
राजस्थान ही मरूभूमी म्हणजे वाळवंटांची भूमी म्हणून ओळखली जाते. मात्र येथेही निसर्गसंपन्न आणि हिरवाईने तसेच धबधब्याने नटलेले असे एक खास पर्यटनस्थळ आहे. मेणाल नावाचे हे पर्यटनस्थळ येथील मेणाल नदी, तिच्यावरचा धबधबा आणि सुंदर शिवमंदिरासाठी प्रसिद्ध आहे. चारीबाजूंनी दाट झाडीने नटलेले हे स्थळ पर्यटकांची इतिहास, पुरातत्व, पर्यटन व आस्था अशी सर्व प्रकारची गरज पुरी करू शकते. चितोड राजमार्गावर बुंदीपासून १०० किमी अंतरावर हे छोटेसे पर्यटन स्थळ वसले आहे.
मेणाल -मरूभूमी राजस्थानातील हिरवेकंच पर्यटन स्थळ

या छोट्याशा गावात ग्रॅनाईट खडकांवर आदळणारा व तुषारांच्या वर्षावात चिंब भिजविणारा मेणाल नदीवरचा धबधबा आहे. निर्मळ पाण्याच्या काठावरच महानाळेश्वर मंदिर हे प्राचीन शिवमंदिर आहे. घोड्याच्या नालाचा आकाराचा धबधबा व शिवमंदिर परिसरातील अनेक छोटी मंदिरे या भागाला एक अनामिक सौंदर्यं प्रदान करतात. ही मंदिरे व मुख्य शिवालय दिल्ली अजमेरच्या चौहान वंशातील राजांनी बांधल्याचे सांगितले जाते. ही मंदिरे १०-११ व्या शतकातील आहेत.
मुख्य महानाळेश्वर मंदिरात छत्रीखाली महाकाय नंदी आहे आणि मंदिराच्या भिंतींवर देवदेवता, अप्सरा, हत्ती, वाघांच्या मूर्ती कोरल्या गेल्या आहेत. पत्थरात कोरलेली वेलबुट्टी अप्रतिमच. येथे जाताना वेळ असल्यास बुंदीपासून जवळची तारागढ, बुंदी महाल, रानीजीकी बावडी ही स्थळेही पाहता येतात. मेणालमध्ये राहण्याची व्यवस्थाही चांगली आहे. वर्षभर येथे जाता येत असले तरी पावसाळ्यात या जागेचे सौंदर्य आणखीनच खुलते.
