
वॉशिंग्टन – अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था (नासा) अवकाशात गुरुत्वाकर्षण नगण्य असलेल्या ठिकाणी आग कशी पसरेल, हे जाणून घेण्यासाठी एक प्रयोग करणार असून हा प्रयोग नासामधील जॉन एच ग्लेन संशोधन केंद्राकडून राबविण्यात येणार आहे. या प्रयोगांतर्गत अवकाशात मोठ्या प्रमाणात आग लावण्यात येणार आहे.
अवकाशात आग लावणार नासा
या प्रयोगाचे स्पेसक्राफ्ट फायर एक्सपेरिमेंट (सफायर) असे नामकरण करण्यात आले असून येत्या २२ तारखेला अवकाशामधील आगीच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी हा प्रयोग राबविण्यात येणार आहे. या प्रयोगासाठी नासा व नासाची व्यावसायिक भागीदार कंपनी ऑर्बिटर एटीके एकत्रितरित्या सायग्नस हे अवकाशयान अवकाशात पाठविणार आहे. या अवकाशयानाने आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक सोडल्यानंतर हा प्रयोग राबविण्यात येईल. वर्तमान व भविष्यकाळातील अवकाश मोहिमांसाठी हा प्रयोग आवश्यक असल्याचे या प्रयोगाशी संबंधित असलेले अभियंते गॅरी रफ यांनी सांगितले.
