सरकारचा पैसा जातो कोठे?

income-tax
सरकारच्या उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये आयकर हा एक मोठा स्रोत आहे. परंतु आपल्या देशातले लोक कर चोरी करण्याच्या बाबतीत एवढे हुशार आहेत की सगळ्या प्रकारच्या पळवाटा शोधून ते कर चुकवेगिरी करत असतात. आयकरात तर हा प्रकार फार चालतो. आपल्या देशातले आयकर खाते लोकांनी भरलेल्या आयकर विवरण पत्राची फार तर छाननी करतात परंतु विवरण पत्रात दाखवलेले उत्पन्न सार्थ आहे का, पटण्यासारखे आहे का याचा शोध कोणी घेत नाही. त्यामुळे लोक उत्पन्न दाखवतात आणि त्यावर खाते विश्‍वास ठेवते. पगार घेणार्‍याच्या बाबतीत असा विश्‍वास ठेवणे योग्य आहे परंतु जे लोक स्वयंरोजगारी आहेत किंवा छोटा मोठा व्यवसाय करतात त्यांनी दाखवलेले उत्पन्न खरेच असते का याचा शोध घेण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही. त्यामुळे लोक सर्रास खोटे हिशोब सादर करतात आणि सरकारला करोडो रुपयांना बुडवतात. आता अशा कर बुडवेगिरीचा एक प्रकार समोर आला आहे. कृषी उत्पादनाला आयकर माफ असल्याच्या सवलतीचा फायदा घेऊन हजारो करोडपतींनी आपल्या व्यवसायातले करोडो रुपयांचे खरे उत्पन्न शेतीचे म्हणून दाखवले आहे.

नेमका हा प्रकार कसा होतो यावर फार चिकाटीने, तर्कशुध्द असा शोध कोणी लावत नाही. परंतु असा एखादा प्रकार उघड झाला की सरकारचे अपेक्षित उत्पन्न कसे होत नाही याचा उलगडा होतो. सध्या आपल्या देशातल्या शेतीची अवस्था नेमकी कशी आहे हे आपण जाणतोच परंतु तरीही काही लोकांनी १० ते १२ एकर बागायती जमिनीतून दर वर्षी १५ ते २० कोटी रुपयांचे उत्पन्न होते असे दाखवून शेतीच्या उत्पन्नाला असलेल्या आयकर माफीच्या सवलतीचा गैरफायदा घेतला आहे. प्रत्यक्षात शेतामध्ये हजारो रुपये गुंतवूनसुध्दा पर्याप्त माल उत्पादित होत नाही आणि झाला तरी त्याला भाव मिळत नाही. परिणामी १०-२० एकर बागायती शेती असणार्‍या शेतकर्‍याचा दरवर्षाच्या उत्पन्नाचा मेळ १५ ते २० लाखांच्या पुढे जात नाही. हासुध्दा आकडा आतिशयोक्तीचाच आहे. परंतु काही लोकांची शेती ही हायटेक शेती असते आणि ते भरपूर पैसे गुंतवून पाण्याची व्यवस्था करून शेती प्रगत पध्दतीने करतात त्यामुळे त्यांच्या उत्पन्नाची बेरीज इथंपर्यंत जाऊ शकते. बाकी सामान्य शेतकर्‍यांचे तर काही विचारूच नका आणि गेल्या ३ वर्षात तर सततची नैसर्गिक संकटे आणि दुष्काळ यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. परंतु अशा वातावरणातसुध्दा देशाच्या आयकर खात्याकडे दाखल झालेल्या काही रिटर्न्समध्ये काही लोकांनी आपल्या शेतीचे उत्पन्न करोडो रुपये असल्याचे दाखवले आहे.

हा काय प्रकार आहे हे सर्वांना माहीत आहे. या लोकांचे खरे शेती उत्पन्न करोडोत असण्याची शक्यता नाही. तसे असले तर त्यांनी खरोखरच देशातल्या अन्य शेतकर्‍यांना मार्गदर्शन करावे. त्यातून देशातले शेतकरी सुधारतील तरी. परंतु तसे होण्याचीही शक्यता नाही. कारण करोडो रुपयांचे शेती उत्पन्न हा एक देखावा आहे आणि आयकर खात्याच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार आहे. प्रत्यक्षात शेती न करणार्‍या लोकांनीच शेतीला देण्यात आलेल्या या सवलतींचा गैरफायदा घेतला आहे. या मध्ये डॉक्टर, वकील आणि विविध व्यवसाय करणार्‍या लोकांचा समावेश आहे. प्रत्यक्षात वकिलीमध्ये करोडो रुपये कमवायचे परंतु त्या कमाईची कसलीच नोंद करायची नाही, कोणाला पावत्या द्यायच्या नाहीत आणि हे उत्पन्न शेतीमधून झाले आहे असे दाखवायचे अशी युक्ती वारंवार अनेक वर्षांपासून केली गेेलेली आहे. परंतु अशा चोरांमुळे देशाच्या प्रगतीत अनेक अडथळे आले आहेत कारण त्यांच्यामुळे सरकारला अपेक्षित कराचे उत्पन्न होत नाही.

खरे म्हणजे १०-१५ एकर जमिनीमधून १ कोटी रुपयांचे उत्पन्न कसे काय होऊ शकते असा प्रश्‍न त्यांना विचारायला हवा परंतु आजवर तो तसा कोणी विचारलाही नाही आणि वर्षानुवर्षे ही करचोरी जारी राहिली. आता पाटणा उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल झाली असून त्या याचिकाकर्त्याने अशा रितीने शेतीत करोडो रुपये कमावल्याचे दाखवणार्‍या लोकांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. यावर लोकसभेत चर्चा झाली आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शेतीतले करोडो रुपयांचे उत्पन्न दाखवणार्‍या उद्योगपतींची चौकशी करण्याचा निर्णय जाहीर केला. अशा प्रकारचे उत्पन्न लपवण्याचे प्रकार बंगळूरमध्ये सर्वाधिक घडले आहेत. तिथे अनेक आयटी उद्योजकांनी करोडो रुपयांचे उत्पन्न असतानाही ते शेतीतले असल्याचे भासवले आहे. बंगळूरच्या पाठोपाठ मुंबई, दिल्ली येथेही हा प्रकार गेल्या काही वर्षांपासून सर्रास घडत आला आहे. अशा लोकांना उघडे पाडलेच पाहिजे. मात्र असे गौप्यस्फोट व्हायला लागले की पुढारी मंडळी जागे व्हायला लागतात आणि मग हा सारा राजकीय सूडाचा प्रकार आहे असा कांगावा करायला लागतात. म्हणूनच अर्थमंत्री जेटली यांनी तसा आधीच इशारा देऊन ठेवला आहे. आपण देशातली मोठी कर चोरी जाहीर करणार आहोत परंतु ती झाल्यानंतर सूडाची भावना ठेवून कारवाई केली असा कांगावा करू नका असे त्यांनी आधीच सांगून ठेवले आहे.

Leave a Comment