आघाडीतली विसंगती

rahul-gandhi
‘पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांचे सरकार पराभूत करण्यासाठी आम्ही डाव्या आघाडीशी युती केली आहे तेव्हा बंगालमधील मतदारांनी डाव्या आघाडीच्या उमेदवारांना मते देऊन त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे’ – राहुल गांधी (पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारसभेतून)

‘डावी आघाडी आणि या आघाडीतील कम्युनिष्ट पक्ष हे कालबाह्य विचार कवटाळून बसले आहेत. तेव्हा केरळमधल्या जनतेने या डाव्या आघाडीला आणि कम्युनिष्टांना मते देऊ नयेत. त्यांचा पराभव करावा. ’ – राहुल गांधी (केरळमधील निवडणूक प्रचारसभेतून)

राहुल गांधी सध्या तारेवरची कसरत करत आहेत. त्यांनी केरळमध्ये डाव्या आघाडीच्या विरोधात दंड थोपटले आणि या आघाडीचा पराभव करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. दुसर्‍या बाजूला पश्‍चिम बंगालमध्ये हेच राहुल गांधी कम्युनिष्टांना सोबत घेऊन ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी जिवाचे रान करत आहेत.

एकाच वेळी होत असलेल्या निवडणुकीत एका राज्यातला मित्रपक्ष हा दुसर्‍या राज्यातला शत्रूपक्ष आहे. एवढा संधीसाधूपणा करायचा होता तर प्रचार सभांत भाषणे करताना काही पथ्ये पाळायला पाहिजे होती. केरळमध्ये कम्युनिष्टांच्या विरोधात बोताना ते कालबाह्य विचार मांडत आहेत असे तरी म्हणायला नको होते. राहुल गांधी हे सध्या आपली प्रचाराची मोहीम एका विशेषज्ञाच्या सल्ल्याने राबवत असल्याचे सांगितले जात आहे. याच विशेषज्ञाने आजवर नरेंद्र मोदी यांना विजयी केलेले आहे आणि बिहारमध्ये या विशेषज्ञाने नरेंद्र मोदींचा पराभवही करून दाखवला आहे.

एवढा विशेषज्ञ पाठिशी असतानाही राहुल गांधी यांना आपण दोन वेगळ्या राज्यांमध्ये एकाचवेळी परस्पर विरोधी भूमिका घेत आहोत त्यामुळे लोकांपुढे उघडे पडत आहोत हे कसे कळत नाही? या विशेषज्ञाने राहुल गांधींचा विजय घडवण्याचे कंत्राट घेतले आहे की खरोखरच कंत्राट घेण्याच्या नावावर राहुल गांधींनाच पराभूत करण्याचे डावपेच आखायला सुरूवात केली आहे हे काही कळत नाही. अर्थात कोणी कसलेही कंत्राट घेतले तरी ज्याचे कंत्राट घेतले आहे त्याच्या बुध्दिमत्तेवरच त्या कंत्राटाचे काय होणार हे ठरत असते. कितीही चांगला शिक्षक असला तरी तो नेहमी नापास होणार्‍या विद्यार्थ्याला गुणवत्ता यादीत आणू शकत नाही.

Leave a Comment