या जगप्रसिद्ध शिवलिंगाची उंची गेली ७० फुटांवर

bhutnath
जगातले सर्वात मोठे नैसर्गिक शिवलींग अशी ओळख असलेले छत्तीसगढच्या गरीयाबंद भागातील भूतेश्वरनाथ महादेव शिवलिंग ७० फूट उंचीचे झाले असून महाशिवरात्रीनिमित्त येथे अनेक भाविक गर्दी करत आहेत. छत्तीसगढच्या पर्यटन यादीत या शिवलिंगाचा समावेश असून दरवर्षी त्याची उंची वाढतच चालली आहे आणि अनेक प्रकारच्या शोधानंतरही त्यामागचे कारण समजू शकलेले नाही.

यामागे अशी कथा सांगितली जाते की येथे एका जमीनदाराची जमीन होती. तो जेव्हा या जमिनीवरून फिरत असे तेव्हा एका ठराविक जागी बैलाच्या हुंकारण्याचा आवाज येई. आजूबाजूला जनावर नसले तरी या ठराविक जागी तो आवाज येई व तेथे एक तीन फुट उंचीचा दगडही होता. त्यानंतर या दगडाचा आकार वाढू लागला व त्याचे प्रचंड मोठ्या शिवलिंगात रूपांतर होत गेले. कांही काळाने तेथे कांही ऋषी फिरत आले व त्यांनी या दगडाची शिवलिंग रूपात पूजा केली. त्याला भर्कुरा महादेव असेही नांव आहे.

पर्यटन विभागाचे महेश सिन्हा म्हणाले १९९६ साली सर्वांसमोर या शिवलिंगाची उंची मोजली गेली तेव्हा ती ६२ फूट भरली होती आता ती ७० फूटांवर गेली आहे. पूर्वी शिवलिंगाला भस्म वा कुंकूमतिलक लावण्यासाठी शिडीच्या पाच पायर्‍या चढाव्या लागत असत आता १५ पायर्‍या चढाव्या लागतात. आजही येथे बैलाचे हुंकार ऐकू येतात असे सांगितले जाते. हा महादेव नवसाला पावणारा आहे असाही भाविकांचा समज आहे. दाट जंगलात आणि आतिशय निसर्गरम्य वातावरणात हे शिवलिंग आहे.

Leave a Comment