साखर उत्पादनाला फटका

sugar-factory
साखर संचालकांनी नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात गतवर्षीपेक्षा या वर्षी साखरेचे उत्पादन ११ टक्क्यांनी घटणार असल्याचे म्हटले आहे. गतवर्षी भारतात दोन कोटी ८४ लाख मेट्रिक टन एवढे साखर उत्पादन झाले होते. तर यंदा त्यामध्ये घट होऊन ते दोन कोटी त्रेपन्न लाख टन होणार असल्याचे अनुमान आहे. म्हणजे साखरेच्या मंदीचे तीन वर्षे सुरू झाली आहेत. या पूर्वीची तीन वर्षे साखरेच्या तेजीची होती. हे तेजी-मंदीचे चक्र सुरू असतानाच एकंदरीत साखर उत्पादन चांगलेच वाढलेले आहे. १९८० च्या दशकात देशभरात १ कोटी टन साखर तयार व्हावी असे स्वप्न सरकार बघत होते. १९८५ नंतर कधीतरी हा १ कोटी टनाचा आकडा गाठला गेला.

१९८०-९० च्या दशकामध्ये साखर परदेशातून आयात करावी लागत होती आणि त्या आयातीतून लोकांची साखरेची गरज भागवली जात होती. उत्पादन मर्यादित आणि मागणी मात्र प्रचंड असा प्रकार घडला की त्या विशिष्ट मालाचे वाटप रेशन दुकानातून केले जाते. तसे ते साखरेचेही केले जात होते. रेशन दुकानामध्ये दरडोई दर महिन्याला चारशे ग्रॅम साखर मिळत होती आणि तीही मिळवण्यासाठी रेशन दुकानासमोर रांगा लागत होत्या. आता देशातला गरिबातला गरीब माणूससुध्दा चारशे ग्रॅस साखरेसाठी दुकानासमोर एक तास उभा राहील हे संभवत नाही. साखरेचे रेशनिंग जवळजवळ उठलेच आहे. एवढी विपुल साखर आपल्या देशात तयार होत आहे आणि तिचे व्यवस्थापन करता करता सरकारला नाकीनव येत आहे.

साखरेचा हिशोब मांडताना त्यांनी ग्राहकांचाच विचार केला जातो आणि दरडोई साखर वापराचा निकष लावून साखरेचे अर्थकारण आणि वितरणाचे व्यवस्थापन यांचा विचार केला जातो. परंतु अलीकडे करण्यात आलेल्या काही पाहण्यांमध्ये असे आढळले आहे की देशात उत्पादन होणार्‍या साखरेपैकी ५५ टक्के साखर ही आईस्क्रिम, मिठाया, थंड पेये यांच्या निर्मितीत वापरली जाते. उर्वरित ४५ टक्के साखर चहा, कॉफी, दूध यासाठी आणि घरगुती वापरात वापरली जाते. जेव्हा साखरेचे दर वाढतात तेव्हा फार आरडाओरडा केला जातो पण तो आरडाओरडा देशातल्या सामान्य जनतेचा नसतो तर तो मिठाया, आईस्क्रिम आणि थंड पेये करणार्‍या उत्पादकांचा असतो. कारण सामान्य माणसाच्या अर्थकारणावर साखरेच्या भाववाढीचा फार गंभीर परिणाम होत नसतो. तेव्हा साखर महाग झाली म्हणून जो आरडाओरडा होतो तो आईस्क्रिम, मिठाई आणि थंड पेये यांच्या उत्पादकांचा असतो आणि ही लॉबी फार बळकट असल्यामुळे साखरेचे मार्केट आपल्या आवाक्याच्या बाहेर जाऊ नये याबाबत हे लोक फार दक्ष असतात.

Leave a Comment