मंदिरे आणि फोटोग्राफी

photography
सध्या आपल्या देशातली आणि विशेषतः महाराष्ट्रातली मंदिरे अनेक वादांमुळे गाजत आहेत. परंतु काल त्र्यंबकेश्‍वरच्या मंदिरात एका वेगळ्याच गोष्टीमुळे वाद निर्माण झाला. पर्यटक आणि भाविक म्हणून तिथे आलेल्या एका कुटुंबाने देवालयाशेजारी उभे राहून फोटो काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिथल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला हरकत घेतली. हरकत घेऊनसुध्दा ते कुटुंबीय फोटो काढण्याच्या बाबतीत आग्रही राहिले आणि ते फोटो काढायला लागले. तेव्हा तिथल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना मारहाण केली. या मारहाणीतून तक्रारी झाल्या, पोलीस फिर्याद दाखल झाली. साधारणतः बहुतेक मंदिरांमध्ये फोटो काढण्यास मनाई केली जाते. फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे असे फलकही मंदिरांमध्ये लावलेले असतात. असे फलक लावल्यामुळे भाविकांना वेगळी सूचना देण्याची गरज नाही. त्यांनी निमूटपणे हा नियम पाळला पाहिजे.

असे असले तरी मंदिरांमध्ये फोटोग्राफीला का बंदी आहे याचा खुलासा कधीच होत नाही. साधारणपणे २० वर्षांपूर्वी अशा प्रकारचे फलक लावायला सुरूवात झाली. ती का झाली याचा शोध घेतला असता असे लक्षात आले की दहशतवादी कारवायांमुळे ही उपाययोजना करण्यात आली होती. भारतातल्या अनेक मंदिरांना दहशतवाद्यांचा धोका होता. अशावेळी मंदिराचे फोटो आणि व्हिडिओग्राफी केली गेली तर त्या फोटोंच्या आधारे मंदिरात प्रवेश करण्याच्या जागा, बाहेर पडण्याच्या जागा आणि मोक्याच्या जागा दहशतवाद्यांना कळतील आणि त्यांना हल्ला करणे सोपे जाईल म्हणून हा उपाय योजण्यात आला होता. त्या काळामध्ये ही उपाययोजना योग्यच होती. परंतु कोणत्याही मंदिराच्या व्यवस्थापनाने आताच्या काळात ही उपाययोजना कशी कालबाह्य आहे याचा विचारच केलेला नाही.

आता एखाद्या दहशतवादी संघटनेला एखाद्या मंदिरात काही घातपाती कारवाई करायचीच असेल तर त्यासाठी मंदिराच्या फोटोची गरज राहिलेली नाही. गुगलवरून सगळ्या प्रकारचे नकाशे त्यांना सहज उपलब्ध होतात आणि त्यामुळे फोटोची तशी काही गरजही राहिलेली नाही आणि फोटो काढल्यामुळे दहशतवाद्यांना माहिती होते अशीही काही गोष्ट आता शिल्लक राहिलेली नाही. परंतु २० वर्षांपूर्वी करण्यात आलेली उपाय योजना सगळ्या मंदिरात अजून तशीच केली जाते आणि तंत्रज्ञान बदललेले असले तरी बिनडोकपणाने फोटोविषयीचा हा निर्बंध तसाच पाळला जातो. धार्मिक रूढींमध्ये नेहमीच असेच होत असते. परंतु त्या रूढी पाळताना बदललेल्या परिस्थितीचा विचार न करण्याची प्रवृत्ती फोटोच्या बाबतीतही तशीच दाखवली जाते.

Leave a Comment