आता बचत खात्यावर मिळणार तीन महिन्यांनी व्याज

rbi
मुंबई – आता सहा महिन्यांच्याऐवजी दर तीन महिन्यांनी बॅंकेतील बचत खात्यांवरील रकमेवर मिळणारे व्याज जमा होणार असून त्याबाबत देशातील सर्व बॅंकांना भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) आदेश दिले आहेत.

देशभरातील कोट्यावधी बचत खातेधारकांना या निर्णयाचा लाभ होणार असून आरबीआयने बचत ठेवींवरील व्याज यापुढे तिमाही आधारावर किंवा कमी कालांतराने देण्यात यावे, असा आदेश सर्व बॅंकांना दिला आहे. बॅंकेत सध्या बचत खात्यांवर दर सहा महिन्याला व्याज दिले जाते. दररोजच्या जमा रकमेवर १ एप्रिल २०१० पासून व्याज दिले जाते. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांतर्फे बचत ठेवींवर ४ टक्के तर खासगी बॅंकांतर्फे ६ टक्‍क्‍यांपर्यंत व्याज दिले जाते.
२०११ साली आरबीआयने प्रत्येक बॅंकेला बचत खात्यांवरील व्याजदर निश्‍चित करण्याचे स्वातंत्र्य दिले होते. परंतु एक लाख रुपयांपेक्षा कमी रकमेच्या बचत ठेवींवर सारख्याच दराने व्याज देण्याचा आग्रह धरण्यात आला होता. त्यापेक्षा जास्त रकमेसाठी बॅंकांचे दर वेगवेगळे आहेत. जेवढ्या कमी कालांतराने व्याज जमा होईल, तेवढा जास्त ग्राहकांना फायदा होणार आहे. मात्र या निर्णयामुळे बॅंकांना साधारण ५०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे.

Leave a Comment