पहिल्या प्रवासासाठी निघाले जगातील सर्वात मोठे जहाज

harmoney-of-the-seas
पॅरिस – आपल्या पहिल्या प्रवासासाठी जगातील सर्वात मोठे जहाज ‘हारमनी ऑफ द सीज’ निघाले असून फ्रान्समधील सेंट-नजायर शिपयार्ड ते ब्रिटनला निघालेल्या आलिशान जहाजाला पाहण्यासाठी रविवारी जवळपास ७० हजार लोक उपस्थित होते. मंगळवारी हे जहाज दक्षिण इंग्लंडच्या साऊथहॅम्टनमध्ये पोहचेल. तेथून २२ मे पासून आपल्या पहिल्या व्यापारी प्रवासास सुरुवात करेल. या जहाजाचे वजन १.२ लाख टन आहे. यावर एकाचवेळी ८,५०० पेक्षा जास्त लोक प्रवास करू शकतात.

अमेरिकेच्या रॉयल कॅरेबियन प्रुझेस लिमिटेड (आरसीसीएल)च्या माहितीनुसार, हे जहाज मंगळवारी दक्षिण इंग्लंडच्या साऊथहॅम्टनमध्ये पोहचेल. ज्यावेळी हे जहाज प्रवास सुरु करीत होते, त्यावेळी किना-यावर ७० हजार लोक उपस्थित होते. जोरदार टाळय़ा वाजवून या जहाजाच्या प्रवासाला सर्व लोकांनी प्रतिसाद दिला. याचा पहिला अधिकृत प्रवास २२ मे पासून बार्सिलोनासाठी सुरु होईल. अमेरिकन रॉयल कॅरेबियन प्रुझेस लिमिटेडने या जहाजाची निर्मिती केली आहे. १६ मजले असलेले हे जहाज एक शहरच वाटते. यावर सर्व आलिशान सुखसोयी उपलब्ध आहेत. एकाचवेळी हे जहाज ८५०० लोकांना प्रवास घडवू शकते. ज्यामध्ये ६३६० प्रवासी आणि जहाजावरील २१०० कर्मचा-यांचा समावेश आहे. हे जहाज २२ नॉट म्हणजे ४० किमी/तास या वेगाने समुद्रात प्रवास करु शकते.

आरसीसीएलचे प्रमुख रिचर्ड फॅन यांच्या मतानुसार, हे जगातील सर्वात मोठे महागडे जहाज असून याची एकूण किंमत १५० कोटी डॉलर्स एवढी आहे. कॅसिनो, रोप स्लायडिंग, मिनी गोल्फ, क्लाविंग वॉल आणि १४०० लोक बसू शकतील एवढ्या मोठ्या थिएटरची सुविधा दिलेली आहे. दोन रोबोट बायोनिक बारमध्ये प्रवाशांना मद्याचा पुरवठा करतात. या जहाजाचे वजन ऐतिहासिक जहाज ‘टायटॅनिक’पेक्षा दुप्पट आहे. टायटॅनिकचे वजन ५२,३१० टन होते. तर ‘हारमनी ऑफ द सीज’चे वजन १.२ लाख टन आहे. याची लांबी ३६१ मीटर असून, जे आयफेल टॉवरच्या उंचीपेक्षा ३७ मीटरने अधिक उंच आहे. आयफेलची उंची ३२४ मीटर असून लांबी ६६ मीटर आहे.

या जहाजाची निर्मिती करणारी कंपनी ‘एसटीएक्स फ्रान्स’ने सांगितले की, या जहाजाची निर्मिती २५०० कामगारांनी अथक परिश्रम करुन केली. याची निर्मिती करण्यासाठी जवळपास ४० महिने लागले. याची निर्मिती सप्टेंबर २०१३ मध्ये सुरु झाली. ‘हारमनी ऑफ द सीज’ जहाजातून २० टक्के कमी कार्बनडाय ऑक्साईडची उत्सर्जन होते. यामध्ये सौरऊर्जा निर्मितीचे १२०० प्रकल्प असून याद्वारेच जहाजाला वीज प्राप्त होते.

Leave a Comment