कारपेक्षाही महाग अननस

ananas
पश्चिमी देशात अननसाचा वापर अन्नपदार्थात करणे रॉयल मानले जाते. ब्रिटनसारख्या थंड देशात अननसासारखी फळझाडे वाढविणे थंडीमुळे दुरापास्त असते मात्र तरीही ब्रिटनमध्ये एका खास प्रकारच्या अननसाची लागवड खास तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केली जाते. ऐकून नवल वाटेल तर खास तंत्राने वाढविलेले हे अननस नेहमीच्या अननसाच्या आकाराच्या निम्मेच असतात मात्र त्यांच्या किंमती कल्पनेपलिकडे असतात. अशा अननसाची किंमत १६ हजार डॉलर्स म्हणजे १० लाख रूपयेही असते. याचाच अर्थ कारच्या किंमतीत हे अननस विकले जातात. जगातले हे सर्वात महागडे अननस मानले जातात.

इंग्लंडच्या लॉस्ट गार्डन ऑफ हेलिगन जवळ काचघरे उभारून या अननसाचे उत्पादन घेतले जाते. यासाठी ४० फूट लांब व ४ फूट खोलीचे खड्डे खोदले जातात आणि त्यात घोडयाच्या लिदीपासून बनविलेले खत व फवारणीसाठी घोड्याचे मूत्र वापरले जाते. ही पद्धत व्हीक्टोरियन काळातली आहे. झाडाला फळ आले की त्याची देखभालही फार काळजीपूर्वक केली जाते. असे अननस उत्पादन घेणारे शेतकरी फारच थोडे आहेत आणि इतक्या काळजीकाट्याने हे अननस वाढविले जात असल्याने त्यांच्या किमतीही भरमसाठ असतात असे समजते. इतका महागडा अननस रॉयल मेजवानीशिवाय अन्यत्र कुठे वापरणार म्हणून अननस रॉयल फूड म्हणून ओळखला जातो.

Leave a Comment