भ्रष्टाचार; एक चिंतन

corruption
सारा देश भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे. देशातले पुढारी सरकारी अधिकारी आणि पोलीस प्रचंड भ्रष्टाचार करत आहेत. हा भ्रष्टाचार असाच जारी राहिला तर एक दिवस सारा देश भ्रष्टाचारात बुडल्याशिवाय राहणार नाही. एखाद्या मध्यमवर्गीय माणसाला देशातल्या भ्रष्टाचाराविषयी प्रश्‍न विचारला तर तो मोठ्या सात्वित संतापाने वरील शब्दात एक भाषण देतो. परंतु देशातला हा भ्रष्टाचार नष्ट व्हावा यासाठी तो एक पाऊलसुध्दा पुढे टाकायला तया नसतो. अर्थात भ्रष्टाचाराचा खात्मा करणे हे काही अशा मध्यमवर्गीय माणसाचे काम नव्हे. ते करणारे अण्णा हजारे सारखे खरोखरच धाडसी लोक आवश्यक आहेत. मात्र या मध्यमवर्गीय माणसाने भ्रष्टाचाराच्या विरोधात लढावेच असावे असे आपण म्हणू शकणार नाही. मात्र त्याने स्वतः भ्रष्टाचार करू नये, शासन दरबारातील एखादे काम उशिरा झाले तरी चालेल पण आपण कोणाला लाच देणार नाही आणि संधी आली तर लाच खाणारही नाही अशी प्रतिज्ञा त्याने करावी. त्यांनी एवढी गोष्ट केली तरी देशातला भ्रष्टाचार बराच कमी होऊ शकतो. परंतु आपण लोक भाषण देण्यापलीकडे काहीच करत नाही.

हे भाषणसुध्दा जाहीरपणे देत नाही तर आपल्या मित्रांसमोर आणि बायका मुलांसमोर देतो आणि प्रत्यक्षात आपण स्वतःसुध्दा भ्रष्टाचारात लिप्त असतो हे तो मान्य करत नाही. नुकतेच एका पोलीस अधिकार्‍याशी बोलण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांच्याशी बोलताना मी नेहमीप्रमाणे, पोलीस सध्या जास्त भ्रष्टाचार करत आहेत असा आरोप केला. तो आरोप ऐकल्यावर त्या पोलीस अधिकार्‍याला राग आला खरे परंतु त्याने आपला राग आवरला आणि भ्रष्टाचाराच्या संबंधात काही माहिती सांगून मलाच काही प्रश्‍न विचारले. पोलीस खात्यात भ्रष्टाचार असतो हे त्यांनी मान्य केले. मात्र पोलीस अधिकारी सतत गुन्हे करणार्‍या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडूनच पैसे खात असतात असे त्यांनी म्हटले. पोलीस पैसा खात असले तरी देशातल्या प्रत्येक व्यक्तीचा पोलिसांशी कधी संबंधही येत नाही आणि आपणही पोलिसांना पैसे दिले असे सांगणारे फार कमी लोक भेटतात. या अधिकार्‍याने विचारलेला एक प्रश्‍न फार भेदक होता. त्याने आमच्यासमोर बसलेल्या सर्वांनाच एक प्रश्‍न विचारला, ‘तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत प्रवेश देताना देणगी दिलेली आहे का?’ प्रत्येकांनी सांगितले की आम्ही देणगी दिलेली आहे. परंतु मुलांच्या शाळा प्रवेशासाठी देणगी देणे हा कायद्याने गुन्हा आहे हे बर्‍याच लोकांना माहीतसुध्दा नव्हते. परंतु या पोलीस अधिकार्‍याने याची जाणीव करून दिली आणि देशातल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा शाळा प्रवेश हा देणगी देऊन, संबंधित कायदा मोडून झालेला असतो. हे कटूसत्य सांगितले.

पोलीस भ्रष्टाचार करतात, सार्वजनिक बांधकाम खात्यात खूप भ्रष्टाचार असतो परंतु या भ्रष्टाचारामध्ये प्रत्येक व्यक्ती गुंतलेली नसते. परंतु शाळेत प्रवेश घेण्याच्यावेळी प्रत्येक जण भ्रष्टाचार करत असतो. त्याचा हा युक्तिवाद बिनतोड होता. त्या पुढे जाऊन त्याने आणखी एक गोष्ट सांगितली. लग्नात हुंडा देणे-घेणे हा कायद्याने गुन्हा आहे, एवढेच नव्हे तर सासर्‍याने जावयाला काही भेटवस्तू देणे यालासुध्दा कायद्याने काही बंधने घातलेली आहेत. त्याशिवाय सरकारी कर्मचार्‍यांवर, त्यांच्या घरच्या लग्न समारंभात किती खर्च झाला आणि त्यांना कोणी कोणी भेटवस्तू दिल्या याची माहिती सादर करण्याचेसुध्दा बंधन आहे. मात्र लग्न समारंभातले हे दोन कायदे सरसकट सर्व लोक मोडत असतात. त्याला अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच सन्माननीय अपवाद असतात. मात्र लग्न समारंभात आपण कायद्याने ठरवून दिलेली अनेक बंधने मोडत असतो, भ्रष्टाचार करत असतो. मात्र आपण भ्रष्टाचार करत आहोत याची फार कमी लोकांना जाणीव असते आणि ज्यांना जाणीव असते त्यांना खंत नसते पण तरीही हे लोक भ्रष्टाचाराच्याबाबतीत लोकांवर आरोप करत असतात.

नुकतेच मित्राने छगन भुजबळबद्दल प्रश्‍न विचारला की छगन भुजबळ हे त्यांच्यावरील खटल्यातून सुटतील का त्यांना शिक्षा होईल? अनुभवी पत्रकार म्हणून त्यांना माझे मत हवे होते. त्यांना मी वेगळ्या पध्दतीने माहिती दिली. तुम्ही चप्पल खरेदी करता आणि दुकानदाराकडे पावती मागत नाही. हा गुन्हा आहे हे तुम्हाला माहीत आहे का? आपण सरळ सरळ पावती नाकारतो आणि सरकारचे कराचे उत्पन्न कमी करत असतो. आपल्यावर या प्रकरणात कोणी खटला भरत नाही म्हणून आपण सुरक्षित राहतो. पण तसा खटला भरण्याचा निर्णय कोणी घेतलाच तर आपल्याला शिक्षा होऊ शकते. आता छगन भुजबळ यांना जवळपास २ हजार कोटी रुपयांचा अपहार केल्याबद्दल कोर्टात खेचण्यात आले आहे. त्यांचे हे २ हजार कोटी रुपयांचे अनेक व्यवहार कायदेशीरच असतील का? कितीतरी ठिकाणी आपण चप्पल खरेदी करताना जसा भ्रष्टाचार करतो तसा त्यांनी केलाच असणार. त्यामुळे त्यांच्या सुटण्याचा प्रश्‍नच नाही. एवढ्या मोठ्या व्यवहारापैकी एक छोटासा व्यवहार जरी कायद्याच्या कचाट्यात सापडला तरी तरी भुजबळ गजाआड जाऊ शकतात. आपण सगळे भ्रष्टाचारावर लेक्चर देतो परंतु लहान मोठ्या पातळीवर आपण सगळे भुजबळच असतो. मात्र पोलीस पैसे खातात असा आरोप करत असतो.

Leave a Comment