चला पाणी पेरू या…

water1
उन्हाची तलखी वाढायला लागली की लोकांना त्रास होतो हे खरे परंतु ऊन जेवढे कडक असेल तेवढा पावसाळा छान असेल असा एक ठोकताळा ग्रामीण भागात रूढ झालेला असतो. त्यामुळे ऊन तापायला लागले की लोकांना एकप्रकारे आशा वाटायला लागते. ऊन तापत आहे त्या अर्थी पावसाळा छान असणार असे बोलले जाते. या वर्षी ऊन खूप तापायला लागले आहे आणि पाठोपाठ चांगल्या पावसाचाही अंदाज व्यक्त व्हायला लागला आहे. शेतकर्‍यांसाठी तर ही पर्वणी आहेच. परंतु पाणी टंचाईने त्रस्त असलेल्या सर्वांसाठीच ती एक शुभवार्ता आहे. यावर्षी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज स्कायमेट या खासगी संस्थेने व्यक्त केला आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार जूनमध्ये या महिन्याच्या सरासरीपेक्षा ९० टक्के पाऊस पडणार आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यात नेहमीच्या सरासरीच्या १०५ ते ११५ टक्के पावसाचा अंदाज या संस्थेला वाटत आहे. म्हणजे एकंदरीत चालू वर्षीचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त आहे. शेतकर्‍यांसाठीच नव्हे तर पाणी टंचाईचे परिणाम भोगणार्‍या सर्व समाजघटकांसाठी ही चांगली बातमी आहे.

हवामानाच्या अंदाजांमध्ये सगळे प्रकार असतात. हवामानाचा अंदाज घेतानाच जास्त पाऊस पडण्याची शक्यता किती आहे आणि दुष्काळ पडण्याची शक्यता किती आहे याचा अदमास घेतला जातो. त्यानुसार चांगला पाऊस पडण्याची शक्यता ९० टक्के असून दुष्काळ पडण्याची शक्यता केवळ ५ टक्के एवढी आहे. एकंदरीत गेल्या तीन वर्षातील शेती व्यवसायाचे नष्टचर्य संपणार आहे. परंतु आपल्या देशामध्ये सध्या निर्माण झालेली पाणीबाणी या पावसाने संपणार आहे का, हा प्रश्‍न अधिक महत्त्वाचा आहे. ही पाणीबाणी संपावी एवढा वर्षाव निसर्गाकडून होणार आहे परंतु निसर्गाचे हे देणे आपण नेहमीप्रमाणे हेळसांड करून वाया घालवले तर मात्र पाऊस पडूनसुध्दा पाणीबाणी लागणारच आहे. म्हणजे पाण्याची टंचाई ही केवळ निसर्गावर अवलंबून नसते तर ती बरीचशी आपल्यावरसुध्दा अवलंबून असते. अमेरिका हा देश श्रीमंत का आहे याची अनेक कारणे दिली जातात. परंतु या देशाच्या श्रीमंतीला त्यांचे पाणी अडवणे हेही एक महत्त्वाचे कारण आहे. कारण पाणी ही विकासाची महत्त्वाची साधनसंपत्ती आहे. अमेरिकेत जेवढा पाऊस पडतो त्या पावसाच्या १३० टक्के एवढे पाणी अडवण्याच्या सोयी त्या देशात आहेत. भारतात मात्र जेवढा पाऊस पडतो त्याच्या केवळ १५ टक्के एवढाच पाऊस अडवला जातो आणि पावसातून पडणारे ८५ टक्के पाणी समुद्राला जाऊन मिळते.

जेवढे १५ टक्के पाणी अडवले जाते त्याचेही व्यवस्थापन आपण चांगले करत नाही. त्यामुळे आपण गरीब आहोत आणि १०-१२ वर्षातून कधीतरी एकदोनदा तीव्र दुष्काळात होरपळून निघत आहोत. आपल्या देशात दुष्काळाचे कायमचे निवारण हा शब्द वापरला तरी लोक हसायला लागतात. इतकी त्यांनी अधूनमधून दुष्काळ पडण्याची शक्यता कायमच गृहित धरलेली असते. परंतु जगाच्या पाठीवर असे अनेक देश आहेत की ज्या देशांमध्ये दुष्काळ नावाची गोष्ट कायमची हद्दपार झालेली आहे. ते देश आता आत्मविश्‍वासाने असे म्हणत आहेत की सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणे म्हणजे दुष्काळ नव्हे. कमी पाऊस पडणे म्हणजे अवर्षण आणि अवर्षणाचा सामना करण्याची तयारी न केल्यामुळे जो पडतो तो दुष्काळ. तेव्हा अवर्षण हे नैसर्गिक असते. पण दुष्काळ मात्र मानवी गैरव्यवस्थापनातून निर्माण होतो. या गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजेत. परंतु त्यासाठी विशिष्ट मानसिकता आवश्यक आहे. जी आपल्याकडे नाही. आपल्याकडे दुष्काळ म्हणजे नैसर्गिक संकट आणि त्याचे निवारण करायचे झाले तर ते सरकारनेच केले पाहिजे असे सरसकट मानले जाते.

या उपरही दुष्काळ निवारणासाठी शेतकर्‍यांनीसुध्दा पुढाकार घेऊन काहीतरी केले पाहिजे असे म्हणण्याचे धाडस जरी कोणी केले तरी सगळे राजकीय नेते आणि माध्यमातले प्रतिनिधी असे धाडस करणार्‍याला शेतकरी विरोधी ठरवून त्याच्या विरुध्द काव काव करायला लागतात. परंतु शेतकरी हा घटकसुध्दा दुष्काळ निवारणासाठी कार्यरत झाला पाहिजे हे सत्य आहे. ते कोणाला आवडो की न आवडो. हे सत्य सांगताना एक गोष्ट आवर्जुन सांगितली पाहिजे की आपण एखाद्या वर्षी पडलेला सरासरी एवढा पाऊस नीट अडवला आणि जिरवला तर जिरलेले पाणी दोन वर्षे पुरू शकते. अर्थात या सगळ्या गोष्टी बर्‍याच अंशी खडकाच्या प्रकारावर अवलंबून आहेत. परंतु महाराष्ट्राच्या मोठ्या भागात हे खरे आहे. म्हणून चांगला पाऊस पडल्याबरोबर दुष्काळाचे विस्मरण होऊ देता कामा नये.

यंदा तर छान पाऊस पडला पण पुढच्या वर्षी तसा पडेलच याची खात्री नाही, असे आपल्या मनाशी समजून घेतले पाहिजे आणि पावसाचा थेंब अन् थेंब जतन करून ठेवला पाहिजे. तेव्हा वेधशाळांचे अंदाज खरे ठरले तर शेतकर्‍यांचे अभिनंदन करावे लागेल. मात्र ते करतानाच पडलेला पाऊस बँकेत पैसे ठेवावेत तसा जतन करून ठेवला पाहिजे हीही जाणीव त्यांना द्यावी लागेल. सुदैवाने असा विचार सरकार करत आहे आणि पाणी अडवून जिरवण्याच्या सगळ्या प्रकारच्या योजनांना सरकारचे पाठबळ मिळत आहे. त्याचाही जास्तीत जास्त फायदा घेऊन पावसाचे पाणी पेरले पाहिजे. पेरल्याशिवाय पीक येत नाही हे सर्वांना माहीत आहे तेव्हा पाण्याचे पीक येण्यासाठी पाणी पेरले पाहिजे. सुदैवाने आज समाजामध्ये पाणी पेरण्याची कल्पना मूळ धरायला लागली आहे. आपण पाणी पेरले नाही तर आपल्यावर किती वाईट वेळ येऊ शकते याची कल्पना लातूरवरून आली आहे. आज लातूर जात्यात आहे. परंतु आपण सुपात आहोत आणि कधी ना कधी आपणही जात्यात जाणार आहोत तेव्हा आताच सावध झाले पाहिजे आणि पाणी जतन केले पाहिजे ही जाणीव वाढत आहे ही सुदैवाची गोष्ट आहे.

Leave a Comment