मनोरुग्ण अवस्था दडवण्याचे परिणाम

thane
कालच गायत्री पगडी या लेखिकेच्या वेदनेची कहाणी सांगणारे ‘दोला’ हे आत्मकथन वाचण्यात आले. या आत्मकथेचा मराठी अनुवाद डॉ. ऋचा कांबळे यांनी केला असून औरंगाबादच्या साकेत प्रकाशनाने तो प्रकाशित केला आहे. काल हे पुस्तक वाचून पूर्ण केले आणि आज सकाळीच ठाण्यात हसनैन अन्वर वरेकर या तरुणाने आपल्या चौदा नातेवाईकांचा अत्यंत निर्दयपणे खून केल्याची अंगाचा थरकाप उडवणारी बातमी वाचण्यात आली. गायत्री पगडी यांच्या पुस्तकातील प्रतिपाद्य विषयाचा थोडा संबंध या हत्याकांडाशी आहे. हसनैन वरेकर यांनी आपले आई, वडील, तीन बहिणी, भाचे, पत्नी आणि मुली अशा चौदा जणांना ठार केले. केवळ ठारच नव्हे तर त्यांना अन्नातून विषबाधा करून बेशुध्द पाडले आणि नंतर बकरे कापण्याच्या सुरीने त्या सर्वांचे गळे कापले. शेवटी एका बहिणीला मारत असताना ती सावध झाली त्यामुळे तिचा जीव वाचला परंतु तिने सावध होऊन, आरडाओरडा करून लोकांना जमवेपर्यंत हसनैनने स्वतःच आत्महत्या केली.

या घटनेमुळे खळबळ तर माजली आहेच परंतु हत्याकांडामागचे कारण समजत नसल्यामुळे सगळेच हैराण झाले आहेत. एखादा माणूस आपल्या कुटुंबातल्या ३ महिन्याच्या लहान मुलीपासून ५५ वर्षे वयाच्या आपल्याच पित्याला मारून टाकतो तेव्हा त्यामागे तेवढेच काहीतरी गंभीर कारण असणार हे उघड आहे. विशेषतः हसनैनने २ वर्षापूर्वी असाच प्रयत्न केला होता मात्र तो सफल झाला नाही. परंतु त्याने आपल्या एवढ्या नातेवाईकांना का मारले असावे याचा कसलाही थांगपत्ता लागत नाही. या सर्वांशी त्यांचे काही भांडण असेल असे म्हणावे तर तेही तर्कसंगत वाटत नाही. कारण हत्या झालेले चौदाजण त्याच्याशी निरनिराळ्या नात्यांनी जोडलेले आहेत. त्यामुळे सर्वांशी असलेल्या नातेसंबंधात एकदम असे भयानक कारण घडावे असे काही संभवत नाही आणि तसे असते तर त्याच्या मेव्हण्याला ते नक्कीच कळले असते. किंबहुना शेजार्‍यापाजार्‍यांनाही नक्कीच अशा भांडणाचा सुगावा लागला असता. याचा अर्थ चौदा जणांचे खून करावे अशी वैरत्वाची भावना त्याच्या मनात निर्माण होण्याची शक्यता दिसत नाही.

हसनैन हा ३५ वर्षे वयाचा बुध्दीमान तरुण होता. तो मुंबईत एका चार्टर्ड अकौंटंट फर्ममध्ये कामाला होता. त्याला दरमहा ६० हजारा रुपये वेतन होते. त्याला ओळखणारे लोक त्याच्या हातून हे कृत्य घडलेच कसे याचे नवल करत आहेत. कारण तो अतीशय शांत, सुस्वभावी आणि चांगला माणूस होता. दोन वर्षापूर्वी त्याने केलेल्या विषबाधेच्या प्रयत्नाचा अपवाद सोडला तर त्याने कसलाही गुन्हा केल्याची किंवा गुन्ह्याचा प्रयत्न केल्याचेे कोणाला माहीतही नाही आणि तसे काही घडलेलेही नाही. मग शेवटी फिरून फिरून प्रश्‍न असा येतो की त्याने या हत्या का केल्या असाव्यात.

आपल्या समाजामध्ये अगदी नाकासमोर चालणारे असे काही लोक असतात जे मनोरुग्ण असतात. त्यांचे सर्वसामान्य व्यवहार व्यवस्थित चाललेले असतात. परंतु त्यांच्या मनाला कसली तरी व्याधी जडलेली असते. सिझोफ्रेनिया, डिप्रेशन अशा नावांनी हे विकार ओळखले जातात. असे लोक मनाने असंतुलित असतात आणि त्यांच्या आयुष्यात घडलेल्या काही घटनांमुळे ते या व्याधींनी ग्रस्त असतात. त्यांना ओळखणार्‍या अनेक लोकांना त्याच्या मनाच्या या विकाराची कल्पनासुध्दा येत नाही. मात्र हे रूग्ण त्रस्त असतात. गायत्री पगडी या पूर्वी डिप्रेशनच्या आजाराने त्रस्त होत्या. परंतु त्यांचा अनुभव असा आहे की अशा आजारावर इलाज करण्यासाठी लोक समुपदेशकाकडे जात नाही. कारण मनाच्या कुठल्या तरी विकारासाठी अशा प्रकारे उपचार घ्यायला आपण गेलो तर लोक आपल्याला वेडे ठरवतील अशी त्यांना भीती वाटत असते. लोकांना मनोरुग्ण आणि वेडा यातला फरक कळत नाही हे लोेकांचे अज्ञान अशा मनोरुग्णांना उपचारापासून परावृत्त करते.

मग असे लोक तो विकार घेऊन जगतात आणि त्यातून अशा घटना घडतात. हसनैन वरेकर हा अशा एखाद्या विकाराने त्रस्त असण्याची शक्यता आहे. एवढे मोठे हत्याकांड त्याच्या हातून घडले परंतु अशा प्रकारचे हत्याकांड घडू शकेल अशी सूतराम शक्यता कोणालाच वाटली नाही. यावरून ही शक्यता अधिक वाटायला लागते. हसनैन वरेकर हा चांगल्या स्वभावाचा, शांत, सुस्वभावी असे लोकांना वाटत होते. परंतु आत तो कोणत्या मनोरोगाने ग्रस्त होता हे लोकांना कळण्याचे काही कारण नाही. फार तर त्याच्या पत्नी किंवा आईवडिलांना तो काही वेळा अबनॉर्मल वागत असेल याचा अनुभव असेल मात्र तो स्वभावाचा भाग आहे असे समजून तेही गप्प बसले असतील पण अशी व्यक्ती हा विकार पराकोटीला गेल्यास काय करू शकेल हे सांगता येत नाही. म्हणून मनोरुग्ण म्हणजे वेडा नव्हे हे लोकांनाही समजले पाहिजे आणि थोडीफार असाधारण वागणूक दिसायला लागताच मनोवैज्ञानिकांचा सल्ला घेतला पाहिजे. असे मनोविकार आटोक्यात आणण्याचे तंत्र लोकांना माहीत झाले आहे आणि असे अनेक रुग्ण बरे होऊन सामान्य जीवनही जगत आहेत. गायत्री पगडी यांचे दोला हे आत्मकथन वाचल्याबरोबर ही ठाण्यातली घटना कळल्यामुळे हे विचार मनात आले.

Leave a Comment