याची घोषणा केली.

Leave a Comment