न्यायालयाने पाजला डोस

kanhaiya
संसदेवर हल्ला करणारा देशद्रोही अफझल गुरु याचा स्मृतीदिन साजरा करणारा देशद्रोही विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमार याला २० दिवसाच्या कारावासानंतर जामीन मिळाला खरा परंतु त्याचा जामीन म्हणजे जणू काही आरोपातून सुटकाच आहे असे भासवत त्याच्या उपद्व्यापी पाठीराख्यांनी जवाहरलाल नेहरु विद्यापीठात जल्लोष साजरा केला. मूळ आरोपातून निर्दोष सुटका होणे हे आनंददायक असू शकते. परंतु अशी निर्दोष मुक्तता होणे आणि जामिनावर सुटका होणे यात मोठा फरक असतो. हे त्यांना समजत नाही किंवा समजूनसुध्दा ते जाणीवपूर्वक लोकांची दिशाभूल करण्यासाठी जल्लोष करत आहेत. कन्हैय्याकुमारला जामीन मंजूर झाला म्हणजे नरेंद्र मोदी सरकारचा काहीतरी पराभव झाला आहे असे दृश्य निर्माण करण्याचा या लोकांचा प्रयत्न आहे.

प्रत्यक्षात कन्हैय्याकुमारचा जामीन हा काही आनंदाचा भाग नाहीच पण जो काही जामीन मंजूर झाला आहे. तोही सशर्त आहे. न्यायालयाने त्याच्यावर अनेक अटी घालून त्याला जामीन दिला आहे. हा जामीनसुध्दा सहा महिन्यांसाठी आहे. म्हणजेच सहा महिन्यांमध्ये त्याची देशद्रोही वळवळ कोठे व्यक्त व्हायला लागलीच तर त्याला पुन्हा अटक केली जाऊ शकते आणि त्याचा जामीन संपवला जाऊ शकतो. म्हणूनच हा जामीन अंतरिम आहे. म्हणजे तात्पुरता आहे. त्याशिवाय त्याला पोलिसांच्या चौकशीसाठी स्वतःला वारंवार पेश करावे लागणार आहे. म्हणजे त्याची चौकशी संपलेली नाही. एवढ्या सगळ्या अटी घालून न्यायालयाने त्याला या सहा महिन्याच्या काळात कोणत्याही देशद्रोही कारवाईत सहभागी होऊ नये असे बजावले आहे.

हा जामीन देताना न्यायालयाने आपल्या २३ पानी निकालपत्रात कन्हैय्याकुमारला आणि त्याच्या सगळ्या देशद्रोही सहकार्‍यांना राष्ट्रभक्तीचे चांगलेच डोस पाजलेले आहेत. आपण जेव्हा अतिरेक्याचा स्मृतीदिन साजरा करतो तेव्हा आपल्याला ही जी मोकळीक मिळालेली असते ती देशाच्या सीमेवर कोणीतरी डोळ्यात तेल घालून देशाचे रक्षण करत असते त्यामुळे मिळालेली असते. याची जाणीव या लालभाईंनी ठेवली पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे. आपण घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा गैरफायदा घेऊन देशविरोधी घोषणा देतो आणि आपल्याला वाट्टेल ते बोलण्याचा अधिकार आहे असा मोठा आव आणत असतो परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्यस देणार्‍या भारतीय घटनेने आपल्या सारख्या नागरिकांनी जबाबदारीने कसे वागावे याचीसुध्दा जाणीव करून दिली आहे.

Leave a Comment