
लंकेला जाण्यासाठी सेतू बांधताना माकडांबरोबरच छोटया खारूताईचीही मदत झाल्याची कथा आपण ऐकतो. तसाच कांहीसा प्रकार छोट्या आकराचे रोबो बनविताना घडला असून असे रोबो बनविताना संशोधकांना छोट्या मुंग्याची मदत फार मोलाची ठरली आहे. मुंग्या आणि पालींच्या हालचालीतून संशोधकांना अनेक बाबी शिकता आल्या आहेत आणि त्याची मदत रोबो क्षमता विकसित करण्यास झाली आहे.
छोटे रोबोट बनविण्यास मुंग्यांची झाली मदत
अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठातील मायोमिमिटीक्स लॅबमध्ये असे छोटे रोबो तयार झाले असून १०० ग्रॅम वजनाचे सहा रोबो १७७० किलो वजनाची कार सहज खेचू शकतात असे संशोधकांचे म्हणणे आहे. एवढीशी मुंगी तिच्या वजनाच्या कितीतरी पट अधिक वजन परस्पर सहकार्यातून खेचून नेत असते त्यावरून असे छोटे रोबो बनविण्याची कल्पना सुचली. संशोधकांनी त्यासाठी मुंग्यांचे १ वर्षभर निरीक्षण करून त्यांच्या सवयी जाणून घेतल्या. मुंग्यांना असलेल्या सहा पायांपैकी एकावेळी त्या तीन पाय वापरतात व अन्य मुंग्याच्या सहकार्याने सामान वाहून नेतात असे आढळल्याचे प्रो. मार्क कटकोस्की यांनी सांगितले. त्यावरून हे रोबो तयार करण्यात आले आहेत.
मार्क यांच्या म्हणण्यानुसार माणसाच्या वजनाचे सहा रोबो आयफेल टॉवर अथवा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे तीन पुतळे ज्या वजनाचे भरतील तेवढ वजन इकडून तिकडे नेऊ शकतात. त्यासाठी त्यांच्या पायात पालीच्या पायात असलेल्या वैशिष्ठ्यांचा वापर करण्यात आला आहे. पालीच्या पायातील विशिष्ठ चिकटपणामुळे पाली भिंतींवरूनही चालू शकतात. हा पेपर आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स परिषदेत सादर केला जाणार आहे.
