शिवसेनेचे तळ्यात मळ्यात

shivsena
शिवसेना हा पक्ष महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असला तरी या पक्षाचा एक पाय नेहमीच पक्षाच्या बाहेर दिसत आहे. सत्तेत असतानाही पुरेसा मान मिळत नाही. म्हणून अस्वस्थ असलेल्या शिवसेना नेत्यांची कोंडी या भूमिकेतून स्पष्ट होत आहे. काल एका समारंभात बोलताना उध्दव ठाकरे यांनी, प्रश्‍न सुटणार नसतील तर असे उद्गार काढून सरकारमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण केली आहे. नाशिक येथे भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली आणि नेमकी या बैठकीच्या वेळीच शिवसेनेेने वेगळे होण्याची ही पुडी सोडून दिली. त्यामुळे भाजपाच्या बैठकीवर या पुडीचे नाही म्हटले तरी थोडेसे सावट पसरलेले दिसले.

शिवसेनेला सत्ता तर पाहिजे, युती तर पाहिजे परंतु जिथे सरकार कमी पडते तिथे शिवसेनेचे नेते सरकारवर तुटून पडतात आणि तिथे विरोधी पक्षाच्या भाषेत बोलायला लागतात. यापूर्वीची १५ वर्षे महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांचे आघाडीचे सरकार होते आणि या सरकारमध्ये शरद पवार अशीच दुटप्पी भूमिका पार पाडत असत. म्हटले तर सरकारमध्ये आहेत परंतु सरकार चुकले तर मात्र शरद पवार विरोधी पक्षाच्या भाषेत बोलत असत. त्यातून त्यांना काय साध्य झाले आणि राष्ट्रवादीचे पुढे काय झाले याचा विचार शिवसेनेने करायला पाहिजे. परंतु उध्दव ठाकरे याबाबतीत तरी शरद पवारांची नक्कल करत आहेत आणि महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त भागामध्ये सरकारवर टीकेची झोड उठवत दौरे करत आहेत.

त्यामुळे भाजपाचे नेतेही शिवसेनेच्या नाकदुर्‍या काढण्याच्या मनःस्थितीत नाहीत. तेही शिवसेनेला फारशी किंमत देत नाहीत आणि अशा मनःस्थितीतच मुंबई महानगरपालिकेसह महाराष्ट्रातल्या काही महापालिकांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या महानगरपालिकांच्या क्षेत्रात विशेषतः मुंबईमध्ये शिवसेनेचा जोर आहे आणि तिथे आपल्याला भाजपापेक्षा जास्त किंमत मिळाली पाहिजे असा शिवसेनेचा आग्रह आहे. मुंबईत शिवसेना मोठी आहे. तेव्हा मुंबई महापालिकेची निवडणूक लढवताना भाजपाने शिवेसेनेपुढे जागांसाठी पदर पसरावा अशी शिवसेनेची अपेक्षा आहे. पण भाजपाचे नेते त्या मनःस्थितीत नाहीत. त्यामुळे शिवसेनेपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. मुंबईत शिवसेना सत्ताधारी आहे. परंतु त्यांचे सत्ताधारी असणे हे भाजपाशी असलेल्या युतीवर अवलंबून आहे. त्यामुळे म्हटले तर भाजपाची गरजही आहे पण भाजपाची दादागिरी नको आहे. अशी कुतरओढ सुरू असलेल्या शिवसेनेने आता या निवडणुकांच्या तोंडावर स्वबळावर निवडणुका लढवण्याचा विचार सुरू केला आहे.

Leave a Comment