पाण्याचा गंभीर प्रश्न

water1
पाणी अडवणे आणि पाणी जिरवणे या दोन गोष्टी केल्या की पाण्याचा प्रश्‍न बराचसा सौम्य होणार आहे असे सांगितले जाते आणि त्यात बरेच तथ्य आहे. परंतु एवढ्याने प्रश्‍न सुटतो का तर या प्रश्‍नाचे उत्तर नाही असे आहे. पाण्याशी निगडित कितीतरी प्रश्‍न आता समोर यायला लागले आहेत. जलाशयातील पाणी संपत आले आहे त्यामुळे खालच्या थरातील पाणी खरवडून घेतले जाते आणि त्यातून अनेक प्रकारचे दूषित पदार्थ मिसळलेले असतात. अशा पाण्याच्या सेवनाने काही रोगांचा प्रसार होतो. त्यामुळे आता जिथे पाण्याची तीव्र टंचाई आहे तिथे रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. त्यातल्या त्यात गॅस्ट्रोच्या साथी पसरण्याची भीती अधिक आहे. आज मराठवाड्यामध्ये खूप खोलावर जाऊन पाणी शोधले जात आहे. विज्ञानाने मोठी प्रगती केल्यामुळे असे होईलही परंतु आपण जेवढ्या खोलवर जाऊन पाणी शोधायला लागू तेवढे नवे प्रश्‍न निर्माण व्हायला लागतील.

५०० फूटच काय परंतु १००० फूट खोलीवर जाण्याचीही क्षमता विज्ञानाने निर्माण केली आहे. परंतु आपण जेवढे खोलवर जाऊन तेवढी जमिनीतली काही मूलद्रव्ये पाण्यात मिसळलेली दिसायला लागतील आणि एवढ्या खोलीवरचे पाणी हे अनेक प्रकारचे दोष घेऊन वर आलेले असेल. यातली काही मूलद्रव्ये मुलांच्या दातांवर फ्लोराईडचे थर साचवण्यास कारणीभूत ठरतात. कारण खोलावरच्या पाण्यात फ्लोराईड मिसळलेले असते. गेल्या वर्षी सोलापूर जिल्ह्यात केलेल्या एका पाहणीमध्ये पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली या गावाच्या परिसरातील मुलांची नखे सरसकट निळी असल्याचे आढळले. त्याचा अधिक तपास केला असता हा पाण्याच्या दूषित द्रव्यांचा परिणाम असल्याचे सांगण्यात आले. म्हणजे पाण्याची उपलब्धता हाच विषय आहे असे नाही तर पाण्यातील भेसळ किंवा दोष हा सुध्दा चिंतेचा आहे.

मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील पाण्याचे नमुने तपासण्यात आले असता त्यातील २० ते २५ टक्के नमुने हे सदोष आढळले. काही जिल्ह्यातील विशेषतः जालना जिह्यातील पाण्याच्या नमुन्यांपैकी ३६ टक्के नमुने दूषित आढळले. त्याचबरोबर याच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ४३ टक्के नमुने दूषित असल्याचे दिसले. तेव्हा पाणी सापडते म्हणून फार खोलवर जाण्यात काही अर्थ नाही. खोलात पाणी मिळेलही पण ते पाणी अनेक रोगांना कारणीभूत ठरेल. म्हणून याबाबत सावध राहिले पाहिजे.

Leave a Comment