चुकीची शिक्षा होणारच

arrest
सध्या आपल्या देशामध्ये भ्रष्टाचाराची चर्चा खूप सुरू आहे. परंतु त्या चर्चेमध्ये एक नकारार्थी सूर उमटत असतो. राजकीय पक्षाचे नेते भरमसाठ भ्रष्टाचार करत असतात. परंतु त्यांना शिक्षा होत नाही आणि ते मोकाट सुटतात असा लोकांचा समज असतो. मात्र आपण आपल्या भोवती नजर टाकली तर असे लक्षात येईल या देशातले काही नेते तरी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जाळ्यात सापडले आहेत आणि कोणत्या ना कोणत्या प्रकारे शिक्षा भोगत तरी आहेत आणि त्यांची वाटचाल शिक्षेकडे सुरू आहे. याबाबतीत जसा नकारार्थी सूर काढला जातो तशी परिस्थिती नाही. भ्रष्टाचार करणारे तुरुंगात जात आहेत. अगदी ठळक उदाहरणे पाहायची झाली तरी लालूप्रसाद यादव, जयललिता, बी. एस. येदियुरप्पा त्यांचे पाठराखे रेड्डी बंधू असे कितीतरी नेते तुरुंगात जाऊन आलेले आहेत. लालूप्रसाद यादव एक वर्षाची सजा काटून आले आहेत. जयललिता यांना तर प्रदीर्घ शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे आणि त्याही तुरुंगात जाऊन आलेल्या आहेत.

आंध्र प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री डॉ. राजशेखर रेड्डी यांचे चिरंजीव जगनमोहन रेड्डी यांनाही प्रदीर्घ काळ न्यायालयीन कोठडीत रहावे लागलेले आहे. कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा यांना जेलयात्रा करावी लागली आहे. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला सध्या तुरुंगातच आहेत. हिमाचल प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री सुखराम यांनाही शिक्षा ठोठावली गेलेली आहे. माजी केंद्रीय मंत्री ए. राजा, तामिळनाडूतील द्रमुकच्या नेत्या कनिमोझी, महाराष्ट्रातले सुरेश कलमाडी अशी कितीतरी नावे घेता येतील. सरसकट सगळेच राजकीय नेते राजरोसपणे पैसा खाऊन सरसकट मोकाट सुटतात असे काही नाही. त्यातल्या काही जणांना का होईना पण गजाआड जावे लागलेले आहे. अशा नेत्यांच्या मांदियाळीत आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा अंतर्भाव झाला आहे. त्यांना काल अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्‍यांच्या मागणीवरून न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. या पूर्वी ज्या ज्या नेत्यांनी जेल यात्रा केली त्यांच्या उदाहरणावरून असे लक्षात येते की एकदा न्यायालयीन कोठडी मिळाली की तिच्यातून बाहेर पडणे मुश्कील जाते. अनेक खटले दाखल केले जातात आणि एका मागे एक खटल्यामध्ये न्यायालयीन किंेवा पोलीस कोठडी वारंवार दिली जाते. एकदा आत गेलेला माणूस वर्ष-दोन वर्षांपर्यंत बाहेरची हवा खाऊ शकत नाही. श्री. छगन भुजबळ यांची परिस्थिती थोडीफार अशीच होणार आहे.

त्यांचे पुतणे समीर भुजबळ हे तर महिनाभरापासून आत आहेतच पण त्यांचे चिरंजीवही कोणत्या क्षणी आत जातील याचा नेम सांगता येत नाही. छगन भुजबळ यांना अटक होताच राजकीय भूकंप झाला. छगन भुजबळ हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असले तरी त्या पक्षात मराठा विरुध्द ओबीसी असे वातावरण होते आणि छगन भुजबळ ओबीसीचे नेते म्हणवले जात होते. त्यामुळे ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आपले स्थान टिकावे म्हणून आपले ओबीसीपण जाणीवपूर्वक दाखवून देत होते. ते राष्ट्रवादीमध्ये असले तरी मधूनच गोपीनाथ मुंडेच्या व्यासपीठावर प्रकट व्हायचे. एकदा तर अशा सभेत त्यांनी महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप होईल असा इशारा दिला होता. तो शरद पवार यांना उद्देशून होता. परंतु आता जो भूकंप झाला आहे तो खुद्द भुजबळांच्या अटकेनेच झाला आहे. आता भुजबळ आपल्यावर कोणीतरी सूडबुध्दीने षडयंत्र रचत आहे म्हणून कारवाई होत आहे असा आरोप करत आहेत. तसाच आरोप शरद पवारही करत आहेत.

शरद पवार हा आरोप करताना किरीट सोमय्या यांच्याकडे बोट दाखवत आहेत. परंतु छगन भुजबळ मात्र आपल्या कोण ही सुडाची कारवाई करत आहे याचा थेट उल्लेख करत नाहीत. मग त्यांचा इशारा कोणाकडे आहे याचा अंदाज करण्यातच लोक मग्न आहेत. त्यांनी पूर्वी मुंडेेंच्या व्यासपीठावर जाऊन राजकीय भूकंपाचा इशारा पवारांना दिला होता. त्यामुळे चिडून पवारांनी त्या भूकंपाचा हादरा भुजबळांनाच दिलेला आहे की काय असे वाटल्यावाचून राहत नाही आणि कदाचित भुजबळांचा रोख पवारांकडेपण असू शकेल. राजकारणात कसलीही शक्यता नाकारता येत नाही. अर्थात सूडबुध्दीच्या अशा कितीही चर्चा केली तरी मूळ खटल्यामध्ये न्यायालये निकाल देताना भुजबळांच्यावरील कारवाईचा हेतू काय आहे याची चर्चा करणार नाहीत. आता न्यायालयात चर्चा होईल आणि छाननी होईल. ती निखळ पुराव्यांची होईल. कोणी सूडबुध्दीचा आरोप केला म्हणून किंवा कोणीतरी अटकेच्या विरोधात आंदोलन केले म्हणून भुजबळांच्या कारवाईवर कसलाही परिणाम होणार नाही. तेव्हा हे सारे राजकीय डावपेच यापुढे निरर्थक ठरणार आहेत आणि भुजबळांच्या विरोधात बरेच पुरावे असल्यामुळे ही कारवाई भुजबळांना मोठी महागात पडणार आहे. आपण भारी स्वच्छ आहोत असा कितीही मोठा दावा भुजबळ करत असले तरी तूर्तास उपलब्ध असलेल्या माहितीनुसार भुजबळ आणि त्यांचे कुटुंबीय पूर्ण अडचणीत आहेत.

Leave a Comment