भावनांचे मार्केटिंग

politics
भारताच्या राजकारणात भावनांचे मार्केटिंग फार छान होत असते. किबहुना भारताचे राजकारण हे भावनांच्या मार्केटिंगवरच चालत असते. राजकारणाचा आढावा घेतला तर आपल्याला असे दिसून येईल की, देशातले मतदार मतदान करताना कोणी कसा कारभार केला आहे याचा कधी विचारच करीत नाहीत. निवडणुकीच्या मैदानात कोणत्या भावना भडकवणारे विषय मांडले जात आहेत याचाच लोक विचार करतात. स्वातंत्र्यानंतरची काही वर्षे तर स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्‍वभूमीवरच निवडणुका झाल्या. कॉंग्रेसने देेशाला स्वातंत्र्य मिळवून दिले असल्याने याच पक्षाला मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे असे लोक मानत आले. नंतर या भावनेची जादू ओसरत गेली. दक्षिणेत हिंदी विरोधाच्या भावनेवर राजकारण केले गेले आणि तिथे प्रादेशिक पक्षच राजकारण करीत राहिले. तिथे अजूनही कॉंग्रेस तसेच भाजपा या राष्ट्रीय पक्षांना या प्रादेशिक भावनेशी स्पर्धा करता आलेली नाही. इंदिरा गांधी यांनी १९७० साली बँकांचे राष्ट्रीयीकरण करून गरिबांच्या कल्याणाचा डांगोरा पिटला त्यात त्यांना एवढे यश मिळाले की सारे विरोधी पक्ष वाहून गेले.

१९७२ साली त्यांनी पाकिस्तानशी केलेल्या युद्धात विजय मिळवला आणि त्यातून त्यांची जी प्रतिमा निर्माण झाली तिच्या जोरावर त्यांनी सार्‍या देशातल्या कॉंग्रेसला सावरले. याच यशाच्या धुंदीत त्यांनी आणीबाणी लादली. तिच्यात लोकांवर अन्याय झाले. त्यातून निर्माण झालेल्या इंदिरा विरोधी लाटेत इंदिरा गांधी वाहून गेल्या. १९८० साली नेमका उलटा प्रकार घडला आणि इंदिरा लाटेत इतर पक्ष बुडाले. १९८४ साली त्यांची हत्या झाली. तिच्यातून निर्माण झालेल्या लाटेत राजीव गांधी यांना लोकसभेच्या ४८० जागा मिळाल्या. भाजपाला तर यावेळी पूर्ण देशात दोन जागा मिळाल्या. हा पक्ष कधीकाळी सावरेल की नाही असे प्रश्‍न पडायला लागले. १९८९ साली बोफोर्स लाट आली आणि राजीव गांधी यांना सत्ता सोडावी लागली. १९९१ साली निवडणुकीची प्रक्रिया चालू असतानाच त्यांची हत्या झाली तिच्यातून लाट निर्माण झाली पण तिचा लाभ त्यांच्या पक्षाला मर्यादित झाला. नंतर राम मंदिराची लाट आली. तीही ओसरली. गेल्या काही वर्षात मोदी लाटेने भारताला घेरले आहे. आंध्र प्रदेशात तर साध्या ग्रामपंचायतीचे कधी तोेंडही न पाहिलेले एन.टी. रामाराव हे तेलुगु स्वाभीमानाच्या लाटेत चक्क मुख्यमंत्री झाले. लाटा निर्माण करण्याची कला सर्वांनाच अवगत असते असे नाही पण शिवसेनाही नेहमी शिवाजी महाराजांच्या काळचे दाखले देऊन महाराष्ट्रात भावनेचे राजकारण करण्याचा प्रयत्न करीत असते.

सध्या या गोष्टी आठवण्याचे कारण म्हणजे सोनिया गांधी. त्यांनी काल एका जाहीर सभेत आपल्या शेवटच्या दिवसाचा उल्लेख करून आपल्या संबंधीच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न केला आहे. आपण याच देशात राहणार आहोत आणि आपण शेवटचा श्‍वास याच भूमीत घेणार आहोत. आपल्या अस्थी याच मातीशी एकरूप होणार आहेत असे सोनिया गांधी यांनी जाहीर केले आहे. त्यांनी अशा रितीने आपल्या संबंधी सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण त्यांना आता अन्य कोणत्याच साधनाने देशाच्या राजकारणात टिकून राहण्याची खात्री वाटेनाशी झाली आहे. पक्ष वरचेवर अडचणीत येत आहे. येत्या १९ तारखेला निकाल लागत असलेल्या पाच विधानसभांच्या निवडणुकांतही फारशी चमकदार कामगिरी होण्याचा विश्‍वास नाही. त्यामुळे बुडत्या पक्षाला आता सहानुभूतीच्या अशा काडीचा आधार सापडतोय का हे सोनिया गांधी पडताळून पहात आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर पसरलेल्या अंधारातून वाट काढण्यासाठी त्यांना अशी भावनेची एक शलाका हवी आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोनिया गांधी आपल्याला अटक होईल का याची वाट पहात आहेत. अटक नाही पण निदान तसे वॉरंट तरी निघावेे आणि त्यातून सहानुभूतीची लाट निर्माण करता यावी अशी त्यांची थियरी आहे. पण नरेन्द्र मोदी त्यांना तशी संधी देत नाहीत. म्हणून सोनिया गांंधी यांनी तसा मोका बघून सहानुभूतीसाठी नाटक सुरू केले आहे. खरे तर सोनिया गांधी या भारतातच शेवटचा श्‍वास घेणार आहेत यात आगळे वेगळे आणि त्यांच्याविषयी दया निर्माण व्हावी असे काही नाही. कारण या देशात राहणार्‍या सर्वांनाच या देशात शेवटचा श्‍वास घ्यायचा असतो. ऑगष्टा प्रकरणात इटलीतल्या न्यायालयात लाचेच्या लाभार्थी म्हणून त्यांचे नाव आले. त्याचा उल्लेख करताना मोदी एवढे म्हणाले होते की, आम्ही इटलीत कोणाला ओळखत नाही. तिथे आम्ही काही कट करून कोणाला तरी सोनिया गांधी यांचे नाव घ्यायला लावले असे काही संभवत नाही. तेव्हा तिथे सोनिया गांधी यांचे नाव आले हा काही आमचा कट नाही. या बोलण्यात सोनिया गांधी यांनी इटलीत परत जावे असे दूरान्वयानेही सूचित झालेले नाही. पण सोनिया गांधी यांनी त्यातला केवळ इटली हा शब्द उचलला आणि काही कारण नसताना, कसलाही संबंध नसताना, मी इटलीत परत जाणार नाही असे जाहीर करून टाकले. त्यातून आपल्याला सहानुभूती मिळेल असे त्यांना वाटते. अशी वाक्ये बोलण्यासाठी कोणी तरी इटली हा शब्द कसल्यातरी संदर्भात उच्चारावा यासाठी जणू त्या देवाची प्रार्थनाच करीत होत्या.

Leave a Comment