प्रियंकाच तारणहार

priyanka-gandhi
उत्तर प्रदेशात आता येत्या काही महिन्यांत विधान सभेची निवडणूक होणार आहे आणि तिच्या दृष्टीने कॉंगे्रस पक्षात जरा लवकरच हालचाली सुरू झाल्या आहेत. कॉंग्रेसचे सल्लागार प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर करावे असा सल्ला दिला होता पण पक्षातल्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधीच्या ऐवजी प्रियंका गांधी यांना आगामी मुख्यमंत्री म्हणून जाहीर करावे असा आग्रह धरला असून सोनिया गांधी यांचा चांगल्याच पेचात टाकले आहे. बहुसंख्य कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधी याच निवडणुका जिंकून देतील असा विश्‍वास व्यक्त केला आहे.

भारतात नेतृत्वाच्या करिष्म्याला फार महत्त्व दिले जाते कारण भारतीय लोक व्यक्तिपूजक आहेत. तेव्हा भारतीयांचा हा स्वभाव ओळखून राहुल गांधींच्या ऐवजी त्यांच्यापेक्षा अधिक करिष्माई व्यक्तिमत्त्व असलेल्या प्रियंका वड्रा यांच्या नावाला प्राधान्य मिळत आहे. दोन वर्षांपूर्वी तर अलाहाबाद युवक कॉंग्रेसने तसे फलकही लावले होते. पण सोनिया गांधी यांनी हे फलक हटवायला लावले आणि ते लावणारांवर कारवाईही केली. आता तर राज्यातल्या सहाशे तालुका कॉंग्रेस कमिट्यांनी प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा करून पुन्हा एकदा प्रियंका लाओ हा पुकारा केला आहे.

यावर अजून तरी सोनिया आणि राहुल यांची प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही पण त्यात अनेक धोके आहेत याची त्यांना जाणीव आहे. कारण आज प्रियंका वड्रा यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे आणि त्यातून ‘राहुल नको’ अशी मागणी ध्वनित होत आहे. तेव्हा पक्षाने प्रियंकाचे नाव जाहीर केले तर राहुल यांचे नेतृत्व कॉंग्रेसने अमान्य केले आहे असे मत तयार होईल, राहुल गांधी यांना अपात्र समजले गेले आहे हे दिसून येईल. प्रियंका गांधीही यशस्वी झाल्या नाहीत तर पुन्हा राहुल गांधी यांचे नेतृत्व पुढे आणण्याचे सारे दरवाजे बंद झालेले असतील. तेव्हा या बाबतीत जपूनच पावले टाकायला हवीत. एक गोष्ट मात्र नक्की आहे की पक्षाला वाचवायचे असेल तर एक राहुल आणि दोन प्रियंका असे दोनच पर्याय कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिसत आहेत. त्यांना गांधी घराण्याच्या बाहेर कोणी पक्षाला वाचवणारा जन्माला आला आहे यावर विश्‍वास दिसत नाही. शेवटी कॉंग्रेसचे कार्यकर्ते गांधी घराण्यालाच तारणहार मानतात. त्यापेक्षा वेगळा विचारच करीत नाहीत.

Leave a Comment