राज्यसभेतील आकर्षणाचे केंद्र

subramaniam-swami
डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांना भारतीय जनता पार्टीने पुढाकार घेऊन राज्यसभेवर नेमले आहे. त्यांची ही नियुक्ती होण्याआधीच ते राज्यसभेमध्ये सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र होणार असे अंदाज व्यक्त केले जातच होते आणि त्यांनी त्याची झलकही दाखवली. नियुक्तीनंतरच्या पहिल्या दोन दिवसातच त्यांनी राज्यसभेत कॉंग्रेसला अस्वस्थ करून सोडले. त्यांच्या सुदैवाने म्हणा की कॉंग्रेसच्या दुर्दैवाने म्हणा त्यांनी सदस्यत्त्वाची शपथ घेताच इटलीतील हेलिकॉप्टर खरेदीचे प्रकरण उद्भवले आणि सोनिया गांधीवर शरसंधान साधण्याची संधी मिळाली. ती संधी साधत सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया गांधींचे नाव घेऊन आरोप केला. संसदेत केलेल्या अशा आरोपावरून अब्रु नुकसानीचा दावा करता येत नाही. त्याचा लाभ उठवत सोनिया गांधी यांना अस्वस्थ करून सोडले आणि कॉंग्रेसच्या सदस्यांनाही संतप्त केले.

गेले दोन तीन दिवसतरी राज्यसभेत सुब्रमण्यम स्वामीच गाजत आहेत. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना आनंद होत असेल कारण डॉ. स्वामी हे अशी विचित्र पीडा आहे की ती कोणा ना कोणाच्या मागे लागते तेव्हा त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना आनंद होतो. तेव्हा आता सोनिया गांधी यांच्या मागे लागल्यामुळे भाजपच्या नेत्यांना आनंद होत आहे. पण सुब्रमण्यम स्वामी हा विचित्र माणूस भाजपाच्या मागे हात धुवून कधी लागेल याचा काही नेम सांगता येत नाही. भारताच्या राजकारणात ऍड. राम जेठमलानी आणि सुब्रमण्यम स्वामी ही अशी दोन माणसे आहेत की ज्यांना वन मॅन आर्मी म्हटले जाते. ते कोणत्याही पक्षात जातात आणि काय वाटेल ते करतात. मात्र आपल्या अभ्यासूपणाने राजकारणात नव्या लाटा निर्माण करण्याची ताकद त्यांच्यात असल्याने त्यांना सगळेच टरकून असतात.

डॉ. स्वामी मुळात जनसंघात होते आणि त्यांना १९७४ साली जनसंघाने राज्यसभेवर घेतले होते. याच काळात आणीबाणी आली. आणीबाणीत सुब्रमण्यम स्वामी यांनी चांगले काम केले पण आणीबाणी नंतरच्या मोरारजी मंत्रिमंडळात त्यांना संधी मिळाली नाही. त्यांची उपेक्षा होत गेली आणि ते सातत्याने पक्ष बदलत गेले. शेवटी १९९१ साली जनता पार्टीचे सदस्य म्हणून ते चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळात आले. त्यांनी १९९८ साली सोनिया गांधींना हाताशी धरून वाजपेयी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आले परंतु हे कारस्थान करत असताना त्यांची सोनिया गांधी आणि जयललिता यांच्याशी जुळलेली मैत्री तुटली. त्यामुळे त्यांनी या दोघींना जेलमध्ये पाठवण्याची प्रतिज्ञा केली आहे. जयललितांना त्यांनी तुरुंगवास घडवला आहेच आता ते सोनिया गांधी यांच्या मागे लागले आहेत.

Leave a Comment