आपण मागे का पडलो?

sucess
सध्या आपल्या देशामध्ये तंत्रज्ञानाचा मोठा वापर होत आहे आणि आपले जीवन बदलत आहे. परंतु ज्या तंत्रज्ञानाने आणि शास्त्रीय शोधाने आपले जीवन बदललेले आहे त्यातल्या एकाही तंत्रज्ञानाचा किंवा यंत्राचा कोणा भारतीयाने शोध लावलेला नाही. कारण आपण विज्ञानात आपण फार मागे आहोत. अर्थात विज्ञानात मागे आहोत याचा अर्थ आपली बुध्दीमत्ता वैज्ञानिक शोधास अनुकूल नाही असे नाही. तर आपल्या देशात वैज्ञानिक शोधाला अनुकूल असे वातावरण नाही. जीवनामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसाय, अध्यात्म्य, शिक्षण, आरोग्य, धर्म, पंथ, जात अशा अनेक यंत्रणा कार्यरत असतात. या सार्‍या वेगवेगळ्या व्यवस्था असतात. जगातल्या इतर देशांमध्येही अशीच अवस्था आहे. वर उल्लेख केलेल्या क्षेत्रांच्या प्रभावाशिवाय कोणाला जगताच येणार नाही. इतकी ही क्षेत्रे आपल्या जीवनावर प्रभाव टाकत असतात. सर्वच देशातले लोक सर्व क्षेत्रांचा अभ्यासही करत असतात आणि त्या त्या क्षेत्रानुसार जगण्याची रीत निश्‍चित करत असतात.

असे असले तरी वर उल्लेख केलेल्या क्षेत्रांपैकी कोणत्या क्षेत्राला प्राधान्य द्यायचे याचा मात्र निर्णय करणे गरजेचे असते. म्हणजे आपण किती प्रगती करणार आहोत आणि आपण कसे जगणार आहोत हे आपल्या प्राधान्यक्रमावर ठरत असते. आपल्या देशातले लोक विज्ञान आणि तंत्रज्ञानाला प्राधान्य न देता धर्माला अधिक प्राधान्य देतात. केवळ धर्माला प्राधान्य देऊन थांबत नाहीत तर धर्मातल्या कर्मकांडाला अधिक महत्त्व देतात आणि त्यामुळेच आपले जीवन विज्ञानापेक्षासुध्दा धर्माने आणि धर्मातल्या कालबाह्य रूढींनी अधिक प्रमाणात नियंत्रित केले जाते. या रूढीसुध्दा जुन्या काळातच टाकाऊ ठरलेल्या असतात. परंतु काळ बदलला तरी आपण त्या रूढींना कवटाळून बसतो. हे आपले मागे पडण्याचे कारण आहे.

महाराष्ट्रातले आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी आपले पहिले दर्पण हे वृत्तपत्र प्रसिध्द केले. तेव्हा त्यात हे वृत्तपत्र काढण्यामागची आपली भावना व्यक्त केली होती. आपल्या समाजामध्ये पदार्थ विज्ञान, रसायन शास्त्र, वनस्पती शास्त्र, जीवशास्त्र किंवा भूगर्भ शास्त्र यांचा अभ्यास करण्यास प्राधान्य दिले जात नाही. जेव्हा ब्रिटनमध्ये किंवा अमेरिकेमध्ये गुरुत्त्वाकर्षणाचा शोध लागत होता तेव्हा भारतातले लोक त्या संशोधनाचा अभ्यास करण्याऐवजी शिवलिंगाला कशी प्रदक्षिणा घालावी यावर चर्चा करत होते. असे अनेक विद्वानांनीही त्याकाळी सांगितले होते. आज त्या प्रतिपादनाची आठवण होते. कारण आज जग तंत्रज्ञानाच्या जगात अचंबा वाटावा असे संशोधन करत असताना भारतात मात्र महिलांनी मंदिरांमध्ये कुठंपर्यंत प्रवेश करावा यावर वाद घातला जात आहे आणि त्याच प्रश्‍नाला प्राधान्य दिले जात आहे.

Leave a Comment